Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Saturday, September 25, 2010

सुनता है गुरु ग्यानी- भाग २

गेले काही दिवस असेच निर्गुणी चाललेत.
कुमारांचे ते प्रश्न वाचून झाले, आणि मग वाटायला लागलं की हा माणूस कोणालाच कसा नाही समजला आजवर? यांच्या शिष्यांनी आयुष्यभर यांची नक्कल करण्यात धन्यता मानली, आणि आपण ते कौतुकाने ऐकत गेलो. (अपवाद मुकुल शिवपुत्र. या अवलियाला मात्र कुमार हा काय प्रकार होता ते पूर्ण समजलंय, आणि मी तर म्हणेन हा माणूस कुमारांच्या एक-दोन पावलं पुढे गेलाय. असो. हा अजून एक विषय आहे, लिहित गेलो तर भरकटून जाईन.)
कुमार हा एक समुद्र, कबीर हा अजून एक. ही दोन माणसं एकमेकांना पाचशे वर्षांनी भेटली, आणि यांनीच एकमेकांना समजून घेतलं.
निर्गुणी भजनं गाण्याची जी एक पद्धत आहे, ती फार निराळी आहे. नाथपंथातले योगी एका वेगळ्याच विश्वात जगतात. त्यांचे मार्ग निराळे तसंच आयुष्यही. कुमार सांगतात "शून्य निर्माण करण्याची जी शक्ति निर्गुणात आहे, ती अजून कशातच नाही. ही स्थिति बन्धनं नाहीत, चिंता नाही अशा अवस्थेतून येते. मारा, पण लागलं नाही पाहिजे. कितीही धारदार वस्तू फेका, जखमच होत नाही...उलट मजा येते. ही जी 'फेक' आहे आवाजाची, हा यांच्या जगण्याचा नैसर्गिक भाग आहे. हा आवाज तुमच्या मनाशी जुळला पाहिजे. "
"मैं जागू, म्हारा सतगुरु जागे, आलम सारा सोवै"
मी जागृत आहे, माझा सत्गुरु जागा आहे, बाकी सारं विश्व निद्रिस्त.. हे यांचं जग आहे. जेव्हा हे जोगी गातात, ऐकायला कोण असतं? निर्गुण एकलेपणा सांगतं. निर्गुण हा निसर्ग आहे. पूजा करणार कशाची? आकाश, सूर्य, चन्द्र शरीरात. इंगला, पिंगला या नद्या. हा जीवन देणारा निसर्ग आहे. "काशी न जाऊ जी, न प्रयागा जाऊ जी, न गंगा नहाऊ जी..अडसठ तीरथ घट के भीतर.." हे नाथपंथी, कबीरपंथी, बाउल, आपल्या आनंदासाठी गातात. निर्गुण गाणं हेच आहे. माझी ओळख नाहीच रहात इथे. फ़क्त एक नाद असतो, स्वर असतो, आणि मी त्याच्या मागे शून्याच्या पसा-यात जातो. ही कुमारांची खरी शक्ति आहे. प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं ही भजनं ऐकताना. 'सखिया वा घर सबसे न्यारा' किंवा 'गुरूजी ने दिया अमर नाम' किंवा 'सुनता है गुरु ग्यानी' ऐका. हे गाताना त्यांचा आवाज शांत, साधा. गाण्याला वेग नाही, अनेक विराम दिसतात अधुनमधून. कुठेही घाई नाही, तालाशी स्पर्धा नाही. त्यांची नेहमीची आक्रमक, हुन्कारयुक्त तानप्रक्रिया डोकावत देखिल नाही इथे. एक एक सुर फ़क्त दिसत जातो, काहीही चमत्कृति न करता. स्वत:ची जाणीव विरून जाते अशा वेळी. गाणं संपलं तरी काहीच बोलावंसं वाटत नाही.......
"जब मैं था, हरी नाही, अब हरी हैं, मैं नाही
प्रेम गली अति संकरी, यामे दो समाये नाही"
"हा कहू तो हैं नहीं, ना कहा नहीं जाय
हा और ना के बीच में, मोरा सतगुरू रहा समाय"

आता मात्र थांबतो. . हा खरा अर्धविराम.

