Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Wednesday, June 13, 2012

माया महाठगिनी, हम जानी|

(काही तांत्रिक घोळ झाल्याने मागची पोस्ट पब्लिश होण्यात ब-याच  अडचणी आल्या. ती पोस्ट वाचायची असल्यास इथे वाचा.)

आठ महिने सरकारी प्रशिक्षण  पूर्ण झालं, आणि मायबाप सरकारने आमची पालखी कलकत्त्याला नेली. गेलं एक वर्ष मी इथे राहतो आहे.
आम्ही भूशास्त्रज्ञ असल्यामुळे टेबलावर पाय टाकून झोपा काढणे, उठसूट चहाला जाणे,  एका मिनिटाच्या कामाला महिना लावणे (हे काही प्रमाणात आमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ करून दाखवतात), आल्यागेल्यावर खेकसणे, हे अत्यंत सुखद प्रकार काही आमच्या नशिबी लिहिलेले नाहीत. आम्हाला नोकरी दिली या पापाचं परिमार्जन सरकार अनेक प्रकारे करत असतं. नियम असा आहे, की वर्षातले एकशे वीस दिवस आम्हाला फिल्डवर्क करावं लागतं. आणि हे एकशे वीस दिवस झाले की नाहीत हे सरकार आखाडसास-या सारखं बघत असतं. त्यामुळे आम्ही gazetted ऑफिसर असलो, तरी शुभ्र कपडे, चकचकीत गाड्या हे काही आमचं जग नाही. फाटकी जीप, धुळीने भरलेले केस, वाढलेली दाढी, मळके कपडे अशा अवतारात एखादा माणूस उन्हातान्हात दगड फोडताना दिसला तर तो सरकारी  भूशास्त्रज्ञ सोडून दुसरा कोणी असूच शकत नाही. असो.
तर वर्षातले एकशे वीस दिवस आम्ही कुठेही काढतो. शक्यतो जिथून काम करण्याचा एरिया जास्तीत जास्त जवळ पडेल, आणि डीझेलचा खर्च कमी होईल (हापण एक सासुरवास असतो) अशा जागी. बरेचदा अशा जागा अतिशय अडनेड्या असतात. त्यात परत आम्हाला ऑफिसमध्ये दरमहा बोलावून त्रास देण्याची प्रथा आहे. त्यासाठी रस्ते, रेल्वे सोयीस्कर आहे की नाही हेही बघावं लागतं. या सगळ्या सोपस्काराला 'कॅम्प टाकणे' असं नाव आहे. एकदा कॅम्प टाकला, की  कामाला सुरुवात होते. जीप घेऊन एरियाचा कानाकोपरा तपासून पाहायचा, आणि ठराविक इन्टर्वलने दगड-मातीचे नमुने घ्यायचे असं आमच्या कामाचं साधारण स्वरूप असतं. या पद्धतीचं काम 2001 मध्ये चीनने पूर्ण केलं, आणि ते काही अंशी यशस्वीही झालं. हे नमुने प्रयोगशाळेत धाडले जातात, आणि त्यांच्यातल्या 64 मूलद्रव्यांची तपासणी केली जाते. ही माहिती परत आम्ही तपासतो, आणि interprete करतो. याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो (अधिक माहितीसाठी वाचा). या सगळ्या कामासाठी सरकार आम्हाला काही मोजकी रक्कम देतं. जीपची मोडतोड-दुरुस्ती, डीझेल, कामगारांचे पगार, उपकरणं, कॅम्पचे किरकोळ खर्च, असे अनेक खर्च यात असतात. हा सारा खर्च अतिशय काटेकोरपणे करावा लागतो. दर दिवशी एक माणूस किती दगड-माती गोळा करू शकतो याचं सरकारने (डोकं बाजूला ठेवून) एक गणित केलेलं आहे. तेही लक्षात ठेवून काम करावं लागतं. याचा फायदा एकच आहे, की ज्या भागात आम्ही काम करतो, तो परिसर आम्हाला खूप जवळून अनुभवता येतो. जिथे कोणी फिरकतही नाही अशा जागी आम्ही जातो. रस्ता नसेल, जीप जाऊ शकत नसेल, तर चार नमुने घेण्यासाठी आठ-दहा किलोमीटर चालत जाणं अगदी नेहमीचं. या सा-या कामासाठी आम्ही साधारण चार ते पाच लोक कामाला घेतो. ही माणसं सहज मिळतातही, कारण इतर कामात यांना दर दिवसाचे जितके पैसे मिळतात त्याच्या जवळपास दुप्पट पैसे सरकारी कामात मिळतात. अर्थात ही दुप्पट रक्कमही विशेष नसतेच, पण यासाठी माती खोदणे, वाळवणे, कुटणे, चाळणे, आणि डब्यात भरणे, दगड असेल तर त्याचे छोटे तुकडे करून डब्यात भरणे ही कामं हे लोक करतात. हे काम सोपं नाही. अत्यंत लहान चूक सगळ्या कामाचं रूप बदलू शकते. एकशे वीस दिवसात आम्ही 923 नमुने गोळा करतो, आणि हा कामाचा पहाड पूर्ण करताना सगळ्यांच्या कमरेचे टाके ढिले होतात.
 मातीचा नमुना घेताना. 
कुठल्याही धातुमुळे contamination होऊ नये म्हणून लाकडी दांड्याने खोदकाम करतात.

इतकी माणसं, इतके दिवस, इतकं काम, इतकी भटकंती यामुळे सारी दृष्टी बदलून जाते. स्थानिक लोक आणि अनेकदा वन्यप्राणी यांच्याशी संबंध येतो. या सा-या कामाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. (अजून एक फायदा म्हणजे ऑफिसात आम्हाला कोणीही भाव देत नसलं, तरी फिल्डवर बराच मान मिळतो!) खरं तर 'मासे, दुर्गापूजा,रसगुल्ले आणि टागोर' या चौकटीतून बाहेर पडून बंगाल पाहिला, तर एक फार वेगळा चेहरा दिसतो जो  कलकत्ता-शांतीनिकेतन ट्रीप काढून नाही दिसत. कलकत्त्याला बदली झाल्यावर वर्षभर  मी पुरुलिया-बांकुडा या भागात काम केलं. या कामात मी जो बंगाल पाहिला, तो असा चौकटीपल्याडचा होता.
पुरुलिया-बांकुडा-मिदनापूर या तीन जिल्ह्यांना जंगलमहाल म्हणतात. दक्षिण-पश्चिम बंगाल, आणि बंगाल-झारखंड सीमा असा प्रदेश या जंगलमहालने व्यापला आहे. हवा-पाणी-सुरक्षा यादृष्टीने अतिशय प्रतिकूल असा हा भाग. मे महिन्यात इथे 48-49 अंश इतकं तापमान असतं. पाण्यात आर्सेनिक, लोह आणि फ्लुराईड. माओवादी, हत्ती तर नेहमीचे. इथल्या जंगलात फिरताना अतिशय काळजी घ्यावी लागते. माणूस आणि हत्ती यांचा संघर्षही आता तीव्र होऊ लागला आहे.
 गंगाजलघाटी, बांकुडा इथे शेतात घुसलेला हत्ती 

