Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Thursday, November 10, 2011

एका (सरकारी) पावसाळ्याचा जमाखर्च

पाहता पाहता एक वर्ष झालं. वर काही महिनेही उलटून गेले असतील.
तसं पाहिलं तर एक वर्ष हा फार मोठा कालावधी नाही. त्यातही माझ्यासारख्याच्या आयुष्यात तर एक वर्ष गेलं काय, किंवा शंभर वर्षं गेली काय, विशेष फरक काय पडणार? शरीर आणि मनावर ठसे उमटवण्यापलीकडे काळ विशेष काय करणार माझ्या आयुष्यात? मग हे लिहायचा अट्टाहास तरी कशाला? रिकाम्या मनाला रिझवण्यापलीकडे काय उपयोग आहे याचा? एका वर्षापूर्वी मी घर सोडून माझ्या पोटामागे जाताना एक पोस्ट लिहून गेलो होतो. त्यावेळी लिहायचा उद्देश केवळ मनात जमा झालेलं सारं ओकून टाकायचं असा होता. आत्ताचाही उद्देश काही फार निराळा नाही. हे एका अर्थी स्वगत आहे, एका अर्थी प्रकट आहे.
बाकी स्वत:बद्दल लिहायचं (आणि स्वत:बद्दल लिहीतच राहायचं) ही काही फार चांगली गोष्ट नाही, पण दुसरं भांडवल आहे काय माझ्यापाशी? जी.एं नी कुठेतरी लिहिलंय की लिहिणा-याचं आयुष्य त्याच्या लेखनात शोषलं जातं. मी काही लेखक नाही, पण एकंदरीत आपल्याच आयुष्याकडे पाहत राहायचं, आपल्याच मनाचे टवके आपणच उडवत राहायचे असा हा सारा खेळ आहे. कागदावर, किंवा स्क्रीनवर मांडलेले हे तुकडे कोणीतरी पाहतं इतकंच, पण त्याने तरी फरक असा काय पडतो? एकदा लिहून ते दुस-याने पाहावं अशी अपेक्षा ठेवली की ते लिहिलेलं परकं होऊन जातं. मग कोणी भलं-बुरं म्हणावं अशी अपेक्षाही अपराधी वाटायला लागते. मग हे ठेवावं का आपल्यासाठी? का अजून काही अनुभव दूर करून टाकावेत आपल्यापासून? जाऊ दे. जसा हात आणि डोकं चालत राहील त्यामागे जात राहावं झालं. बाकीचे विचार आत्ताच कशाला? (बाकी लिहिणं हा स्वान्त:सुखाय असा उद्योग आहे, आणि म्हटलं तर काहीसा आधारदेखील यात शंका नाही. निदान वेळ तरी बरा जातो. तर सांगायचा मुद्दा असा, की जे काही आत्ता लिहिलं जाणार आहे, ते अत्यंत विस्कळीत, असंस्कारित, कंटाळवाणं, अघळपघळ, आणि पाल्हाळीक असणार आहे. त्यात प्रथमपुरुषी एकवचनी अव्यय अनेकदा येणार आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे.)
या एका वर्षाने काय काय दिलं? घर सोडून जाताना ओले झालेले डोळे त्यानंतरही दोन-तीन वेळा परत भिजले. पण आठवणी म्हटल्यावर पहिल्यांदा हेच का आठवावं? चांगल्या आठवणींचेही कितीतरी तुकडे झोळीत आहेत की. हिमालयापासून समुद्रापर्यंत केलेला वीस हजार मैलांचा प्रवासही गाठीशी आहे. थंड रात्री जमलेल्या मैफली, रात्र रात्र जागून केलेले रिपोर्ट आणि प्रेझेंटेशनं, पकडलेले साप-विंचू-ससे-बेडूक-खेकडे, विंचू चावून सुजलेले हात,  डीहायड्रेशनमुळे गलितगात्र होणं, त्यावर केलेले अर्वाच्य विनोद, वेळी अवेळी रंगात आलेल्या क्रिकेट म्याचेस, त्यात शेकून निघालेले गुडघे किंवा जबडे, हेपण आहे की गाठोड्यात. लिहावं का याविषयी? का जपून ठेवायच्या या आठवणी? सहा महिन्यांच्या सतत प्रवासानंतर निरोप घेताना लहान मुलासारखे झालेले माझे मित्र..