Tuesday, September 21, 2010

सुनता है गुरु ग्यानी- भाग १

खरं तर आता लिहायचं नाही असं ठरवलं होतं. पण आधीचा पोस्ट लिहिता लिहिता कबिरावरून अशी जोरदार किल्ली बसली, की नाही लिहायचं म्हणता म्हणता मी computer चालू करून लिहायला बसलो सुद्धा. त्यात गेले काही दिवस मुकुल शिवपुत्र नावाचा माणूस फार त्रास देतोय. त्यांचं 'युगन युगन हम योगी' ऐकलं, आणि मग 'गुरा तो जीने' ऐकलं, मग यावर कडी म्हणून श्री ऐकला...मग एकंदर परिस्थिति कबिराकडे बोट दाखवू लागल्यावर तीन-चार पुस्तकं वाचली, शबनम विरमानी नावाच्या एका थोर बाईंनी कबिरावर केलेल्या तीन film पाहिल्या आणि मग म्हटलं, होऊन जाऊ दे!!
मला कबीर पहिल्यांदा दिसला तो कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांतून. कबीर आणि कुमार..दोघेही अवलिये आणि अजिबात हाती न सापडणारे. ही जी भजनं कुमारांनी सादर केली, ती यापूर्वी कोणीच पहिलीदेखील नव्हती. ही एकंदरीत तीस भजनं आहेत. काही कबिराची आणि काही नाथपंथियांनी लिहिलेली.ही नाथपंथीय मंडळी तर इतकं गूढ़ लिहितात की झपाटल्यागत होतं..(अजून एखादी किल्ली बसली तर काय खरं नाय!)
लिंडा हेस नावाच्या एका बाईंनी कबीर आणि कुमार यांच्या या नात्यावर Singing Emptiness नावाचं अफाट पुस्तक लिहिलंय. कधी मिळालं तर अवश्य वाचा. आता मी जे लिहिणार आहे त्यातला बराच भाग या बाईंच्या कृपेने लिहिलेला आहे.
कुमार एका मैफिलीत म्हणाले आहेत, "पोपटपंची म्हणजे काही गाणं नाही. तुम्ही जर शिकला नसाल काहीच, तर परत परत तेच गात बसता. मी जेव्हा बंदिश गातो तेव्हा प्रत्येक वेळी ती नव्याने जन्म घेते माझ्यात. ही बंदिश मी आठव्या वर्षी शिकलो, पण परत ती नव्याने जन्मली आहे.." ही सतत मरण आणि जनन याची प्रक्रिया कबीर आणि कुमार यांना जोडते. कुमार म्हणतात, "गाते गाते रोज़ मरता हूँ. कालचा तिलक कामोद गाणारा मी आणि तिलक कामोद हे दोघे गेले. उद्या तिलक कामोद आणि कुमार, दोघेही परत जन्मतिल." कबीर तर सतत मृत्युच्या आसपास वावरतो. जीवन आणि मरण, दोन्हीची उस्फूर्तता आणि दोन्हीचं परस्परावलम्बित्व हे दोघेही फार सुन्दर सांगतात. या सगळ्यात काही काही फार सुरेख शब्द वापरतो कबीर. निर्गुण...निर्गुणी भजन, निर्गुणी गाणं...अशी एक दिक्, एक नाद, जिथे मनाची झेप देखील अपुरी पडते..याच निर्गुणासोबत, किंबहुना त्यातच आहे शून्य. कबीर म्हणतो की हे शून्य इथेच आहे. सान्जरंगात शून्य आहे, शेतांच्या हिरवाईत शून्य आहे. तो सांगतो की मला तिथे भेट, साधो, त्या शून्य शिखरावर.
" निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा
मूल कमल दृढ आसान बांधू जी, उलटी पवन चढ़ाऊंगा
मन ममता को थिर कर लाऊ जी, पांचो तत्व मिलाउंगा
इंगला पिंगला सुखमन नाडी जी, तिरवेणी पर नहाऊंगा
शून्य शिखर पर अनहद बाजे जी, राग छत्तीस सुनाऊंगा
कहे कबीर सुनो भाई साधो, जीत निशान घुराऊंगा"
कुमार हे भजन गाताना सांगतात, "निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा, गाऊँगा!" मी गाणार, गाणार! आता जिथे हा अनाहत नाद आहे, तिथे सूर आहे, आणि तिथेच राग आहे. आणि पहिलं तर काहीच नाही! हे शून्य आहे, निर्गुण आहे. याला रूप,रस, स्पर्श, गंध नाही. हा केवळ शब्द आहे. हा केवळ सूर आहे. शुद्ध आणि अनाहत. कुमार विचारतात, "गाणं कुठून येतं? हे फ़क्त सूर, ताल, लय आहे? हे फ़क्त सातच सुरांत बांधलेलं आहे? का हे अशा जागेतून येतं की जिथे फ़क्त ध्वनिचा संकेत असतो, नाद निनाद असतात? मला माहित नाही. हे मात्र नक्की की हे फ़क्त दृश्य सूर, ताल लय, यात बांधलेलं नाही. मी याच्या मागे जातो, आणि ते दूर दूर जात रहातं"
हे प्रश्न असे जीवघेणे आहेत, की मी पुस्तक ख़ाली ठेवतो. पुढे वाचायचा धीरच नाही होत.
" जहाँ पुरुष तहवाँ कछु नाही, कहे कबीर हम जाना
हमरी सैन लखे जो कोई, पावे पद निरवाना"
Where that one lives , there 's nothing .
Kabir says , I 've got it !
if you catch my hint , you find
the same place -
no place .
शून्य हा शब्दच आगळा आहे...ज्याला तो स्पर्श करतो, ते सारं बदलून जातं.
थकलो आता. पुढचा भाग पुढे कधी तरी.

