Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Tuesday, November 8, 2011

परत एकदा मुकुल शिवपुत्र...


रात्रीचे दोन वाजले आहेत. ठाण्याच्या एका एस.टी stand वर मी आणि अजून एक मित्र असे दोघे उभे आहोत. याआधी दादर ते ठाणे असा प्रवास उभ्याने केलाय, त्याहीआधी बसच्या शोधात दादर ईस्ट ते दादर वेस्ट अशी पायपीट केलीये. त्यामुळे पाय जरा अवघडलेले, डोळ्यांवर झापड आलेली.
नाशिकची एस.टी येते. खच्चून भरलेली. आम्ही एकमेकांकडे प्रश्नार्थक चेह-यांनी पाहतो. इतक्या रात्री बस इतकी भरू शकते याची कल्पना नाही, आणि नाशकाला जाण्याची ही शेवटची संधी. घुसा तिच्यायला!
बस चालू होते. आम्ही डगमगत उभे. अखेर हौद्यात थोड़ी जागा बघून आम्ही बसकण मारतो. पाठ एका सीटच्या कोप-यावर आणि डोकं दुस-या सीटच्या कडेवर अशा दोन-तीन डुलक्या होतात. मधेच जाग आल्यावर आपला कुठलाही प्रवास साधा न होता आयुष्यभराचा किस्सा कसा होतो यावर चर्चा होते. आजुबाजुचे झोपलेले पाशिन्जर झोपेतच कपाळाला आठ्या घालतात. माझ्या झब्ब्याला एव्हाना कफनिची कळा आलेली, मित्राचा short कुडता धुळकटलेला. अपूर्व अवतारात आम्ही नाशिकमधे उतरतो. पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत. जितकी करता येईल तितकी स्वच्छता करून आम्ही पिंपळपार गाठतो.
पहिल्या गायकाचा  रति भैरव संपत आलेला आहे. तो कधी संपतो हेदेखील लक्षात येत नाही, निदान माझ्या तरी. टाळ्या वाजतात. आता माझी नजर मंचावर. पहिल्यांदा दोन तानपुरे येतात. पाठोपाठ दुसरा गायक. पहिल्या गायकाशी तो दोन शब्द बोलतो, आणि तानपुरे लावण्यात गढून जातो.
मानपत्र वगैरे सोपस्कार होतात. हार-तुरे होतात. टाळ्यांचा गजर होतो. आत्ताआत्ता मंचावर आलेला गायक या सा-यात निर्विकार आहे. काहीसं मिस्किल हसू त्याच्या चेह-यावर क्षणभर चमकून जातं. तो तानपुरे लावण्यात गर्क आहे. त्याच तंद्रीत तो सत्कार स्वीकारतो. प्रेक्षकांना नमस्कार करतो आणि पुन्हा तानपु-यांच्या मागे लागतो. एव्हाना पेटी-तबला लागले आहेत.
तानपुरे आता सुरेख लागलेले आहेत. गायक त्यांच्यात आपला स्वयंभू, भरदार षड्ज मिसळतो. आता इथे प्रेक्षक नाहीत, हार-तुरे नाहीत, की काही नाही. आता इथे फ़क्त तोडीचं राज्य आहे.
हलके हलके पहाट तोडीच्या सुरांनी उजळत जाते. जाणवेल असा धारदार मध्यम, कोमल धैवत. पंचमाला ज़रा बाजूला बसवल्यासारखं. हा सारा अनाहत नाद. मैफलीत आता किंचितही हालचाल दिसत नाही. झोपेशिवाय गेलेली सारी रात्र आणि मघाचपर्यंत बोलणारे सारे स्नायू यांचा विसर पाडणारा एक एक सूर. सारी मैफल झपाटल्यासारखी स्तब्ध, निश्चल आहे. हे गाणं निश्चितच या लोकीचं नाही. हे केवळ ताल-लय-सुरांच्या दृश्य बन्धनात बांधलेलं नाही. हे सारं त्याही पलिकडचं आहे. जिथे मन-बुद्धीची झेप अपुरी पड़ते तिथून आलेलं. इथे प्रत्येक सूर अस्वस्थ करणारे प्रश्न विचारतो आहे, कसलीतरी अनामिक आस लावतो आहे. प्रत्येक सुरात, प्रत्येक आलापात थक्क करणारी, अलौकिक प्रतिभेची झेप आहे. गाणा-याने स्वत:च्या आनंदासाठी गावं, आणि नकळत इतरांची आयुष्यं सुखाची करावीत असा हा सुन्दर व्यवहार. 
हलकेच डोळे पाणावू लागतात. 
अंगावर मोती उधळल्यासारखे सूर...किती वेचावेत आणि किती सोडावेत?
आनंदाची परमावधि झाल्यावर नेमक्या क्षणी तोडी संपते. क्षणभर थांबून तो बहादुरी तोडी सुरु करतो. मी मी म्हणणारे चकित होतील अशी आलापी तो लीलया दाखवतो. श्वास रोखून धरावा अशा अवघड जागा कमालीच्या सहजतेने पार करतो. अत्यंत वक्र चलन त्याच्यासमोर शहाण्यासारखं वागतं आहे. हा देखणा राग याच्या सुरांनी अजूनच देखणा वाटतो आहे.  सारे चकित. दंग. दाद देण्याचंही भान कोणाला नाही. आजवर ऐकलेल्या सा-या बहादुरी तोडी माझ्या मनातून फिरून जातात. आत्ताच्या बहादुरीचं लावण्य काही औरच. अशी तोडी ना कुणी गायली, ना कधी ऐकली. माझ्या थिट्या स्मरणात तरी याला तोड सापडत नाही.
आता सकाळ पूर्ण उजळली आहे. मंचाच्या मागे असलेला पिंपळ सोनेरी झालेला आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात मधूनच.
टाळ्यांचा आवाज विरतो.
शांतपणे तो भजन सुरु करतो. इडा, पिंगला, सुषुम्ना या नद्या असलेलं शरीर, त्यात अडुसष्ट तीर्थं. सारी सृष्टि याच एका घटामध्ये. अबोल करणारे शब्द. कुठेही घाई नाही, कुठेही चमत्कृति नाही. नदी वहावी तसा शब्दांचा ओघ वाहतो आहे.
मैफल संपते. क्षण-दोन क्षण शांतता. मग टाळ्यांचा कडकडाट होतो. गायक औपचारिकपणे दोन शब्द बोलतो. आता लोकांचा ओघ मंचाकड़े. गर्दीतून अनेक मोबाईल उंचावले गेलेले. फोटो निघत आहेत. आवराआवर सुरु झाली आहे. एक एक करत साथीदार मंचामागे जातात.