सांगावं का हे? मागे काही बांधून ठेवायचं झालं तर या आठवणीच आहेत माझ्याकडे. बाकीच्या जगाच्या दृष्टीने जरी मी 'सेटल' झालेलो असलो, तरी माझं स्वत:चं ज्याला म्हणता येईल अशा या आठवणीच आहेत जमलेल्या. बाकी साचलेला पैसा माझा नाही (असा आहेच किती?), की बाकी निरर्थक वस्तूंचा गाळपण माझा नाही. आणि वर्षापूर्वी पडलेला प्रश्न आत्ताही अनेकदा मजपुढे येऊन उभा राहतो, की ज्या गोष्टी माझ्या नाहीत, त्या जमा करणं आणि सतत करत राहणं हेच आयुष्य आहे का? जोवर मी का जगतो आहे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, तोवर मी स्थिरावलो आहे हे म्हणण्याला तरी काय अर्थ? वर्षभरापूर्वी काढलेली प्रश्नचिन्हं एका वर्षानंतर अजूनच मोठी झालीयेत. अजूनही थोरोचं पुस्तक वाचलं की अनेक प्रश्न भोवती गोळा होतात आणि मन खाली जाते आपोआप. आपलं घर, आपला पैसा, आपल्या वस्तू आणि आपण जगतो ते आयुष्य हे सारं किती वरवरचं आहे याची जाणीव त्रास देऊ लागते. आपण 'चलती चाकी' मध्ये आहोत आणि हळूहळू भरडून निघत आहोत हे पाहून निर्विकारपणे खांदे उडवायची लाज वाटायला लागते. महिना काही हजार रुपये मिळतात म्हणून आपण काय काय करतो! चार लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून आपण आपल्यावर किती झाकणं घालून घेतो..शेवटी हा सारा खेळ कोणासाठी आहे? माझ्या हळूहळू बोथट होणा-या जाणीवा ही मी काही हजार रुपयांसाठी दिलेली किंमत आहे?
ही नोकरी करतो म्हणजे मी देशाची सेवा करतो असा भ्रम सुदैवाने मला झालेला नाही. नकाशावर काढलेल्या अर्थहीन रेषाही आता खुज्या वाटू लागल्या आहेत. समजा एखाद्या धरणाची जागा मी सांगितली तर नंतर होणा-या नाशाला मी जबाबदार ठरत नाही का? केवळ कामासाठी काम करताना करदात्यांचा पैसा वाया जातो, हे पाप कोणाच्या माथ्यावर? निरर्थक उपक्रम बनवणा-यांच्या, का हे काम निरर्थक आहे, हे माहित असूनही त्यात पगारासाठी काम करणा-या माझ्या? एखाद्या खनिजाचा साठा शोधून काढला तर नंतर होणारी उजाड जमीन कोणाकडे बोट दाखवणार? 'विकास' या गोंडस नावाखाली जेव्हा काही आदिवासी त्यांच्या जमिनीतून मुळासकट उपटले जातात, लाखो प्राणी बेघर होतात,  तेव्हा कोणालाच अपराधी कसं वाटत नाही? मग केवळ दोन वेळचं अन्न-वस्त्र, या एका गरजेपोटी मी या पापाचा भार वाहतो आहे का? काय उत्तर देणार? वर्षभरापूर्वी जर का मी गोंधळलो असेन तर आत्ता हा गोंधळ अजूनच वाढलेला आहे. आणि सरकारी नोकरीचं व्यवच्छेदक लक्षण असणा-या कटकटी, वैफल्ये याला तोंड देताना हेच मुलभूत प्रश्न मला त्रास द्यायला लागलेले आहेत.
आपण किती खोटं आयुष्य जगत असतो? आपण आपल्या गरजा किती वाढवत असतो? तेही मला अमुक इतका पगार आहे, आणि मी तो असा खर्च करतो हे दाखवण्यासाठी? "अरे, अशा गाड्या मायलेजसाठी घ्यायच्या नसतात!" अशी वाक्यं मला तरी आता विकृत वाटतात. laptop झाला, आता आयपॅड. blackberry टाका, आयफोन घ्या, कारण तो घेण्याची तुमची परिस्थिती आहे हे जगाला दिसलं पाहिजे. पैसा हा होडी चालेल इतपतच असावा ही कबीराने पैशाची जी किंमत सांगितली आहे, ती या एका वर्षात पैसे मिळवल्यानंतर पूर्णपणे पटली, ही या वर्षाची जमेची बाजू.
