Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Wednesday, February 9, 2011

मुकुल शिवपुत्र- एक अनुभव

लोक जमलेले आहेत. जरिकाठी साड्या आणि झब्बे घालून. गज-यांचा वास..
रंगमंचावर मागे फुलं-बिलं..समोर समया..तबला आणि पेटी आपापल्या जागी बसलेले आहेत. मधूनच थोडी ठाक-ठूक..तानपु-यांचे कान पिळणं..सारं काही सुरात लागलेलं.
कोणीतरी थोडी प्रस्तावना करतो. टाळ्या. गायक प्रवेशतो.
हा सा-या मैफलिपासून आलिप्त. काहीसा निर्विकार.
दाढी वाढलेली, केस कसेतरी बसवलेले. साधा केशरी झब्बा, पांढरी लुंगी आणि एक शबनम.
आल्याआल्या तो तानपु-यांकडे साशंक नजरेने पाहतो..एक एक तानपुरा हातात घेउन कमालीच्या एकाग्रतेने ते जुळवतो..
पाणी वगैरे हव्या त्या जागी आहे.
आता मैफलीत शांतता..फ़क्त तानपुरे आणि पेटीचा सुर लागला आहे.
विलक्षण गंभीरपणे तो षड्ज लावतो. शांत, गहन आणि अत्यंत घुमारदार..
निषादावर क्षणभर विसावून, रिषभाला हलका स्पर्श करून याचा आवाज पुन्हा षड्जावर स्थिर होतो.
पुन्हा पंचम, निषाद, पुन्हा षड्ज..जीवघेणी शांत आलापी बराच वेळ...
रागस्वरूप पूर्ण स्पष्ट झाल्यावरच तो बंदिश चालू करतो..
हलकेच तबला सुरु होतो...मध्यलय, सहज ठेका.
आता प्रेक्षक, मैफल याच्या खिजगणतितही नाही.
याला आता स्वत:ची जाणीव नाही..याचं आस्तित्व आता अलग नाही.
आता हा षड्ज आहे, धैवत आहे, निषाद-गंधार आहे, मध्यम आहे, पंचम आहे....
याच्या प्रत्येक सुरात पहाट दिसते आहे..
याची प्रतिभा नवेनवे उन्मेष दाखवते आहे..
पाहता पाहता गायक पुसला जातो. आता रंगमंचावर मूर्तिमंत तोडी प्रकटली आहे.
क्षणाक्षणाला रूप बदलते आहे, अनिर्बंध संचार करते आहे...
डोळ्यात पाणी येतं, पण ते पुसायला हात धजावत नाही..
सारी मैफल स्थिर आहे..हलकीशी हालचालपण दिसत नाही कुठे.
मध्यलय ते द्रुत हा प्रवास विलक्षण अलगदपणे होतो.
आता गाण्याचा वेग वाढला आहे.
वेगवान ताना..एक तान दुसरीसारखी नाही..गुदमरून टाकणारा वेग..
द्रुत बंदिश संपते, तराणा संपतो..टाळ्यांचा कडकडाट..
हा परत निर्विकार.
निर्विकारपणे तो भैरवी सुरु करतो.
आता तालाला जागा नाही..
करुण, आर्त बंदिश..तितकेच करुण सूर..
भैरवी संपते. परत टाळ्यांचा कडकडाट..
प्रेक्षक उठून जाऊ लागतात..रंगमंदिर रिकामं होतं.

रंगमंचावर दोन तानपुरे, आणि आपल्यातच हरवलेला मुकुल शिवपुत्र..........

2 comments:

  1. अहो पण परवा यांनी वसंतोत्सवात केलेल्या फजितीचं काय?

    ReplyDelete
  2. विक्रांत,
    हे मी माझ्या अनुभवावरून लिहिलं आहे. मुकुलजी जेव्हा गातात, तेव्हा असाच अनुभव मिळतो, कदाचित आपण कधी तो घेतला नसेल, आपण त्यांना कधी ऐकलं नसेल. माझं भाग्य थोर, मला मुकुलजींच्या अनेक अजोड मैफली ऐकायला मिळाल्या, कुठूनकुठून त्यांची recordings पण तुडुम्ब ऐकायला मिळाली.असो.
    १) झाला प्रकार अत्यंत अप्रिय होता, आणि जेव्हा मला याची बातमी मिळाली तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो, आणि अजुनही आहे. वसंतोत्सवात जे काही झालं, त्याला मुकुलजींपेक्षाही इतर काही गोष्टी जबाबदार आहेत, पण मी त्यांचा उल्लेख इथे करू शकत नाही त्याबद्दल क्षमस्व.
    २) मुकुल शिवपुत्र सारखा गायक गेल्या कित्येक वर्षात भारतीय संगीताला मिळालेला नाही. त्यांचं ज्ञान, रागाबद्दल त्यांची समज, त्यांची विचारपद्धति केवळ अजोड आहे. आपल्याला केवळ त्यांचा लहरीपणा दिसतो हे दुर्दैव, पण मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की ही कृष्णभक्ति आणि छिद्रान्वेषण बाजूला ठेवून या गायकाची जडणघडण, त्याचा विचार, आणि त्याने आजवर मजसारिख्या अनेक पामरांना दिलेला निर्मळ आनंद आपण समजून घ्या. त्यांचं गाणं शांतपणे ऐका. कुठल्याही चौकटीत न बसणारा हा अजोड गायक आहे. त्यांच्या आणि त्यांच्यानंतरच्या पिढीत झालेल्या अभिजात नकलाकारांपेक्षा हा माणूस सहस्त्रपटीने श्रेष्ठ आहे!
    ३) मी आणि माझ्यासारखे अनेक आज मुकुलजींचे भक्त आहेत आणि हे सांगायला मला अभिमान वाटतो. आजही ते गाणार आहेत हे ऐकून आम्ही त्यांच्यामागे धावत जातो, आणि ते दोन मिनिटं गायले तरी आमचे कान धन्य होतात. असो. आपली मतं आपल्यापाशी.
    वाचल्याबद्दल आभार, अजुन काय लिहू?

    ReplyDelete