Sunday, September 19, 2010

द्यावा अर्धविराम येथे...

गेल्या काही दिवसात चार लोक ज्याला चांगलं म्हणतात अशा एक-दोन घटना घडल्या.
एक म्हणजे Geological Survey of India चं बहुप्रतीक्षित ऑफर लेटर मला मिळालं, ही मोठी आणि MIT मधला बहुप्रतीक्षित पगार 'तत्वज्ञ संत ज्ञानेश्वरांच्या' (हे काय आहे, ते फ़क्त MIT मधे असणा-यालाच कळेल! आणि या साईटचा 'ळ' शी असा का ३६ चा आकडा आहे ते कुणाला समजलं तर सांगा मला!) कृपेने एकदाचा झाला, ही छोटी. म्हणजे आता पुण्यात माझे काही फार दिवस राहिले नाहित, आणि १ ऑक्टोबर रोजी मी GSI मधे सरकारी नोकरी चालू करणार हे नक्की झाल्यात जमा आहे. काही काही जण मला म्हणाले, चला आता आयुष्य ख-या अर्थी सुरु होणार वगैरे, पण मला असं काहीही वाटत नाही.
आयुष्य सुरु होतं, म्हणजे नक्की काय होतं? ही बातमी ऐकल्यावर माझे PhD चे गाईड मला म्हणाले, " चला, आता तुझ्या घरच्यांची काळजी मिटली असेल", ही काळजी कसली? मी माझं अन्नवस्त्र मिळवू शकेन का नाही याची, का मी सेटल होणार की नाही याची? किंवा माझ्यावर अपरिहार्यपणे येणारी आणि मी जी नाकारू शकत नाही अशी जबाबदारी मी पार पाडू शकेन का नाही याची? पण मला असं वाटतं की प्रश्न फ़क्त जबाबदारीचा असेल तर त्याबाबतीत माझ्या घरातील लोकांचा माझ्यावर तेवढा विश्वास आहे. मग काळजी कसली?
गेल्या काही दिवसात माझ्यात काही असे बदल घडले आहेत, की एक तर मी स्वत:ला फार प्रश्न विचारू लागलो आहे, आणि दुसरं म्हणजे दिवस किती वेगाने बदलतात हे मी पहिलं आहे। ही नोकरी वगैरे मिळाल्यावर मी स्वतःला प्रश्न विचारला की, नोकरी चालू झाली, मग? या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. एक म्हणजे, जे हे आयुष्यवाले किंवा काळजीवाले पटकन देतील, ते असं की आता पगार, सरकारी सुखसोयी वगैरे मिळतील, पैसे देऊन चार गोष्टी मी विकत घेऊ शकेन. आणि दुसरं जास्त महत्वाचं म्हणजे पूर्ण भारताची geology मला पाहता येईल आणि इतक्या मोठ्या आणि जगात दुस-या क्रमांकावर असलेल्या survey organisation मधे खूप काही शिकता येईल. म्हणजे, नोकरीची सुरुवातीची काही वर्षं तरी मला जे काम आवडतं, ते करता येईल. मग पुढचं पुढे!