हे सारे दशावतार सोसणारी माणसंही इथेच आहेत. त्यांना हे भोग भोगायला लावणारे माओवादीही इथलेच. कुठेही फिरा, डोळ्यावर चटकन आघात करून जाते ती इथली गरिबी. याला कोण जबाबदार आहे, यावर उपाय काय आहे या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण आत्ता दोन-एकशे रुपये जास्त दिले म्हणून एक चाळीशी-पन्नाशीचा माणूस एका पंचविशीतल्या मुलाचे पाय धरू पाहतो, तेव्हा शरमेने सारं आयुष्य आकसून जातं. पैसे माझे नाहीत, ते सरकारचे आहेत. देणारा फक्त मी. "कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकारी?" असा हा प्रकार. तरीही त्या घटकेला त्या कामगारासाठी मीच सरकार असतो ना? मग माझी जबाबदारी नक्की काय आहे? चार पैसे जास्त मिळावेत म्हणून काम हळूहळू करण्याची यांची केविलवाणी खटपट जेव्हा लक्षात येते, तेव्हा त्यांच्यावर डाफरणंही जीवावर येतं. कित्येक माणसांची आयुष्यं अक्षरशः याच एका कामावर अवलंबून आहेत. मे  महिन्यात काम संपवून जेव्हा पावसाळी ब्रेक सुरु होतो, तेव्हा काम परत सुरु होईल ना, या विचाराने या माणसांचा जीव कसा वरखाली होतो ते मी पाहिलेलं आहे. एखाद्या आडगावात गेल्यावर तिथली माणसं मोठ्या अपेक्षेने आपले पाण्याचे प्रश्न सांगतात, आणि माझं शिक्षण, ज्ञान असूनही मी काहीच करू शकत नाही, यात नक्की दोष कुणाचा? दीड-दोनशे रुपयांसाठी माझ्यामागे "साब साब" करत फिरणारा कामगार आणि त्याहून कितीतरी जास्त रुपये मिळत रहावेत म्हणून माझ्या बॉसशी नम्रपणे वागणारा मी. फरक फक्त रकमेचाच आहे का?
गांधीजी एके ठिकाणी म्हणतात, माणसाची खरी पारख तो आपल्या कनिष्ठांशी कसा वागतो यावरून होते. आपण ऑफिसर आहोत, gazetted आहोत, या खोट्या अभिमानातून तुसडे होणारे, तुरा मिरवणारे लोक इथे पदोपदी भेटतात. एक परीक्षा पास होऊन ऑफिसर होणे, यात अभिमान वाटण्यासारखं काही आहे असं मला खरंच वाटत नाही. समजा, नापास झालो असतो तर?
ही नोकरी सुरु होण्याआधी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होतो. टेम्पररी. पुढच्या सेमिस्टरमध्ये घेतलं जाईलच याची शाश्वती नाही. महिन्यात किती लेक्चर्स घेतली, किती practicals घेतली त्या हिशोबाने पैसे मिळत, तेही सेमिस्टर संपल्यावर. किती मिळायचे, हे सांगण्यात काही अर्थ नाही आणि औचित्यही नाही, पण गरजा भागत आणि जोडीला भटकंती, डोंगर चढणे, या आणि  उद्योगांसाठी घरी पैसे मागायची गरज नसे. जोडीला माझी डॉक्टरेट चालू होती, त्याचं फिल्डवर्क वगैरे करायला कधीतरी मदत व्हायची. मी दोन वर्षं हे काम केलं, आणि मनापासून एन्जॉय केलं. माझ्या विद्यार्थ्यांनीही  मला फार मोठ्या मनाने सहन केलं. अजूनही मी पुण्याला गेलो तर हे सारे अतिशय प्रेमाने भेटतात, बोलतात. या दोन वर्षांची सर्वात मोठी पुंजी हीच आहे खरं तर. असो. तर एक सेमिस्टर संपली, मे महिना किंवा दिवाळीची सुट्टी आली की मला टेन्शन असे, की पुढच्या सेमिस्टरला मी शिकवणार की नाही? यात पैसे मिळवण्याचा भाग खरंच नव्हता. शिकवण्याचीच मजा इतकी होती, की त्यासाठी मी फुकटही काम केलं असतं.
आज जेव्हा मी काम चालू राहील का नाही, म्हणून अस्वस्थ होणारी ही माणसं बघतो तेव्हा मला माझी आठवण होते. यांना पैशाची गरज आहे, मला कामाची, शिकवण्याची आणि पर्यायाने सतत डोकं चालू ठेवण्याची गरज होती. माझं शिकवणं बंद झालं असतं तर मला माझी डॉक्टरेट होती, . या माणसांचं काम बंद झालं, तर यांना अजून काय आहे? आपलं आयुष्य चांगल्या त-हेने चालू राहावं एवढीच एक ओढ, पण ती जेव्हा अशा पद्धतीने समोर उभी राहते, तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं.
कबीर म्हणतो, "माया ही मोठी फसवी आहे. (महाठगिनी हम जानी!) पुजा-यासाठी मूर्ती माया, तर तीर्थात पाणी माया. कोणासाठी ती हिरा बनते, तर कोणासाठी कवडी बनून जाते." दोन वेळची चूल पेटती राहावी, ही कोणाचीतरी माया असते, तर कोणी चांगल्या कामासाठी जीव टाकतो. अखेर आपल्या गरजा असतात तरी किती? दीड-दोनशे रुपयांना महाग असलेला कामगार आणि महिना हजारो रुपये मिळवणारा ऑफिसर हे एकाच प्रकारच्या पैशाला बांधलेले. त्यासाठी पडेल ते काम करणारे. फरक फक्त quantityचा. कुठल्या कुठून पुन्हा हे सगळं चक्र फिरून त्याच एका प्रश्नाकडे येतं, की ही सारी धडपड, सारा खटाटोप आहे कशासाठी आणि कुणासाठी? कबीरच पुढे सांगतो, की ही सारी 'अकथ कहानी' आहे. कुणी कुणाला न सांगितलेली, तरी सतत घडणारी. ही साठा उत्तरांची कहाणी आहे, पण ती सुफळ संपूर्ण होईलच असं नाही. शेवटी हा वर ज्याचा त्यानेच मागायचा असतो. मागूनही तो मिळेलच असं नाही. पण निदान आपण काहीतरी मागितलं, ही जाणीव आपल्या  गाठीशी राहिली तरी खूप झालं.

Saturday, May 26, 2012

एका नदीची गोष्ट....