या एका वर्षात अजून एक मोठा फायदा हा झाला की एकट्याने दिवस काढायची सवय झाली. घरापासून अडीच-तीन हजार किलोमीटर दूर  राहायचं या जाणीवेने पहिले काही दिवस परीक्षा पाहिली, पण नंतर सवय होत गेली. आता वाटतं की एकटेपणासारखा दुसरा सोबती नाही. ब-याच आधीपासून जडलेला हा एकटेपणा असा अचानक सोबतीला आला. गोनीदांची एक कविता आहे-
'आलो येथवर पावला पाऊली
वरती वडाची शीतल साउली..
सावळी  सावली देखीली रेखिली
गाईन म्हणतो एखादे गाणे
कधी काळीचे एकटवाणे...  
नका होऊ गोळा, एकला असू..क्षणिक स्मृतींनी मुसमुसू..
माझ्यावरती मजला रुसू द्या
छ्पराखालती मजला बसू द्या..'
अशा जातीचं एकटेपण, 'आपुलाची वाद आपणाशी', यात किती सुख आहे! गाणं, पुस्तकं यातल्या ज्या गोष्टी भोवती सदा गलबला असताना लक्षात येत नाहीत, त्या एकटेपणी लक्षात येतात. जर भोवतालचा गलबला फारच वाढला, तर कासवासारखं स्वत:ला बंद करता येतं, ही या नोकरीची देणगी. 'हम सब माही, सब हम माही, हम है बहुरी अकेला' हे म्हणणारा कबीर एवढा आपलासा यापूर्वी वाटला नव्हता. आयुष्याच्या अखेरीस जेव्हा सारी आतड्याची माणसं पुढे जातील, तेव्हाचा निष्प्रेम, निर्भेळ एकटेपणा समोर आल्यावर काय होईल ते माहित नाही, पण आत्ताचा एकलकोंडेपणा तरी सोबत्यासारखा वाटतो आहे हे खरं.  
असो. अजून बरंच काय काय मनात आहे, पण फार भरकट भरकट होण्यातही अर्थ नाही. हात राखून लिहितानाही एवढा फाफटपसारा झाला. आवरतं घ्यावं हे बरं. परत एकदा अर्धविराम. 

Tuesday, November 8, 2011

परत एकदा मुकुल शिवपुत्र...


रात्रीचे दोन वाजले आहेत. ठाण्याच्या एका एस.टी stand वर मी आणि अजून एक मित्र असे दोघे उभे आहोत. याआधी दादर ते ठाणे असा प्रवास उभ्याने केलाय, त्याहीआधी बसच्या शोधात दादर ईस्ट ते दादर वेस्ट अशी पायपीट केलीये. त्यामुळे पाय जरा अवघडलेले, डोळ्यांवर झापड आलेली.
नाशिकची एस.टी येते. खच्चून भरलेली. आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक चेह-यांनी पाहतो. इतक्या रात्री बस इतकी भरू शकते याची कल्पना नाही, आणि नाशकाला जाण्याची ही शेवटची संधी. घुसा तिच्यायला!
बस चालू होते. आम्ही डगमगत उभे. अखेर हौद्यात थोड़ी जागा बघून आम्ही बसकण मारतो. पाठ एका सीटच्या कोप-यावर आणि डोकं दुस-या सीटच्या कडेवर अशा दोन-तीन डुलक्या होतात. मधेच जाग आल्यावर आपला कुठलाही प्रवास साधा न होता आयुष्यभराचा किस्सा कसा होतो यावर चर्चा होते. आजुबाजुचे झोपलेले पाशिन्जर झोपेतच कपाळाला आठ्या घालतात. माझ्या झब्ब्याला एव्हाना कफनिची कळा आलेली, मित्राचा short कुडता धुळकटलेला. अपूर्व अवतारात आम्ही नाशिकमधे उतरतो. पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत. जितकी करता येईल तितकी स्वच्छता करून आम्ही पिंपळपार गाठतो.
पहिल्या गायकाचा  रति भैरव संपत आलेला आहे. तो कधी संपतो हेदेखील लक्षात येत नाही, निदान माझ्या तरी. टाळ्या वाजतात. आता माझी नजर मंचावर. पहिल्यांदा दोन तानपुरे येतात. पाठोपाठ दुसरा गायक. पहिल्या गायकाशी तो दोन शब्द बोलतो, आणि तानपुरे लावण्यात गढून जातो.