मला भीती हीच आहे की या नोकरीच्या कृपेने मी सेटल होतो की काय? आणि माझे सेटल झालेले मित्र पाहिले की अजूनच भीती वाटायला लागते। एकदा बूड स्थिरावलं की संपलं हो! आणि यात मेख अशी आहे की तुम्ही स्थिरावताय हे तुमच्या लक्षात येतच नाही. बघता बघता तुम्ही सेटल समाजात असे काही विलीन होता की तुमची स्वतःची अशी काही ओळख रहातच नाही. मग यातून एक असं आयुष्य सुरु होतं की तुम्ही तुमची नोकरी, पैसा, घर आणि तुमचं सुखी जीवन यांची जाहिरात जगता.... हे किती खोटं आहे....चार लोक गाडी घेतात, चार लोक घर घेतात, चार लोक लग्न करतात म्हणून मीपण केलं, म्हणजे मी सेटल झालो? आणि हे नाही केलं तर? मी का जगतोय, या मूलभूत प्रश्नाचं उत्तर जर का मी समाधानकारकरित्या मलाच देऊ शकत नसेन तर मी जे काही करतोय त्याला काय अर्थ आहे?
अशा वेळी मला थोरो भेटला आणि मग तर मी फार विचारात पडलो..हा बाबा आपल्या सगळ्या concepts ना सरळ सरळ थपडा मारत राहतो. आयुष्य, घर, पैसे, काम याच्या आपल्या संकल्पना किती चुकीच्या आणि वरवरच्या आहेत हे थोरो सहज सांगतो आणि मग प्रचंड त्रास होतो. कबीर पण असाच भेटला. हा तर अजूनच खोल, थेट मुळालाच हात घालतो. जगणं म्हणजे काय हे कबीर इतक्या सहजपणे सांगतो, की आपल्यालाच आपल्याकडे बघवत नाही...कबीर म्हणतो, पैसा पाण्यासारखा असावा. इतकाही कमी नको, की नाव चालणारच नाही, आणि इतकाही जास्त नको की नाव वाहून जाईल. प्रत्येकाची नाव निराळी. काही महापुरातही अचल राहतात, आणि काही झ-यातही वाहून जातात. मेळ कसा घालायचा? "हद हद जाए हर कोई, अनहद जाए न कोय, हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय" हद्ची बेडी आहेच की प्रत्येकाच्या पायात; ती कशी तोडाल?आणि हा माणूस प्रवृत्ति-निवृत्तीच्या मधे कसा शांत झोपतो? "सभी ठौर जमात हमारी, सभी ठौर पर मेला, हब सब माहीं सब हम माहीं, हम हैं बहुरि अकेला"...सगळ्यात राहूनही मी एकटा...हे अजून पहा..
कहना सो कह दिया, अब कुछ कहा न जाय । एक रहा दूजा गया, दरिया लहर समाय||
झूठे सुख को सुख कहै, मानता है मन मोद । जगत चबेना काल का, कुछ मुख में कुछ गोद||
माटी कहे कुम्हारसे, तू क्या रोंदे मोय । एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूंगी तोय||
हा माणूस आपल्या खोट्या आयुष्यावर इतक्या सरळ भाषेत घाव घालतो, की आपण सुन्नच व्हायला पाहिजे. नोकरी मिळाली, पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली...कबीर म्हणतो "चलती चाकी देखके दिया कबीरा रोय, दो पल भीतर आयके साबुत बचा न कोय" मग मी मला का 'साबुत' समजतोय? मी पण चक्कीमधेच आहे की ......असा सगळा त्रास आहे..
फार भरकटत चाललो. जे सुचत गेलं, जे मनात होतं, सगळ लिहून टाकलं..आता काही काळ तरी विश्रांति. या एक वर्षाच्या प्रवासात काही लिहावंसं वाटलं, तर लिहित जाईन..गृत्समद ऋषि म्हणतात त्याप्रमाणे आपला धागा, कशाशीही का जुळला असेना, सलग रहावा म्हणजे झालं.