नदी का वाहत असते? कधी विचार केलाय कुणी? पाण्याचा हा अखंड प्रवाह एकाच दिशेला सतत का जात राहतो? कुठल्या प्रेरणा असतात यामागे? कसली आंतरिक ओढ़ असते? जी. एंच्या पत्रांत, माणसाच्या आयुष्याबद्दल बोलताना अनेकदा नाईलचा उल्लेख आला आहे. नाईल जिथून उगम पावते, तिथून ती दोनशे मैल पूर्वेला गेली असती, तर लाल समुद्राला मिळाली असती. पश्चिमेला गेली असती तर अटलांटिक महासागरात विसर्जित झाली असती. पण ती उत्तरेला जाते, आणि हजारो मैल वाळवंट तुडवत भूमध्य सागरात विसर्जित होते. आपण अलेक्झांड्रियाला आलेलो पाहून खुद्द नाईललाच आश्चर्य वाटले असेल! अशा कुठल्या शक्ति असतात, अशी कुठली प्रबळ ऊर्मी असते, जी नाईलला भूमध्य समुद्राला मिळायला भाग पाड़ते?   
गणपती बसवताना कलशपूजा असते. त्या पूजेत कलशाच्या कुठल्या भागात कोणी येऊन बसावं  याची एक जंत्री दिलेली आहे. कलशाच्या पाण्यात कुणी यावं? गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिन्धु, कावेरी यांनी. त्याच्या कुशीमधे असावं सात समुद्रांनी, सप्तद्वीपा वसुन्धरेनी. बाकी ब्रह्मा, विष्णु, रूद्र, गायत्री, सावित्री, वेद  हे नेहमीचे यशस्वी खेळाडू आपापल्या जागी आहेतच. असो. तर  भारतात इतक्या नद्या आहेत, त्यात या सात नद्या पवित्र का मानल्या जाव्यात? लहानपणापासून शेवटच्या क्षणी मुखात गंगा घालेपर्यंत सोबत करणा-या या नद्या. कदाचित या सात नद्यांनी अनेक समृद्ध संस्कृतींचे उदयास्त पाहिले आहेत, माणसाच्या इतिहासाचे कित्येक महत्त्वाचे अध्याय या नद्यांच्या काठी लिहिले गेले आहेत म्हणून या नद्या पवित्र मानल्या गेल्या असाव्यात. घरात जसे फार पाहिलेले, भोगलेले (आणि म्हणूनच शहाणे) माणूस असावे तशा.
पूर्वीच्या काळी गावात एक फार सुन्दर पद्धत होती, की गावात कुठलीही नदी असो, तिला गंगा म्हणायचे. किंवा ज्या गावात नदी नाही, त्याला कुग्राम म्हटलेलं आहे. थोडक्यात, नदी आणि माणूस यांचा फार फार जवळचा सम्बन्ध आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हापासूनचं हे नातं. जवळपास सर्व जुन्या संस्कृती नदीकाठी जन्माला आल्या, आणि माणसाने आपली पहिली पावलं नदीच्या साक्षीने टाकली. केवळ पिण्याच्या पाण्याचा न आटणारा स्रोत म्हणून नदीच्या जवळ आलेला माणूस त्या नदीला देव मानू लागला, आई मानू लागला. आज त्याच माणसाच्या करणीने अनेक नद्या मृत्युपंथाला लागल्या आहेत. असो. पण परत तोच प्रश्न आहे, की नदी का असते? ती का वाहते? एका ठराविक मार्गाने जाण्याची तिला का ओढ असते?
मी जेव्हा माझ्या डॉक्टरेटची सुरुवात केली, तेव्हा माझा भर साहजिकच माझ्या मुख्य विषयावर, म्हणजे नर्मदेच्या गाळाच्या खडकांवर होता. या खडकांमध्ये गेल्या 1-2 लाख वर्षांच्या आठवणी जपलेल्या आहेत. प्रत्येक दगड म्हणजे एक इतिहासाचं पुस्तक. त्यांची रचना, त्यांचा पोत, रंग, त्यातले घटक यांचं नदीच्या प्रवाहाशी अतूट नातं आहे. नदी कुठून वाहत होती, तिने वाहता वाहता किती प्रकारच्या खडकांचा सामना केला, तिच्या दिशा कशा बदलत गेल्या, सरळ पात्र बघता बघता नागमोडी कसं झालं, आणि त्या प्रक्रियेत किती प्रचंड बदल झाले या सगळ्या गोष्टी हे दगड बोलू लागले की थक्क व्हायला होतं. मग मजा अशी व्हायला लागली, की नदीच्या या अनेक प्रक्रियांची, तिच्या काठी असलेल्या जीववैविध्याची रोज नव्याने जाणीव होत असल्याने पुन्हा नेहमीचा प्रश्न पडू लागला, की ही नदी का आहे? ही इथूनच का वाहते आहे? किती काळ हिचा प्रवास चालू  आहे आणि किती काळ चालणार आहे?
आपण जर मध्य भारताचा नकाशा नीट पाहिला, तर लक्षात येईल, की नर्मदा आणि तापी या दोनच मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत आणि बाकीच्या सा-या नद्या पूर्ववाहिनी आहेत. याचं एक सोपं स्पष्टीकरण देता येईल की  पाणी नेहमीच उताराकडे जातं वगैरे. पण प्रश्न  एवढा  सोपा नाही. दोनच नद्यांना तेवढा पश्चिमेकडे उतार का, हा प्रश्न आहेच. एक फोटो पाहूया.
वर दिलेल्या फोटोमधे एक गोष्ट अगदीच जाणवण्याजोगी आहे की शोण, नर्मदा आणि तापी या एक  ठराविक रेषा पकडून चाललेल्या आहेत. नर्मदा आणि तापी या एकमेकींना समान्तर आहेत, आणि शोण-नर्मदा  तर एकच रेषा आहे. या एकूणच सिस्टिमला आम्ही सोनाटा (SONATA= Son Narmada Tapi) रेषा म्हणतो. 1949 पासून ही रेषा का आहे यावर अनेक मतमतांतरं चालू आहेत. पण या नद्यांना वाहण्यासाठी प्रशस्त मार्ग या सोनाटाने दिला आहे, हे नक्की. आता सोनाटा ही  नेमकी काय भानगड आहे, हे थोडक्यात सांगायचं तर आज आपल्याला जी भारताची (किंवा कुठल्याही देशाची) अखंड जमीन दिसते, ती खरं तर अनेक तुकड्या-तुकड्यांची बनलेली आहे. जेव्हा  पृथ्वीचा जन्म झाला (4.5 अब्ज वर्षं), तेव्हा ती थंड होताना granite आणि तत्सम खडकांचे काही स्थिर भूखंड निर्माण झाले. या स्थिर जमिनीच्या तुकड्यांना craton  म्हणतात. हे cratons अतिशय जुने-पुराणे. त्यांचं वय साधारण 2.9 ते 4 अब्ज वर्षं  सहज असू शकतं. जगातला सर्वात जुना दगड (4.031 ± 0.003 अब्ज वर्षं) हा कॅनडा  मधल्या स्लेव्ह craton मध्ये सापडला. असो.
तर,हे cratons एकमेकांना जोडले जाऊन एक भूप्रदेश निर्माण करतात, आणि नंतर या पुराण पुरुषांवर नवीन खडकांचे थर निर्माण होउन एक सलग जमीन तयार होते (शिल्ड). उदा. भारत. भारतात असे सात craton आहेत. (फोटो पहा: 1-अरवली, 2-बुंदेलखंड, 3-सिंगभूम, 4- बस्तर, 5- पूर्व घाट, 6-धारवाड, आणि 7- दक्षिण ग्रान्युलाईट क्षेत्र).  


भारतातला सर्वात जुना दगड बस्तर craton मधला TT नाईस. त्याचं वय आहे 3.8 अब्ज वर्षं. (नाईस म्हणजे काय, TT म्हणजे काय, हे नंतर कधीतरी.)
 जिथे दोन craton जोडले जातात, त्याला शिवण ( Suture) म्हणतात. काही संशोधकांच्या मते सोनाटा ही अशीच एक शिवण आहे, आणि नंतरच्या अब्जावधी वर्षात ती रुंदावत गेली. म्हणजे, ज्या गोष्टीने नर्मदा-तापी-शोण यांना मार्ग करून दिला, ती जवळपास 2800-3000 दशलक्ष वर्षं जुनी आहे! (खरं आत्ता जे काही सांगितलं, ते सारे कादंबरीचे विषय आहेत! आत्ता सांगायला लागलो तर कायच्या काय फाफट पसारा होईल.) तूर्त आपण सोनाटाला जरा  बाजूला ठेवू, आणि नर्मदेकडे जाऊ.
नर्मदा वाहताना अनेक प्रकारच्या खडकांमधून वाहते. तिच्या उत्तरेला विंध्य पर्वताच्या  रांगा आहेत. इथल्या खडकांचं वय आहे सुमारे 540+ दशलक्ष वर्षं. तिच्या दक्षिणेला गोंडवन खडक आहेत,  त्यांचं वय आहे सुमारे 300+ दशलक्ष वर्षं. पश्चिमेला ज्युरासिक (250+ दशलक्ष वर्षं) खड़क आहेत. दक्षिण-पश्चिमेला दक्खनचे ज्वालामुखी खड़क आहेत, त्यांचं वय आहे सुमारे 65+ दशलक्ष वर्षं. पूर्वेला महाकोशल खड़क आहेत (भेडाघाटचे संगमरवर), त्यांचं वय आहे ~2000-2800 दशलक्ष वर्षं.
आता हे असं का बरं व्हावं? एका नदीच्या उत्तरेला एक प्रकारचे दगड आणि दक्षिणेला दुस-या प्रकारचे असं? मराठीमध्ये याला एक बोजड शब्द आहे प्रस्तरभंग. सुटसुटीत शब्द हवा असेल तर फॉल्ट . हे फॉल्ट जमिनीत चाललेल्या हालचाली, गडबडगोंधळ दाखवतात. होतं काय, की काही कारणामुळे दोन दगडांमध्ये भेगा पडतात (Fracture!). या भेगांवर जमिनीच्या काही हालचालीमुळे जर अजून ताण आला तर या भेगेच्या दोन बाजूचे दगड एकमेकांवरून घसरतात. आणि मग सगळी उलथापालथ होते. नवीन दगड जुन्यांच्या समोर जाउन बसतात, जुने दगड वर येतात वगैरे. नर्मदेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असे दोन faults आहेत. उत्तर नर्मदा फॉल्ट आणि दक्षिण नर्मदा फॉल्ट. गूगल अर्थ किंवा तत्सम सॉफ्टवेर मधे जर नर्मदा पाहिली, तर हे दोन्ही फॉल्ट अगदी स्पष्ट दिसतात. सोनाटा पण जवळपास सिक्किम पर्यंत जाताना दिसते (भूवैज्ञानिकांसाठी सूचना- नसते रेफरंसेस देऊन माझ्या चुका काढल्या तर खबरदार!)  असो.
या सा-या गोंधळाच्या बरोब्बर मधे माझं प्रेमपात्र. नर्मदेच्या गाळाचे खडक. हे तरुण आहेत. फार फार तर काही लाख वर्षं जुने. अगदीच परवापरवाचे.(खालच्या फोटोत गुलाबी-ब्राऊन रंगाच्या विन्ध्य खडकांवर बसलेले माझे गाळाचे खडक. त्यावर हात ठेवलेला मी.) 