रंगमंचाभोवती दाटलेली गर्दी, आणि मंचावर आपल्यातच हरवलेला मुकुल शिवपुत्र...      

        

6 comments:

  1. Good to know this. I am completly and madly in love with this father-son duo and it's difficult to say who is better, rather both are best.

    ReplyDelete
    Replies
    1. Samved,

      Same feelings here. Its really not possible to compare between these two. Yes, both are best.
      Mukul Shivaputra is a genius, especially when it comes to 'upaj' of the raga and its 'vistaar'.His approach to every raga is unique, and his 'gayaki' is becoming more and more matured with the time. I think classical music has not witnessed such extraordinary vocalist in past thousand years. :)
      Thanks for visiting the blog.

      Delete
  2. बाहेरून आत झिरपणारे हे सूर आपल्याला इतके समाधीचा अनुभव देतात. तर ज्या कलाकाराच्या 'खोलातून' ते उमटतात, तिथे तर केवढे तरंग उमटवून जात असतील! ही माणसं आपल्यातच अशी हरवलेली असतात याचं याहून वेगळं काय कारण असेल?

    मुकुल शिवपुत्रांच्या mp3 असतील तर देऊ शकाल का? खरेदी करणं इतक्यात शक्य नाहीये म्हणून. निर्गुणी भजन, रागदारी, जे असेल ते. आत्ताच http://www.youtube.com/watch?v=c72Laqr_T_o इथे एक व्हिडियो ऐकला.. समाधान होत नाहीये.

    ReplyDelete
    Replies
    1. इनिगोय,
      मुकुल शिवपुत्र यांच्यासारखा गायक गेल्या हजार वर्षांत भारतीय संगीताने पहिला नसेल, हे मी 'गर्जून' सांगायला तयार आहे. :)
      हा गायक अजोड आहे आणि रागाची उपज, मांडणी आणि विस्तार यात अद्वितीय. अशी प्रतिभा, अशी बुद्धि, असा आवाज मी ना कधी पहिला, ना ऐकला. यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकणं हा एक अंतर्मुख, थक्क करणारा अनुभव असतो. माझं भाग्य इतकं थोर, मला यांच्या अनेक मैफली प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्या आणि मी यांचा भक्त झालो. आजही मुकुलजी गाणार असतील तर मी धावत जातो, आणि कान धन्य करून घेतो. तुम्ही दिलेल्या लिंकमधल्या मैफलीबद्दलच हा लेख लिहिला आहे मी.
      तुमचा मेल आयडी सांगता का? काही लहान क्लिप्स पाठवतो. esnips किंवा तत्सम साईट्सवरूनही काही mp३ डाऊनलोड करता येतील.

      Delete
  3. पुण्यवान आहात. या लिंकमधला व्हिडियो साधा मोबाईलवरून रेकॉर्ड केलाय, तरीही ऐकताना एवढा छान वाटतो आहे.

    मला yogini.nene@gmail.com इथे मेल पाठवून चालेल. esnipns ट्राय नाही केलं. आज उद्या करेन.

    आणखी एक विनंती, मी कुमार गंधर्वांबद्दल थोडंफार वाचलंय, सुनिताबाईंच्या आठवणींच्या स्वरुपात. पण कुमार आणि मुकुल यांच्यातल्या (गायनासंदर्भातल्या) नात्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. जालावर शोधलं तर त्यांच्याबद्दलच्या दुर्दैवी बातम्याच सापडल्या. तुम्ही मुकुल शिवपुत्र यांच्या तालमीबद्दल, गुरु-शिष्य नात्याबद्दल लिहाल का? कलाकार म्हणून हा माणूस कसा घडला, आज आहे तसा का घडला आणि तो किती मोठा आहे, कुमारांचा यांच्याबद्दलचा नजरिया कसा होता याचीही जालावर नोंद व्हावी असं वाटतं.

    ReplyDelete
    Replies
    1. इनिगोय,
      तुमची मेल पहा. :)
      खूप छान आणि तितकाच अवघड विषय सुचवला आहे तुम्ही. आभारी आहेच, पण आता लिहायचं तर अभ्यास करणं आलं! नक्की लिहीन.

      Delete