Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Saturday, May 26, 2012

एका नदीची गोष्ट....

नदी का वाहत असते? कधी विचार केलाय कुणी? पाण्याचा हा अखंड प्रवाह एकाच दिशेला सतत का जात राहतो? कुठल्या प्रेरणा असतात यामागे? कसली आंतरिक ओढ़ असते? जी. एंच्या पत्रांत, माणसाच्या आयुष्याबद्दल बोलताना अनेकदा नाईलचा उल्लेख आला आहे. नाईल जिथून उगम पावते, तिथून ती दोनशे मैल पूर्वेला गेली असती, तर लाल समुद्राला मिळाली असती. पश्चिमेला गेली असती तर अटलांटिक महासागरात विसर्जित झाली असती. पण ती उत्तरेला जाते, आणि हजारो मैल वाळवंट तुडवत भूमध्य सागरात विसर्जित होते. आपण अलेक्झांड्रियाला आलेलो पाहून खुद्द नाईललाच आश्चर्य वाटले असेल! अशा कुठल्या शक्ति असतात, अशी कुठली प्रबळ ऊर्मी असते, जी नाईलला भूमध्य समुद्राला मिळायला भाग पाड़ते?   
गणपती बसवताना कलशपूजा असते. त्या पूजेत कलशाच्या कुठल्या भागात कोणी येऊन बसावं  याची एक जंत्री दिलेली आहे. कलशाच्या पाण्यात कुणी यावं? गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिन्धु, कावेरी यांनी. त्याच्या कुशीमधे असावं सात समुद्रांनी, सप्तद्वीपा वसुन्धरेनी. बाकी ब्रह्मा, विष्णु, रूद्र, गायत्री, सावित्री, वेद  हे नेहमीचे यशस्वी खेळाडू आपापल्या जागी आहेतच. असो. तर  भारतात इतक्या नद्या आहेत, त्यात या सात नद्या पवित्र का मानल्या जाव्यात? लहानपणापासून शेवटच्या क्षणी मुखात गंगा घालेपर्यंत सोबत करणा-या या नद्या. कदाचित या सात नद्यांनी अनेक समृद्ध संस्कृतींचे उदयास्त पाहिले आहेत, माणसाच्या इतिहासाचे कित्येक महत्त्वाचे अध्याय या नद्यांच्या काठी लिहिले गेले आहेत म्हणून या नद्या पवित्र मानल्या गेल्या असाव्यात. घरात जसे फार पाहिलेले, भोगलेले (आणि म्हणूनच शहाणे) माणूस असावे तशा.
पूर्वीच्या काळी गावात एक फार सुन्दर पद्धत होती, की गावात कुठलीही नदी असो, तिला गंगा म्हणायचे. किंवा ज्या गावात नदी नाही, त्याला कुग्राम म्हटलेलं आहे. थोडक्यात, नदी आणि माणूस यांचा फार फार जवळचा सम्बन्ध आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तेव्हापासूनचं हे नातं. जवळपास सर्व जुन्या संस्कृती नदीकाठी जन्माला आल्या, आणि माणसाने आपली पहिली पावलं नदीच्या साक्षीने टाकली. केवळ पिण्याच्या पाण्याचा न आटणारा स्रोत म्हणून नदीच्या जवळ आलेला माणूस त्या नदीला देव मानू लागला, आई मानू लागला. आज त्याच माणसाच्या करणीने अनेक नद्या मृत्युपंथाला लागल्या आहेत. असो. पण परत तोच प्रश्न आहे, की नदी का असते? ती का वाहते? एका ठराविक मार्गाने जाण्याची तिला का ओढ असते?
मी जेव्हा माझ्या डॉक्टरेटची सुरुवात केली, तेव्हा माझा भर साहजिकच माझ्या मुख्य विषयावर, म्हणजे नर्मदेच्या गाळाच्या खडकांवर होता. या खडकांमध्ये गेल्या 1-2 लाख वर्षांच्या आठवणी जपलेल्या आहेत. प्रत्येक दगड म्हणजे एक इतिहासाचं पुस्तक. त्यांची रचना, त्यांचा पोत, रंग, त्यातले घटक यांचं नदीच्या प्रवाहाशी अतूट नातं आहे. नदी कुठून वाहत होती, तिने वाहता वाहता किती प्रकारच्या खडकांचा सामना केला, तिच्या दिशा कशा बदलत गेल्या, सरळ पात्र बघता बघता नागमोडी कसं झालं, आणि त्या प्रक्रियेत किती प्रचंड बदल झाले या सगळ्या गोष्टी हे दगड बोलू लागले की थक्क व्हायला होतं. मग मजा अशी व्हायला लागली, की नदीच्या या अनेक प्रक्रियांची, तिच्या काठी असलेल्या जीववैविध्याची रोज नव्याने जाणीव होत असल्याने पुन्हा नेहमीचा प्रश्न पडू लागला, की ही नदी का आहे? ही इथूनच का वाहते आहे? किती काळ हिचा प्रवास चालू  आहे आणि किती काळ चालणार आहे?
आपण जर मध्य भारताचा नकाशा नीट पाहिला, तर लक्षात येईल, की नर्मदा आणि तापी या दोनच मोठ्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत आणि बाकीच्या सा-या नद्या पूर्ववाहिनी आहेत. याचं एक सोपं स्पष्टीकरण देता येईल की  पाणी नेहमीच उताराकडे जातं वगैरे. पण प्रश्न  एवढा  सोपा नाही. दोनच नद्यांना तेवढा पश्चिमेकडे उतार का, हा प्रश्न आहेच. एक फोटो पाहूया.
वर दिलेल्या फोटोमधे एक गोष्ट अगदीच जाणवण्याजोगी आहे की शोण, नर्मदा आणि तापी या एक  ठराविक रेषा पकडून चाललेल्या आहेत. नर्मदा आणि तापी या एकमेकींना समान्तर आहेत, आणि शोण-नर्मदा  तर एकच रेषा आहे. या एकूणच सिस्टिमला आम्ही सोनाटा (SONATA= Son Narmada Tapi) रेषा म्हणतो. 1949 पासून ही रेषा का आहे यावर अनेक मतमतांतरं चालू आहेत. पण या नद्यांना वाहण्यासाठी प्रशस्त मार्ग या सोनाटाने दिला आहे, हे नक्की. आता सोनाटा ही  नेमकी काय भानगड आहे, हे थोडक्यात सांगायचं तर आज आपल्याला जी भारताची (किंवा कुठल्याही देशाची) अखंड जमीन दिसते, ती खरं तर अनेक तुकड्या-तुकड्यांची बनलेली आहे. जेव्हा  पृथ्वीचा जन्म झाला (4.5 अब्ज वर्षं), तेव्हा ती थंड होताना granite आणि तत्सम खडकांचे काही स्थिर भूखंड निर्माण झाले. या स्थिर जमिनीच्या तुकड्यांना craton  म्हणतात. हे cratons अतिशय जुने-पुराणे. त्यांचं वय साधारण 2.9 ते 4 अब्ज वर्षं  सहज असू शकतं. जगातला सर्वात जुना दगड (4.031 ± 0.003 अब्ज वर्षं) हा कॅनडा  मधल्या स्लेव्ह craton मध्ये सापडला. असो.
तर,हे cratons एकमेकांना जोडले जाऊन एक भूप्रदेश निर्माण करतात, आणि नंतर या पुराण पुरुषांवर नवीन खडकांचे थर निर्माण होउन एक सलग जमीन तयार होते (शिल्ड). उदा. भारत. भारतात असे सात craton आहेत. (फोटो पहा: 1-अरवली, 2-बुंदेलखंड, 3-सिंगभूम, 4- बस्तर, 5- पूर्व घाट, 6-धारवाड, आणि 7- दक्षिण ग्रान्युलाईट क्षेत्र).  