तर हा सारा प्रचंड प्रचंड काळ. साधारण 2-3 अब्ज वर्षांचा. या सा-या कालावधीत काय कल्प घडून गेलं असेल...अनेकदा समुद्राचं जमिनीवर आक्रमण झालं असेल, तेही हजारो मैल आतपर्यंत. त्याच्या खुणा या सहा-सात कोटी वर्षं जुन्या खडकांनी जपलेल्या आहेत. या खडकांचं रूप आता इतकं बदलून गेलं आहे कि कधीकाळी आपण समुद्राकाठची वाळू होतो, यावर त्यांचाही विश्वास बसू नये. असे एकावर एक साचत गेलेले थर इथे आहेत. प्रत्येक थराची निराळी गोष्ट. प्रत्येक वेळी बदलत गेलेली समुद्राची खोली आणि लाटांची अगणित चक्रं. अनेकदा आलेली हिमयुगं. अफाट ताकदीच्या हिमनद्या आणि त्यांनी वाहून आणलेले भीमकाय धोंडे. जमिनीच्या प्रचंड तुकड्यांची हालचाल. त्यांना पडलेल्या घड्या, शिवणी (सोनाटा अशीच एक!). भूकंप. गगनचुम्बी वृक्षांची जंगलं. सतत बदलत्या नदीच्या दिशेने त्यांच्यावर साठलेला गाळ. त्यांचं जमिनीखाली गाडलं जाणं. परत नवीन जंगल. मग Dinosaurs. त्यांचा अंमल असलेली पृथ्वी. उल्कापात, ज्वालामुखी, विध्वंस.आणि मग अनेक अनेक वर्षांनी माणसाचं पहिलं पाऊल....परत अश्मयुग ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास. एका नदीसोबत चाललेली सा-या विश्वाची यात्रा.  
म्हणजे, एका नदीची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर कितीदा कालचक्राच्या फे-या माराव्या लागतात...गंगा-यमुना-सिंधू  यांचा प्रवास म्हणजे भारतीय भूपृष्ठाचा प्रवास. म्हणजे साधासुधा नाही, तर तब्बल 61  दशलक्ष वर्षांचा प्रवास आणि युरेशियन भूपृष्ठाशी  त्याची झालेली टक्कर.ही गोष्ट म्हणजे हिमालयाची गोष्ट.
तापी-नर्मदेची कहाणी सुरु होते ती भारतीय भूमि कशी  तयार झाली इथपासून. अजून चिकाटी असेल तर थेट पृथ्वीच्या जन्मापर्यंत. या अचाट  विस्तारात आपण किती छोटे आहोत याची पदोपदी जाणीव होत राहते फक्त. नदीचं मूळ शोधू नये म्हणतात ते म्हणूनच  असावं कदाचित.

Tuesday, May 1, 2012

मा रेवा थारो पाणी निर्मल...

"वा वा, डॉक्टरेट करतोयस का? कुठल्या विषयात?"
"जीओलॉजी मध्ये" 
"अच्छा, झुलॉजी!!"
"नाही हो,  जीओलॉजी"
"बरं, म्हणजे ते उत्खनन वगैरे! वा वा!"
"नाही नाही, ते आर्कीऑलोजी हो काका.."
"बरं, बरं, म्हणजे ते डायनोसोरची अंडी, ज्वालामुखी वगैरे! आम्ही पाहतो ना डिस्कव्हरी वर. छान छान!"
"नाही म्हणजे...हो म्हणजे...आता कसं सांगू?"
"बरं, मग नक्की विषय काय तुझ्या डॉक्टरेट चा?"   

पुढचा संवाद लिहिण्यात खरंच काही अर्थ नाही. या इंग्लिश सिनेमांनी निर्माण केलेला हा घोळ आहे. खरं सांगू का? आमचं काम अत्यंत रुक्ष आणि कंटाळवाणं असतं (पाहणा-यासाठी). गंमत, किंवा काहीतरी adventure म्हणून सोबत येणारे, गावात गेल्यावर बघे गावकरी, हे  पाच मिनिटात माघार घेतात असा माझा अनुभव आहे. त्यात मी sedimentologist. जगातले सगळे चक्रम बनवून झाले, तेव्हा देवाने त्यांचा अर्क काढून काही मोजके नमुने निर्माण केले, ते हेच. आमचा कुठला ना कुठला स्क्रू ढिला असतो हे प्रथमदर्शनीच लक्षात येतं. असो. थोड्या टेक्निकल गोष्टी सांगतो, म्हणजे पुढच्या (रटाळ) लिखाणात काही अडायला नको. अजून माहिती हवी असल्यास इथे मिळेल. यापुढे दिलेल्या लिंक अजून माहिती हवी असेल तर खरंच उघडून पहा.

Geologist म्हणजे भूशास्त्रज्ञ. यातले प्रमुख दोन प्रकार म्हणजे फिल्ड geologist  आणि lab  geologist. दोन्ही प्रकार सारखेच चक्रम असतात. अजून तीन प्रमुख प्रकार म्हणजे igneous (अग्निजन्य), sedimentary (स्तरीत) आणि metamorphic (रूपांतरित) या खडकांवर काम करणारे. पैकी पहिला आणि तिसरा प्रकार हे काय बोलत असतात देव जाणे. यांच्या उड्या मोठ्या. एकदम हजार किलोमीटर जमिनीखाली किंवा थेट मिटीओराईट्स.  मी मुख्यत्वे sediments वर काम करतो, आणि फिल्ड आणि lab  या दोन्ही प्रकारात मोडतो. आम्ही फार उड्या मारत नाही. आमची धाव surface वर. फार फार तर काही किलोमीटर खाली किंवा समुद्राचा तळ. असो.
आम्ही काळाच्या बाबतीत अत्यंत उदार लोक आहोत. दहा लाख वर्षं म्हणजे अगदी परवा परवाचा काळ. फार जुना काळ म्हणजे तीनशे कोटी वर्षं वगैरे. पृथ्वीचा जन्म झाला चारशे साठ कोटी वर्षांपूर्वी, आणि तेव्हापासून आत्तापर्यंतच्या काळाचे आम्ही  चार  तुकडे केले आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि क्वाटरनरी. (खरी नावं जरा गजबज आहेत. फारच  कुतूहल असेल तर..)
मी ज्या कालखंडावर काम करतो आहे तो आहे  क्वाटरनरी. सुमारे २.६ दशलक्ष ते १०,००० वर्षांपूर्वीचा हा काळ पृथ्वीच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ आहे. आज जी काही जमिनीची रचना आपण पाहतो, तिची पायाभरणी याच काळात झालेली आहे. अनेक 'आईस  एजेस' याच काळात येऊन गेली आणि माणसाची उत्क्रांती याच काळात झाली. आज वाहणा-या गंगा, यमुना, नर्मदा या नद्या  त्याही काळात वाहत होत्या, आणि त्यांनी आणलेल्या गाळात आजही त्यावेळच्या आठवणी जपलेल्या आहेत.