Thursday, September 9, 2010

मागील पानावरून परत सुरु......

मला हल्ली असं वाटायला लागलय की आपल्या नाटक, सिनेमा, गाणं सादर करणे आणि बघणे याबद्दलच्या कल्पना जराशा बदलायला हव्यात. आणि असे बदल या स्पर्धांमधून जास्त प्रभावीपणे करता येतील. काहीतरी वेगळ करण्याची, वेळप्रसंगी नकार स्वीकारुन काहीतरी करण्याची तयारी असायलाच हवी. एकंदरीतच कुठलीही performing art प्रेक्षकांना वाजवीपेक्षा महत्त्व देऊन सादर केली की तिच्यातला प्रामाणिकपणा संपतो आणि राहतो तो फ़क्त कोरडा व्यवहार. तुम्हाला हवं ते आम्ही करतो, फ़क्त करंडक द्या किंवा टाळ्या वाजवा, वाहवा म्हणा असा. आणि हल्ली आपल्याकडे हाच व्यवहार तेजीत आहे.
मला प्रश्न असा पडतो की कलाकार किंवा प्रेक्षक यांची परिपक्वता कमी पडू लागली आहे की काय? जरा विचार करा, "आमच्या भावना दुखावल्या" हे वाक्य हल्ली इतक्या वेळा का ऐकू यायला लागलं आहे? काहीच स्वीकारण्याची आपली तयारी नाही? एखादा गाणारा मोठा का, तर तो अगदी हुबेहूब अमक्यातमक्यासारखा गातो म्हणून? किंवा तो एकच एक प्रकारचं गाणं प्रत्येक मेहिफिलित फरमाइशी घे-घेउन गातो म्हणून? काहीही नवीन, चाकोरीबाहेरचं आपण पाहत नाही, ऐकत नाही, लिहित नाही की बोलत नाही. मला खरं सांगा कोणीतरी, पुरुषोत्तम मधे "करून पाहू" असं म्हणून किती नाटकं होतात? किती नवीन फॉर्म हाताळले जातात?एकच एक प्रकारची नाटकं...एक problem , थोड़ा मेलोड्रामा, एक-दोन स्वगतं, विचित्र सेट, एक गोड शेवट किंवा जबरदस्त धक्का..आणि तुम्हाला बक्षिस मिळतं.. मग ही स्पर्धा प्रतिष्ठेची का? कारण ती खूप वर्षं चालू आहे म्हणून? गायक मोठा का? तो खूप वर्षं गातोय म्हणून? मला वाटतं की यात काहीतरी गल्लत आहे. आणि ही गल्लत दोन्ही बाजूंनी आहे.
ज़रा विचार करण्याची गरज आहे, ज़रा धाडस करण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे गरज आहे जरा तारतम्याची. ते जर असेल तर काहीतरी नवीन नक्कीच घडेल!!