भारतातला सर्वात जुना दगड बस्तर craton मधला TT नाईस. त्याचं वय आहे 3.8 अब्ज वर्षं. (नाईस म्हणजे काय, TT म्हणजे काय, हे नंतर कधीतरी.)
 जिथे दोन craton जोडले जातात, त्याला शिवण ( Suture) म्हणतात. काही संशोधकांच्या मते सोनाटा ही अशीच एक शिवण आहे, आणि नंतरच्या अब्जावधी वर्षात ती रुंदावत गेली. म्हणजे, ज्या गोष्टीने नर्मदा-तापी-शोण यांना मार्ग करून दिला, ती जवळपास 2800-3000 दशलक्ष वर्षं जुनी आहे! (खरं आत्ता जे काही सांगितलं, ते सारे कादंबरीचे विषय आहेत! आत्ता सांगायला लागलो तर कायच्या काय फाफट पसारा होईल.) तूर्त आपण सोनाटाला जरा  बाजूला ठेवू, आणि नर्मदेकडे जाऊ.
नर्मदा वाहताना अनेक प्रकारच्या खडकांमधून वाहते. तिच्या उत्तरेला विंध्य पर्वताच्या  रांगा आहेत. इथल्या खडकांचं वय आहे सुमारे 540+ दशलक्ष वर्षं. तिच्या दक्षिणेला गोंडवन खडक आहेत,  त्यांचं वय आहे सुमारे 300+ दशलक्ष वर्षं. पश्चिमेला ज्युरासिक (250+ दशलक्ष वर्षं) खड़क आहेत. दक्षिण-पश्चिमेला दक्खनचे ज्वालामुखी खड़क आहेत, त्यांचं वय आहे सुमारे 65+ दशलक्ष वर्षं. पूर्वेला महाकोशल खड़क आहेत (भेडाघाटचे संगमरवर), त्यांचं वय आहे ~2000-2800 दशलक्ष वर्षं.
आता हे असं का बरं व्हावं? एका नदीच्या उत्तरेला एक प्रकारचे दगड आणि दक्षिणेला दुस-या प्रकारचे असं? मराठीमध्ये याला एक बोजड शब्द आहे प्रस्तरभंग. सुटसुटीत शब्द हवा असेल तर फॉल्ट . हे फॉल्ट जमिनीत चाललेल्या हालचाली, गडबडगोंधळ दाखवतात. होतं काय, की काही कारणामुळे दोन दगडांमध्ये भेगा पडतात (Fracture!). या भेगांवर जमिनीच्या काही हालचालीमुळे जर अजून ताण आला तर या भेगेच्या दोन बाजूचे दगड एकमेकांवरून घसरतात. आणि मग सगळी उलथापालथ होते. नवीन दगड जुन्यांच्या समोर जाउन बसतात, जुने दगड वर येतात वगैरे. नर्मदेच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असे दोन faults आहेत. उत्तर नर्मदा फॉल्ट आणि दक्षिण नर्मदा फॉल्ट. गूगल अर्थ किंवा तत्सम सॉफ्टवेर मधे जर नर्मदा पाहिली, तर हे दोन्ही फॉल्ट अगदी स्पष्ट दिसतात. सोनाटा पण जवळपास सिक्किम पर्यंत जाताना दिसते (भूवैज्ञानिकांसाठी सूचना- नसते रेफरंसेस देऊन माझ्या चुका काढल्या तर खबरदार!)  असो.
या सा-या गोंधळाच्या बरोब्बर मधे माझं प्रेमपात्र. नर्मदेच्या गाळाचे खडक. हे तरुण आहेत. फार फार तर काही लाख वर्षं जुने. अगदीच परवापरवाचे.(खालच्या फोटोत गुलाबी-ब्राऊन रंगाच्या विन्ध्य खडकांवर बसलेले माझे गाळाचे खडक. त्यावर हात ठेवलेला मी.) 