नीट पाहिलं, तर लक्षात येतं की नर्मदेचा त्यावेळचा (२.६ दशलक्ष वर्षं पूर्वील) परिसर हा एखाद्या आफ्रिकन मैदानासारखा होता. काय काय मिळतं तिच्या गाळात? हत्ती, पाणघोडे, मगरी, गायी, काळवीट, म्हशी यांची हाडं, दात. शंख शिंपले. माणसाची एक कवटी (१९८४ मध्ये डॉ. अरुण सोनाकीया यांना सापडली. भारतातला आदिमानवाचा एकमेव विश्वसनीय पुरावा) झाडांची जुनी, दगड झालेली मुळं. अश्मयुगीन हत्यारं. याशिवाय अनेक वेळा भूजल पातळीत बदल झाल्याच्या, नदीची दिशा बदलल्याच्या  खुणा या गाळाच्या खडकांनी जपलेल्या आहेत. नदीला पूर येतो तेव्हा अतिशय बारीक वाळू (फ्लडप्लेन silt) ती आपल्या पात्राच्या  बाजूला आणून टाकते. अशा silt चा अफाट विस्तार. म्हणजे अगदी परवा परवा ही नदी  कशी जबरदस्त असेल..हिच्या पुरांनी किती वेळा कल्लोळ माजवला असेल..जेव्हा गोटे, वाळू, नदीतून वाहतात तेव्हा त्यांचं एकूण प्रमाण, आकार, रचना यावरून त्या नदीचा वेग, दिशा यांचं अनुमान करता येतं. नदीची वळणं कशी बदलत गेली, तिचं पात्र कसं होतं, सरळ का नागमोडी हे सांगता येतं. हे झालं अगदी वरवरचं. जेव्हा microscope किंवा  इलेक्ट्रोन microscope ची दुनिया समोर उघडते तेव्हा अजूनच थक्क व्हायला होतं. लहानशा वाळूच्या कणात माहितीचा समुद्र. नदीतून झालेल्या प्रवासाच्या अगणित खुणा. पाण्यात विरघळलेल्या क्षारांनी उमटवलेले खळगे. दगडाचा 2X2 से.मी आकाराचा तुकडा, त्याचा ठसा  त्याच्या सगळ्या प्रवासाची कहाणी सांगतो आहे. वाळूचा एक एक कण आपण कुठून आलो हे सांगतो आहे. झाडांच्या मुळांनी अन्न मिळवताना केलेल्या खटपटी या लहानशा ठशात स्पष्ट दिसतायत. लाखो वर्षांपूर्वी कोसळलेल्या दरडी आजही इथल्या डोंगरपायथ्याशी तशाच आहेत. एक एक गोष्ट अशी उलगडत जाते. नदीचा सारा प्रवास दिसायला लागतो. अनेक बदल. त्या बदलांनी आकारलेलं निसर्गचक्र. या सा-या अफाट पसा-यात मी कुठे आहे? माणूस कुठे आहे? या नदीकाठी दगडाची हत्यारं करणारा माणूस आज नर्मदेवर बांध घालतो आहे, पूल बांधतो आहे. नदीत जसा बदल होत गेला तसा माणसातही. बदललेल्या माणसाने परत नदीत बदल केले. आता पुढचा बदल आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? आज नर्मदेकाठी काम करताना वाळूत पाउल उमटल्यावर सहज विचार येतो, की पुढच्या पुरात या  ठशावर वाळूचं पांघरूण घातलं जाईल. काही हजार वर्षांनी कोणीतरी जेव्हा हा वाळूचा दगड फोडेल तेव्हा त्याला तो दिसेल. काय कल्प घडून गेलेलं असेल तोवर? तोवर माणूस असेल का? असला तर ही नदी असेल का? नदी नसली तर माणूस तरी का असेल?

नर्मदामाई अनादीकाळापासून (म्हणजे क्वाटरनरीच्या आधीपासून) वाहते आहे.आजही वाहते आहे.  गेली तीन वर्षं मी या नदीमध्ये काम करतो आहे. मध्य प्रदेशातल्या भोवंडून टाकणा-या उन्हात मी फिरलो आहे, इथली सुरेख थंडी मी पहिली आहे. नर्मदेकाठी दिसणारे अप्रतिम सूर्यास्त, काळवीटांचे देखणे कळप मी पहिले आहेत. जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा मी नर्मदेत दिवे सोडलेले आहेत. आईशी खेळावं, दंगामस्ती करावी तसा मी या नदीच्या अंगाखांद्यावर खेळलो आहे, पोहलो आहे. उंच किना-यावरून खालच्या अथांग पात्रात मी अनेकदा उड्या मारल्या आहेत.  पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे  इथल्या माणसांनी मज वनवाशाला अकारण स्नेह दिला आहे. मी जे काम करतो आहे त्याने त्यांचा काही फायदा नाही. त्यांच्या आयुष्यात या कामाने काहीच फरक पडणार नाही, हे मला आणि त्यांनाही माहित आहे. तरी मी उन्हात थकून बसलेलो असताना कितीकदा यांनी मला पाणी दिलेलं आहे, नको नको म्हणत असताना घरी नेऊन पाहुणचार केलेला आहे. काहीजण केवळ मदत करायची म्हणून माझी जड हातोडी आणि दगड भरलेली bag घेऊन माझ्यासोबत भर उन्हात चालले आहेत. कित्येक परिक्रमावासींनी काहीही न घेता, न मागता माझ्यासाठी तोंडभरून आशीर्वाद दिले आहेत. वाट चुकल्यावर मला बरोबर वाटेवर पोचवायला काहीजण मैलोनमैल चालले आहेत. अनेक जणांनी आलेल्या पाहुण्याला चांगले दगड दाखवायचे म्हणून आपली कामं सोडून मला उत्तम sections दाखवले आहेत. याइथे काम करताना मजसारख्या नास्तिकाच्याही मनात हालचाल व्हावी इतका  इथल्या लोकांचा त्यांच्या नर्मदामैय्येवर जीव आहे. न दिसणा-या देवापेक्षा सतत सोबत असलेली नदीच बरी, नाही का? 

हा प्रवास काही फार भव्य नाही. मी सामान्य आहे, माझा प्रवासही तसाच छोटा आहे. त्यात काही असामान्य घडणार नाही. पण जे मला न मागता मिळालं आहे त्यानेच माझी झोळी भरून गेली आहे. हा प्रवास अजून संपलेला नाही. संपू नये अशी माझी इच्छा आहे. डॉक्टरेटची एक सुरळी कधी मिळायची ती मिळेल. पण तो या प्रवासाचा शेवट ठरू नये. जिथे तिथे माझे जुळलेले धागे सलग राहावेत म्हणजे झालं...