Monday, September 6, 2010

आता तुम्ही म्हणाल, की याला प्रत्येक गोष्टीत कसा कायतरी problem दिसतो? पण दिसतो मला, त्याला मी तरी काय करू? कधी कधी वाटतं की आपण किती गधडे आहोत.... आजुबाजूला माणसं कशी छान सुखी आहेत! त्यांना कशाचा त्रास होत नाही, त्यांच्या कधी कोणी डोक्यात जात नाही, त्यांना कसल्याही चिंता नसतात... आणि आम्ही आमच्या डोक्याला नसते काव लावून घेतो...
तर आज मला काही अत्यंत जटिल प्रश्न पडले आहेत, आणि याचं कारण आहे THE पुरुषोत्तम करंडक...या स्पर्धेला खरं तर खूप गोजिरवाणी नावं देतात पेपरवाले, अभिव्यक्तिचा उत्सव वगैरे... पण शेवटी ती एक इतर स्पर्धा असतात तशी एक स्पर्धाच आहे!
आता मला पहिलं प्रश्नचिन्ह या स्पर्धापणापुढे द्यायचं आहे कारण माझ्या इतर सर्व प्रश्नांची हीच जननी आहे...आणि अजून एक गोष्ट म्हणजे आत्ता बोलताना आपण या स्पर्धेची परंपरा वगैरे जरा बाजूलाच ठेवूया, कारण तसं पाहिलं तर यांचं महत्व फार मर्यादित आहे. महत्त्व आहे ते स्पर्धेच्या उद्देशाला. ही स्पर्धा नवीन लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांना एक व्यासपीठ मिळावं, आणि त्यांना जे काही आपल्याला सांगायचय ते सांगता यावं म्हणून घेतली जाते असा माझा समज आहे. आता माझा प्रश्न असा आहे, की जी नाटकं या स्पर्धेत होतात, त्यातली किती खरंच या मुलांची 'स्वत:ची' असतात? किंवा किती नाटकांमागे यांचा स्वत:चा विचार असतो? "बास!! करंडक पाहिजेच!!" किंवा "याला निर्मल!" यापलिकडे? टीम स्पिरिट वगैरे एक झालं, पण तेवढंच पुरेसं आहे? एका ठराविक रेसिपीने केलेली नाटकं ही कितीही गाजावाजा करा, अल्पजीवीच असणार ना? आता तर लेखक, दिग्दर्शक चढ्या भावात विकत मिळतात. स्क्रिप्ट ते ठरवतात, त्यावर विचार ते करतात , सर्व काही ते करतात, मग 'तुमची स्पर्धा', 'तुमचं नाटक' याला काय अर्थ आहे? म्हणजे उद्या वेगळा फॉर्म हाताळायचा म्हटला, तर आधी विचार करायचा की नाटक करंडक काढणार का? जयराम तरी? असेल तर करा, नाहीतर रिस्क का घ्यायची? अशी वृत्ति बळावली तर ते फार वाईट आहे.
माझं तर म्हणण आहे की बक्षिसंच बंद करा. ज्याला जे सांगायचं असेल, जे मांडायचं असेल, त्याला ते नि:शंकपणे सांगू दे. करंडकापेक्षा नाविन्य महत्वाचं आहे, आणि बक्षिसं द्यायची हौस असेल, तर 'तीन परीक्षक' ही व्यवस्था बदला, ज्यूरी नेमा, प्रेक्षकांचे प्रतिनिधि निवडा. काहीतरी नवीन घडू दे, तर त्या स्पर्धेला काहीतरी अर्थ आहे.
आता अजून एक प्रश्न म्यां अडाण्याला पडला आहे, की नाटकात problem असलाच पाहिजे, तो तुमच्याशी related असलाच पाहिजे, असं काही खरंच आहे का? किंवा नाटकातून काहीतरी सांगितलं पाहिजे असंही काही आहे का? मला तरी ह़ा प्रकार नकोसा वाटतो. चित्राचं माध्यम जसा रंग आहे, गाण्याचं जसं सूर आहे, तसं नाटक हे आधी दृश्य आहे, मग श्राव्य आहे. गाण्यात जसा सूर आधी, मग राग, मग बंदिश आणि मग इतर गोष्टी, तसंच नाट्य सुद्धा. जो अर्थ काढायचा आहे, तो प्रेक्षकांना काढू दे, मी का सांगू? मला सांगायचं नसताना?मला जे दाखवायचं होतं, ते मी दाखवलं, पण यातून काहीतरी सन्देश दे, काहीतरी सांग ही जबरदस्ती का माझ्यावर?

पुरे झालं आता...टाइप करता करता जीव गेला माझा...उरलेलं नंतर.