तर हा सारा प्रचंड प्रचंड काळ. साधारण 2-3 अब्ज वर्षांचा. या सा-या कालावधीत काय कल्प घडून गेलं असेल...अनेकदा समुद्राचं जमिनीवर आक्रमण झालं असेल, तेही हजारो मैल आतपर्यंत. त्याच्या खुणा या सहा-सात कोटी वर्षं जुन्या खडकांनी जपलेल्या आहेत. या खडकांचं रूप आता इतकं बदलून गेलं आहे कि कधीकाळी आपण समुद्राकाठची वाळू होतो, यावर त्यांचाही विश्वास बसू नये. असे एकावर एक साचत गेलेले थर इथे आहेत. प्रत्येक थराची निराळी गोष्ट. प्रत्येक वेळी बदलत गेलेली समुद्राची खोली आणि लाटांची अगणित चक्रं. अनेकदा आलेली हिमयुगं. अफाट ताकदीच्या हिमनद्या आणि त्यांनी वाहून आणलेले भीमकाय धोंडे. जमिनीच्या प्रचंड तुकड्यांची हालचाल. त्यांना पडलेल्या घड्या, शिवणी (सोनाटा अशीच एक!). भूकंप. गगनचुम्बी वृक्षांची जंगलं. सतत बदलत्या नदीच्या दिशेने त्यांच्यावर साठलेला गाळ. त्यांचं जमिनीखाली गाडलं जाणं. परत नवीन जंगल. मग Dinosaurs. त्यांचा अंमल असलेली पृथ्वी. उल्कापात, ज्वालामुखी, विध्वंस.आणि मग अनेक अनेक वर्षांनी माणसाचं पहिलं पाऊल....परत अश्मयुग ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास. एका नदीसोबत चाललेली सा-या विश्वाची यात्रा.  
म्हणजे, एका नदीची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर कितीदा कालचक्राच्या फे-या माराव्या लागतात...गंगा-यमुना-सिंधू  यांचा प्रवास म्हणजे भारतीय भूपृष्ठाचा प्रवास. म्हणजे साधासुधा नाही, तर तब्बल 61  दशलक्ष वर्षांचा प्रवास आणि युरेशियन भूपृष्ठाशी  त्याची झालेली टक्कर.ही गोष्ट म्हणजे हिमालयाची गोष्ट.
तापी-नर्मदेची कहाणी सुरु होते ती भारतीय भूमि कशी  तयार झाली इथपासून. अजून चिकाटी असेल तर थेट पृथ्वीच्या जन्मापर्यंत. या अचाट  विस्तारात आपण किती छोटे आहोत याची पदोपदी जाणीव होत राहते फक्त. नदीचं मूळ शोधू नये म्हणतात ते म्हणूनच  असावं कदाचित.

7 comments:

  1. क्या बात है...! अतिशय साक्षेपी लिखाण! :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रवर्य!

      Delete
  2. वेगळं आणि वाचनीय. ही नदीची गोष्ट पुढेही चालू ठेवावी.

    ReplyDelete
    Replies
    1. शीतल,
      धन्यवाद. या माझ्या विषयावर अजूनही लिहायचं आहे. लिहिन नक्कीच.

      Delete
  3. अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या आपल्या संशोधक वृत्तीने आमच्या ज्ञानात सतत वाढ होवो हीच सदिच्छा.धन्यवाद.

    ReplyDelete