Thursday, November 10, 2011

एका (सरकारी) पावसाळ्याचा जमाखर्च

पाहता पाहता एक वर्ष झालं. वर काही महिनेही उलटून गेले असतील.
तसं पाहिलं तर एक वर्ष हा फार मोठा कालावधी नाही. त्यातही माझ्यासारख्याच्या आयुष्यात तर एक वर्ष गेलं काय, किंवा शंभर वर्षं गेली काय, विशेष फरक काय पडणार? शरीर आणि मनावर ठसे उमटवण्यापलीकडे काळ विशेष काय करणार माझ्या आयुष्यात? मग हे लिहायचा अट्टाहास तरी कशाला? रिकाम्या मनाला रिझवण्यापलीकडे काय उपयोग आहे याचा? एका वर्षापूर्वी मी घर सोडून माझ्या पोटामागे जाताना एक पोस्ट लिहून गेलो होतो. त्यावेळी लिहायचा उद्देश केवळ मनात जमा झालेलं सारं ओकून टाकायचं असा होता. आत्ताचाही उद्देश काही फार निराळा नाही. हे एका अर्थी स्वगत आहे, एका अर्थी प्रकट आहे.
बाकी स्वत:बद्दल लिहायचं (आणि स्वत:बद्दल लिहीतच राहायचं) ही काही फार चांगली गोष्ट नाही, पण दुसरं भांडवल आहे काय माझ्यापाशी? जी.एं नी कुठेतरी लिहिलंय की लिहिणा-याचं आयुष्य त्याच्या लेखनात शोषलं जातं. मी काही लेखक नाही, पण एकंदरीत आपल्याच आयुष्याकडे पाहत राहायचं, आपल्याच मनाचे टवके आपणच उडवत राहायचे असा हा सारा खेळ आहे. कागदावर, किंवा स्क्रीनवर मांडलेले हे तुकडे कोणीतरी पाहतं इतकंच, पण त्याने तरी फरक असा काय पडतो? एकदा लिहून ते दुस-याने पाहावं अशी अपेक्षा ठेवली की ते लिहिलेलं परकं होऊन जातं. मग कोणी भलं-बुरं म्हणावं अशी अपेक्षाही अपराधी वाटायला लागते. मग हे ठेवावं का आपल्यासाठी? का अजून काही अनुभव दूर करून टाकावेत आपल्यापासून? जाऊ दे. जसा हात आणि डोकं चालत राहील त्यामागे जात राहावं झालं. बाकीचे विचार आत्ताच कशाला? (बाकी लिहिणं हा स्वान्त:सुखाय असा उद्योग आहे, आणि म्हटलं तर काहीसा आधारदेखील यात शंका नाही. निदान वेळ तरी बरा जातो. तर सांगायचा मुद्दा असा, की जे काही आत्ता लिहिलं जाणार आहे, ते अत्यंत विस्कळीत, असंस्कारित, कंटाळवाणं, अघळपघळ, आणि पाल्हाळीक असणार आहे. त्यात प्रथमपुरुषी एकवचनी अव्यय अनेकदा येणार आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे.)
या एका वर्षाने काय काय दिलं? घर सोडून जाताना ओले झालेले डोळे त्यानंतरही दोन-तीन वेळा परत भिजले. पण आठवणी म्हटल्यावर पहिल्यांदा हेच का आठवावं? चांगल्या आठवणींचेही कितीतरी तुकडे झोळीत आहेत की. हिमालयापासून समुद्रापर्यंत केलेला वीस हजार मैलांचा प्रवासही गाठीशी आहे. थंड रात्री जमलेल्या मैफली, रात्र रात्र जागून केलेले रिपोर्ट आणि प्रेझेंटेशनं, पकडलेले साप-विंचू-ससे-बेडूक-खेकडे, विंचू चावून सुजलेले हात,  डीहायड्रेशनमुळे गलितगात्र होणं, त्यावर केलेले अर्वाच्य विनोद, वेळी अवेळी रंगात आलेल्या क्रिकेट म्याचेस, त्यात शेकून निघालेले गुडघे किंवा जबडे, हेपण आहे की गाठोड्यात. लिहावं का याविषयी? का जपून ठेवायच्या या आठवणी? सहा महिन्यांच्या सतत प्रवासानंतर निरोप घेताना लहान मुलासारखे झालेले माझे मित्र..सांगावं का हे? मागे काही बांधून ठेवायचं झालं तर या आठवणीच आहेत माझ्याकडे. बाकीच्या जगाच्या दृष्टीने जरी मी 'सेटल' झालेलो असलो, तरी माझं स्वत:चं ज्याला म्हणता येईल अशा या आठवणीच आहेत जमलेल्या. बाकी साचलेला पैसा माझा नाही (असा आहेच किती?), की बाकी निरर्थक वस्तूंचा गाळपण माझा नाही. आणि वर्षापूर्वी पडलेला प्रश्न आत्ताही अनेकदा मजपुढे येऊन उभा राहतो, की ज्या गोष्टी माझ्या नाहीत, त्या जमा करणं आणि सतत करत राहणं हेच आयुष्य आहे का? जोवर मी का जगतो आहे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, तोवर मी स्थिरावलो आहे हे म्हणण्याला तरी काय अर्थ? वर्षभरापूर्वी काढलेली प्रश्नचिन्हं एका वर्षानंतर अजूनच मोठी झालीयेत. अजूनही थोरोचं पुस्तक वाचलं की अनेक प्रश्न भोवती गोळा होतात आणि मन खाली जाते आपोआप. आपलं घर, आपला पैसा, आपल्या वस्तू आणि आपण जगतो ते आयुष्य हे सारं किती वरवरचं आहे याची जाणीव त्रास देऊ लागते. आपण 'चलती चाकी' मध्ये आहोत आणि हळूहळू भरडून निघत आहोत हे पाहून निर्विकारपणे खांदे उडवायची लाज वाटायला लागते. महिना काही हजार रुपये मिळतात म्हणून आपण काय काय करतो! चार लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून आपण आपल्यावर किती झाकणं घालून घेतो..शेवटी हा सारा खेळ कोणासाठी आहे? माझ्या हळूहळू बोथट होणा-या जाणीवा ही मी काही हजार रुपयांसाठी दिलेली किंमत आहे?
ही नोकरी करतो म्हणजे मी देशाची सेवा करतो असा भ्रम सुदैवाने मला झालेला नाही. नकाशावर काढलेल्या अर्थहीन रेषाही आता खुज्या वाटू लागल्या आहेत. समजा एखाद्या धरणाची जागा मी सांगितली तर नंतर होणा-या नाशाला मी जबाबदार ठरत नाही का? केवळ कामासाठी काम करताना करदात्यांचा पैसा वाया जातो, हे पाप कोणाच्या माथ्यावर? निरर्थक उपक्रम बनवणा-यांच्या, का हे काम निरर्थक आहे, हे माहित असूनही त्यात पगारासाठी काम करणा-या माझ्या? एखाद्या खनिजाचा साठा शोधून काढला तर नंतर होणारी उजाड जमीन कोणाकडे बोट दाखवणार? 'विकास' या गोंडस नावाखाली जेव्हा काही आदिवासी त्यांच्या जमिनीतून मुळासकट उपटले जातात, लाखो प्राणी बेघर होतात,  तेव्हा कोणालाच अपराधी कसं वाटत नाही? मग केवळ दोन वेळचं अन्न-वस्त्र, या एका गरजेपोटी मी या पापाचा भार वाहतो आहे का? काय उत्तर देणार? वर्षभरापूर्वी जर का मी गोंधळलो असेन तर आत्ता हा गोंधळ अजूनच वाढलेला आहे. आणि सरकारी नोकरीचं व्यवच्छेदक लक्षण असणा-या कटकटी, वैफल्ये याला तोंड देताना हेच मुलभूत प्रश्न मला त्रास द्यायला लागलेले आहेत.
आपण किती खोटं आयुष्य जगत असतो? आपण आपल्या गरजा किती वाढवत असतो? तेही मला अमुक इतका पगार आहे, आणि मी तो असा खर्च करतो हे दाखवण्यासाठी? "अरे, अशा गाड्या मायलेजसाठी घ्यायच्या नसतात!" अशी वाक्यं मला तरी आता विकृत वाटतात. laptop झाला, आता आयपॅड. blackberry टाका, आयफोन घ्या, कारण तो घेण्याची तुमची परिस्थिती आहे हे जगाला दिसलं पाहिजे. पैसा हा होडी चालेल इतपतच असावा ही कबीराने पैशाची जी किंमत सांगितली आहे, ती या एका वर्षात पैसे मिळवल्यानंतर पूर्णपणे पटली, ही या वर्षाची जमेची बाजू.
या एका वर्षात अजून एक मोठा फायदा हा झाला की एकट्याने दिवस काढायची सवय झाली. घरापासून अडीच-तीन हजार किलोमीटर दूर  राहायचं या जाणीवेने पहिले काही दिवस परीक्षा पाहिली, पण नंतर सवय होत गेली. आता वाटतं की एकटेपणासारखा दुसरा सोबती नाही. ब-याच आधीपासून जडलेला हा एकटेपणा असा अचानक सोबतीला आला. गोनीदांची एक कविता आहे-
'आलो येथवर पावला पाऊली
वरती वडाची शीतल साउली..
सावळी  सावली देखीली रेखिली
गाईन म्हणतो एखादे गाणे
कधी काळीचे एकटवाणे...  
नका होऊ गोळा, एकला असू..क्षणिक स्मृतींनी मुसमुसू..
माझ्यावरती मजला रुसू द्या
छ्पराखालती मजला बसू द्या..'
अशा जातीचं एकटेपण, 'आपुलाची वाद आपणाशी', यात किती सुख आहे! गाणं, पुस्तकं यातल्या ज्या गोष्टी भोवती सदा गलबला असताना लक्षात येत नाहीत, त्या एकटेपणी लक्षात येतात. जर भोवतालचा गलबला फारच वाढला, तर कासवासारखं स्वत:ला बंद करता येतं, ही या नोकरीची देणगी. 'हम सब माही, सब हम माही, हम है बहुरी अकेला' हे म्हणणारा कबीर एवढा आपलासा यापूर्वी वाटला नव्हता. आयुष्याच्या अखेरीस जेव्हा सारी आतड्याची माणसं पुढे जातील, तेव्हाचा निष्प्रेम, निर्भेळ एकटेपणा समोर आल्यावर काय होईल ते माहित नाही, पण आत्ताचा एकलकोंडेपणा तरी सोबत्यासारखा वाटतो आहे हे खरं.  
असो. अजून बरंच काय काय मनात आहे, पण फार भरकट भरकट होण्यातही अर्थ नाही. हात राखून लिहितानाही एवढा फाफटपसारा झाला. आवरतं घ्यावं हे बरं. परत एकदा अर्धविराम. 

Tuesday, November 8, 2011

परत एकदा मुकुल शिवपुत्र...