मानपत्र वगैरे सोपस्कार होतात. हार-तुरे होतात. टाळ्यांचा गजर होतो. आत्ताआत्ता मंचावर आलेला गायक या सा-यात निर्विकार आहे. काहीसं मिस्किल हसू त्याच्या चेह-यावर क्षणभर चमकून जातं. तो तानपुरे लावण्यात गर्क आहे. त्याच तंद्रीत तो सत्कार स्वीकारतो. प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि पुन्हा तानपु-यांच्या मागे लागतो. एव्हाना पेटी-तबला लागले आहेत.
तानपुरे आता सुरेख लागलेले आहेत. गायक त्यांच्यात आपला स्वयंभू, भरदार षड्ज मिसळतो. आता इथे प्रेक्षक नाहीत, हार-तुरे नाहीत, की काही नाही. आता इथे फ़क्त तोडीचं राज्य आहे.
हलके हलके पहाट तोडीच्या सुरांनी उजळत जाते. जाणवेल असा धारदार मध्यम, कोमल धैवत. पंचमाला ज़रा बाजूला बसवल्यासारखं. हा सारा अनाहत नाद. मैफलीत आता किंचितही हालचाल दिसत नाही. झोपेशिवाय गेलेली सारी रात्र आणि मघाचपर्यंत बोलणारे सारे स्नायू यांचा विसर पाडणारा एक एक सूर. सारी मैफल झपाटल्यासारखी स्तब्ध, निश्चल आहे. हे गाणं निश्चितच या लोकीचं नाही. हे केवळ ताल-लय-सुरांच्या दृश्य बन्धनात बांधलेलं नाही. हे सारं त्याही पलिकडचं आहे. जिथे मन-बुद्धीची झेप अपुरी पड़ते तिथून आलेलं. इथे प्रत्येक सूर अस्वस्थ करणारे प्रश्न विचारतो आहे, कसलीतरी अनामिक आस लावतो आहे. प्रत्येक सुरात, प्रत्येक आलापात थक्क करणारी, अलौकिक प्रतिभेची झेप आहे. गाणा-याने स्वत:च्या आनंदासाठी गावं, आणि नकळत इतरांची आयुष्यं सुखाची करावीत असा हा सुन्दर व्यवहार. 
हलकेच डोळे पाणावू लागतात. 
अंगावर मोती उधळल्यासारखे सूर...किती वेचावेत आणि किती सोडावेत?
आनंदाची परमावधि झाल्यावर नेमक्या क्षणी तोडी संपते. क्षणभर थांबून तो बहादुरी तोडी सुरु करतो. मी मी म्हणणारे चकित होतील अशी आलापी तो लीलया दाखवतो. श्वास रोखून धरावा अशा अवघड जागा कमालीच्या सहजतेने पार करतो. अत्यंत वक्र चलन त्याच्यासमोर शहाण्यासारखं वागतं आहे. हा देखणा राग याच्या सुरांनी अजूनच देखणा वाटतो आहे.  सारे चकित. दंग. दाद देण्याचंही भान कोणाला नाही. आजवर ऐकलेल्या सा-या बहादुरी तोडी माझ्या मनातून फिरून जातात. आत्ताच्या बहादुरीचं लावण्य काही औरच. अशी तोडी ना कुणी गायली, ना कधी ऐकली. माझ्या थिट्या स्मरणात तरी याला तोड सापडत नाही.
आता सकाळ पूर्ण उजळली आहे. मंचाच्या मागे असलेला पिंपळ सोनेरी झालेला आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात मधूनच.
टाळ्यांचा आवाज विरतो.
शांतपणे तो भजन सुरु करतो. इडा, पिंगला, सुषुम्ना या नद्या असलेलं शरीर, त्यात अडुसष्ट तीर्थं. सारी सृष्टि याच एका घटामध्ये. अबोल करणारे शब्द. कुठेही घाई नाही, कुठेही चमत्कृति नाही. नदी वहावी तसा शब्दांचा ओघ वाहतो आहे.
मैफल संपते. क्षण-दोन क्षण शांतता. मग टाळ्यांचा कडकडाट होतो. गायक औपचारिकपणे दोन शब्द बोलतो. आता लोकांचा ओघ मंचाकड़े. गर्दीतून अनेक मोबाईल उंचावले गेलेले. फोटो निघत आहेत. आवराआवर सुरु झाली आहे. एक एक करत साथीदार मंचामागे जातात.

रंगमंचाभोवती दाटलेली गर्दी, आणि मंचावर आपल्यातच हरवलेला मुकुल शिवपुत्र...