रात्रीचे दोन वाजले आहेत. ठाण्याच्या एका एस.टी stand वर मी आणि अजून एक मित्र असे दोघे उभे आहोत. याआधी दादर ते ठाणे असा प्रवास उभ्याने केलाय, त्याहीआधी बसच्या शोधात दादर ईस्ट ते दादर वेस्ट अशी पायपीट केलीये. त्यामुळे पाय जरा अवघडलेले, डोळ्यांवर झापड आलेली.
नाशिकची एस.टी येते. खच्चून भरलेली. आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक चेह-यांनी पाहतो. इतक्या रात्री बस इतकी भरू शकते याची कल्पना नाही, आणि नाशकाला जाण्याची ही शेवटची संधी. घुसा तिच्यायला!
बस चालू होते. आम्ही डगमगत उभे. अखेर हौद्यात थोड़ी जागा बघून आम्ही बसकण मारतो. पाठ एका सीटच्या कोप-यावर आणि डोकं दुस-या सीटच्या कडेवर अशा दोन-तीन डुलक्या होतात. मधेच जाग आल्यावर आपला कुठलाही प्रवास साधा न होता आयुष्यभराचा किस्सा कसा होतो यावर चर्चा होते. आजुबाजुचे झोपलेले पाशिन्जर झोपेतच कपाळाला आठ्या घालतात. माझ्या झब्ब्याला एव्हाना कफनिची कळा आलेली, मित्राचा short कुडता धुळकटलेला. अपूर्व अवतारात आम्ही नाशिकमधे उतरतो. पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत. जितकी करता येईल तितकी स्वच्छता करून आम्ही पिंपळपार गाठतो.
पहिल्या गायकाचा  रति भैरव संपत आलेला आहे. तो कधी संपतो हेदेखील लक्षात येत नाही, निदान माझ्या तरी. टाळ्या वाजतात. आता माझी नजर मंचावर. पहिल्यांदा दोन तानपुरे येतात. पाठोपाठ दुसरा गायक. पहिल्या गायकाशी तो दोन शब्द बोलतो, आणि तानपुरे लावण्यात गढून जातो.
मानपत्र वगैरे सोपस्कार होतात. हार-तुरे होतात. टाळ्यांचा गजर होतो. आत्ताआत्ता मंचावर आलेला गायक या सा-यात निर्विकार आहे. काहीसं मिस्किल हसू त्याच्या चेह-यावर क्षणभर चमकून जातं. तो तानपुरे लावण्यात गर्क आहे. त्याच तंद्रीत तो सत्कार स्वीकारतो. प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि पुन्हा तानपु-यांच्या मागे लागतो. एव्हाना पेटी-तबला लागले आहेत.
तानपुरे आता सुरेख लागलेले आहेत. गायक त्यांच्यात आपला स्वयंभू, भरदार षड्ज मिसळतो. आता इथे प्रेक्षक नाहीत, हार-तुरे नाहीत, की काही नाही. आता इथे फ़क्त तोडीचं राज्य आहे.
हलके हलके पहाट तोडीच्या सुरांनी उजळत जाते. जाणवेल असा धारदार मध्यम, कोमल धैवत. पंचमाला ज़रा बाजूला बसवल्यासारखं. हा सारा अनाहत नाद. मैफलीत आता किंचितही हालचाल दिसत नाही. झोपेशिवाय गेलेली सारी रात्र आणि मघाचपर्यंत बोलणारे सारे स्नायू यांचा विसर पाडणारा एक एक सूर. सारी मैफल झपाटल्यासारखी स्तब्ध, निश्चल आहे. हे गाणं निश्चितच या लोकीचं नाही. हे केवळ ताल-लय-सुरांच्या दृश्य बन्धनात बांधलेलं नाही. हे सारं त्याही पलिकडचं आहे. जिथे मन-बुद्धीची झेप अपुरी पड़ते तिथून आलेलं. इथे प्रत्येक सूर अस्वस्थ करणारे प्रश्न विचारतो आहे, कसलीतरी अनामिक आस लावतो आहे. प्रत्येक सुरात, प्रत्येक आलापात थक्क करणारी, अलौकिक प्रतिभेची झेप आहे. गाणा-याने स्वत:च्या आनंदासाठी गावं, आणि नकळत इतरांची आयुष्यं सुखाची करावीत असा हा सुन्दर व्यवहार. 
हलकेच डोळे पाणावू लागतात. 
अंगावर मोती उधळल्यासारखे सूर...किती वेचावेत आणि किती सोडावेत?
आनंदाची परमावधि झाल्यावर नेमक्या क्षणी तोडी संपते. क्षणभर थांबून तो बहादुरी तोडी सुरु करतो. मी मी म्हणणारे चकित होतील अशी आलापी तो लीलया दाखवतो. श्वास रोखून धरावा अशा अवघड जागा कमालीच्या सहजतेने पार करतो. अत्यंत वक्र चलन त्याच्यासमोर शहाण्यासारखं वागतं आहे. हा देखणा राग याच्या सुरांनी अजूनच देखणा वाटतो आहे.  सारे चकित. दंग. दाद देण्याचंही भान कोणाला नाही. आजवर ऐकलेल्या सा-या बहादुरी तोडी माझ्या मनातून फिरून जातात. आत्ताच्या बहादुरीचं लावण्य काही औरच. अशी तोडी ना कुणी गायली, ना कधी ऐकली. माझ्या थिट्या स्मरणात तरी याला तोड सापडत नाही.
आता सकाळ पूर्ण उजळली आहे. मंचाच्या मागे असलेला पिंपळ सोनेरी झालेला आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात मधूनच.
टाळ्यांचा आवाज विरतो.
शांतपणे तो भजन सुरु करतो. इडा, पिंगला, सुषुम्ना या नद्या असलेलं शरीर, त्यात अडुसष्ट तीर्थं. सारी सृष्टि याच एका घटामध्ये. अबोल करणारे शब्द. कुठेही घाई नाही, कुठेही चमत्कृति नाही. नदी वहावी तसा शब्दांचा ओघ वाहतो आहे.
मैफल संपते. क्षण-दोन क्षण शांतता. मग टाळ्यांचा कडकडाट होतो. गायक औपचारिकपणे दोन शब्द बोलतो. आता लोकांचा ओघ मंचाकड़े. गर्दीतून अनेक मोबाईल उंचावले गेलेले. फोटो निघत आहेत. आवराआवर सुरु झाली आहे. एक एक करत साथीदार मंचामागे जातात.

रंगमंचाभोवती दाटलेली गर्दी, आणि मंचावर आपल्यातच हरवलेला मुकुल शिवपुत्र...      

        

Monday, July 4, 2011

जो जे वांछील तो ते लाहो- भाग दुसरा

सुरुवातीलाच एक मस्त गोष्ट सांगतो. भालचंद्र नेमाडे लिखित 'हिन्दू- जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीच्या निमित्ताने कुठेसा परिसंवाद होता. या कुठेशा ठिकाणच्या हिन्दुत्ववादी संघटनांची वक्रदृष्टि 'अडगळ' या शब्दावर पडल्याने नेमाडे यांना पोलिस संरक्षणात बाहेर काढावं लागलं (सन्दर्भ- 'अनुभव' मे २०११). तात्पर्य काय, तर गेल्या भागात दिलेली यादी लांबवणं हे काही जड़ काम नाही. वर दिलेल्या आणि तत्सम अनेक स्वनामधन्य संघटना ही यादी कुठे तोकडी राहू नये याची पूरेपूर काळजी घेतायत आणि त्यामुळे माझी ही उदात्त मंगल मातृभूमि आणि उदात्त मंगल सनातन परम्परा शाबूत आहे, कलियुग असूनदेखील!
माझ्या पापी मेंदूत परत एकदा प्रश्नांचा तोफखाना चालू झालेला आहे. पहिला प्रश्न म्हणजे संस्कृतिची व्याख्या काय? ज्या गोष्टी आपले पूर्वज काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी करत होते त्याच आपण आजही करणं म्हणजे संस्कृती किंवा परम्परा असं म्हणता येईल का? माझे पणजोबा नित्यनेमे संध्या करत म्हणून मी आजही स्वत:ला कुठलेही प्रश्न न विचारता संध्या केलीच पाहिजे का? नाही केली तर माझ्या ब्राह्मण्यावर असे काय डाग पडतात? किंवा लोकमान्यांनी काहीशे वर्षांपूर्वी चालू केलेला गणेशोत्सव आज ज्या पद्धतीने साजरा होतो त्याला संस्कृती म्हणायचं का? कुठेतरी काहीतरी गल्लत आहे..व्याख्या चुकीची, म्हणून त्यावर उभारलेला डोलारा चुकीचा. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत चाललेला, किम्बहुना काही राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी जोपासलेला सांस्कृतिक दहशतवाद हे कशाचं द्योतक आहे? आपण सुसंस्कृत असल्याचं? काहीच स्वीकारण्याची आपली तयारी नाही? उद्या जर का एखाद्या वंदनीय विभूतिला कमीपणा आणणारा विश्वसनीय पुरावा सापडला तर आपली काय भूमिका असणार आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर नाहीये आपल्याकडे. कारण असा पुरावा लोकांपुढे ठेवण्यापूर्वी पहिला विचार हाच असेल की कोणी आपलं पुस्तक जाळणार तर नाही? कोणी आपल्या तोंडाला काळं तर फासणार नाही? कुठेतरी फिर्याद झाली तर? कोणी खुनाची धमकी दिली तर? घरावर दगडफेक झाली तर? आणि जोवर असे विचार आपल्या विचारवंत, कलाकार, लेखक यांच्या मनात येत आहेत, तोवर आम्ही सुसंस्कृत आहोत असं म्हणायची आपल्याला लाज वाटली पाहिजे.
सध्या एकंदरीत धर्म, संस्कृती, परम्परा, इतिहास, यांना बरा बाजारभाव आलेला आहे. देश भ्रष्ट राजकारणी लोकांच्या पूर्ण घशात गेलेला असताना आमच्याइथे गाईला राष्ट्रीय प्राणी जाहिर करा ही मागणी जोर धरते, आणि भ्रष्टाचाराशी लढा देणा-यांपेक्षा "मला हम्मा! मला हम्मा!" असं ओरडणारे हे बालिश लोक जास्त गर्दी खेचतात. गंगेच्या पर्यावरणासाठी उपोषण करून मेलेल्या स्वामीपेक्षा वाट्टेल ते बोलणारा रामदेवबाबा आम्हाला जास्त जवळचा वाटतो. एम्.एफ. हुसेन, तसलीमा नसरीन, हे आमच्या देशात गुन्हेगाराचं आयुष्य जगावं लागू नये म्हणून देश सोडतात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आणि पूर्वाश्रमीचे गुंड आमच्या देशात नेते म्हणून दिमाखात मिरवतात. असा विरोधाभास हीच जर आपली सुसंस्कृतपणाची व्याख्या असेल तर आम्ही सहिष्णू आहोत आणि आमच्या घटनेने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्हाला बहाल केलेलं आहे असा टेंभा आपण का म्हणून मिरवावा? कोणी आता मला त्वेषाने विचारेल की आमच्या संस्कृतीचा, इतिहासाचा, परंपरेचा अपमान आम्ही का म्हणून सहन करायचा? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही काहीही लिहो, बोलो, ते आम्ही का ऐकून घ्यायचं? पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात निषेध करायचं स्वातंत्र्य पण अंतर्भूत आहे, हे विसरून चालणार नाही. माझा मुद्दा हाच आहे की एक पुस्तक लिहिलं, एक चित्र काढलं, एक सिनेमा काढला, एक नाटक लिहिलं म्हणून कलाकारांच्या गर्दना मारायची किंवा त्यांची घरं जाळायची भाषा करणे हे इराण-इराक-अफगाणिस्तान इथे सर्रास चालणारे प्रकार आहेत. पण हेच प्रकार आज भारतातपण चालू आहेत. मग या देशांना मागासलेले, रानटी असं जर आपण म्हणत असू तर आपण कोण आहोत?
आठशे वर्षांपूर्वी आपल्या देशात होऊन गेलेल्या संत ज्ञानेश्वरांनी 'जो जे वांछील तो ते लाहो' असा वर मागितला. ज्याला जे वाटतं ते निर्भयपणे सांगता येणं हा अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याइतकाच मूलभूत अधिकार आहे. असो. हे सारं लिहावसं वाटलं ते एम.एफ.हुसेनच्या निधनानंतर जो काही तमाशा चालू होता तो पाहून. आधी लिहिताना भाग पहिला असं आगाऊपणे म्हटल्यामुळे हा पुढचा भाग पण लिहावा लागला च्यामारी. सगळे नसते ताप.

Wednesday, June 15, 2011

जो जे वांछील तो ते लाहो- भाग पहिला

आज मी फ़क्त काही घटना ओळीने सांगणार आहे, मला जितक्या आठवतायत तितक्या. मला या गोष्टींवर काहीही भाष्य करायचं नाहीये, किमान आत्ता तरी. जर आळस करता मी या लेखाचा पुढचा भाग लिहिला, तर कदाचित मी काहीतरी (निरर्थक) भाष्य करीनही, पण आत्ता तरी मला फक्त काही गोष्टींची यादी करायची आहे.

(हे लिहिताना माझ्याकडे http://en.wikipedia.org/ सोडून दुसरा कोणताही संदर्भ नाही हे एक सांगून ठेवतो. चूक-भूल द्यावी घ्यावी.)

१९७०- उत्पल दत्त लिखित अभिनित तीन नाटकांवर बंदी.

१६ डिसेंबर १९७२- विजय तेंडूलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचा पहिला प्रयोग. या नाटकामुळे काही जणांच्या भावना दुखावल्याचा आरोप, शिवसेनेचा (नेहमीप्रमाणे) जोरदार हल्लागुल्ला. प्रचंड वाद आणि गदारोळ. नाटकावर काही काळ बंदी.

१९७४- विजय तेंडूलकर लिखित 'सखाराम बाईंडर' या नाटकाचा प्रयोग. हे नाटक अश्लील असल्याचा आरोप, मूल्य वगैरे वाद्यांच्या भावना दुखावल्या. नाटकावर बंदी.

१९८९- सलमान रश्दी लिखित ' सातानिक व्हर्सेस' या पुस्तकावर भारतात बंदी.

१९९३- तस्लिमा नसरीन लिखित 'लज्जा' या पुस्तकामुळे बांगलादेशात भयंकर गदारोळ, मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या. नसरीनवर हल्ल्यांचे प्रयत्न. १९९४ मध्ये तस्लिमा नसरीन भारतात. लज्जा या पुस्तकावर भारतात काही राज्यांत बंदी.

१९९६- सव्वीस वर्षांपूर्वी हिंदू देवतांची नग्न चित्रे काढल्याबद्दल चित्रकार एम.एफ.हुसेनच्या विरोधात प्रचंड हलकल्लोळ. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या.

१९९८- एम.एफ. हुसेनच्या घरावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. हुसेन यांच्या अनेक चित्रांची नासधूस.

१९९८- 'फायर' चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला. फक्त 'सीता' या व्यक्तिरेखेचे नाव 'नीता' ठेवण्याची सूचना.

डिसेंबर १९९८- दीपा मेहता दिग्दर्शित 'फायर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी भाजपा कार्यकर्ते शिवसैनिकांचा धिंगाणा. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे अभिनंदन केले.

१९९९- 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाने कॉंग्रेस आणि इतर राजकीय पक्षांच्या भावना दुखावल्या. निदर्शने, प्रयोग बंद पाडणे इत्यादी उद्योग. नाटकावर बंदी.

२०००- मुंबई येथे 'शोध' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येणा-या तस्लिमा नसरीन यांना जिवंत जाळण्याची मूलतत्ववाद्यांची धमकी.

२०००- दीपा मेहता दिग्दर्शित 'Water ' या चित्रपटाच्या सेटची जाळपोळ. चित्रीकरण श्रीलंकेत करण्याचा निर्णय.

२००३- तस्लीमा नसरीन लिखित 'द्विखंडितो' या पुस्तकावर . बंगाल सरकारने बंदी घातली.

२००३-'गुलाबी आईना' या श्रीधर रंगायन दिग्दर्शित चित्रपटावर भारतात बंदी.

२००४- जेम्स लेन लिखित 'हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला. अनेक दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवजांची नासधूस.

बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा दावा. त्यामुळे पुरंदरे यांच्यावर अर्वाच्य टीका, न्यायालयात खटले.

२००४- एम.एफ.हुसेन यांच्या 'मीनाक्षी- टेल ऑफ थ्री सिटीज' या चित्रपटातील एका गाण्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या. चित्रपटावर बंदीची मागणी.

२००६- एम.एफ.हुसेन भारताबाहेर. नग्न भारतमातेच्या चित्रामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या. हुसेन यांच्याकडून माफीची मागणी. हुसेन यांनी माफी मागितली.

२००७- 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लों बोर्डा'ने तस्लिमा नसरीन यांचा शिरच्छेद करणा-याला ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.


बास झालं आता,लिहिता लिहिता डोकं फिरलं माझं... उरलेलं नंतर कधीतरी!!