Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Saturday, September 25, 2010

सुनता है गुरु ग्यानी- भाग २

गेले काही दिवस असेच निर्गुणी चाललेत.
कुमारांचे ते प्रश्न वाचून झाले, आणि मग वाटायला लागलं की हा माणूस कोणालाच कसा नाही समजला आजवर? यांच्या शिष्यांनी आयुष्यभर यांची नक्कल करण्यात धन्यता मानली, आणि आपण ते कौतुकाने ऐकत गेलो. (अपवाद मुकुल शिवपुत्र. या अवलियाला मात्र कुमार हा काय प्रकार होता ते पूर्ण समजलंय, आणि मी तर म्हणेन हा माणूस कुमारांच्या एक-दोन पावलं पुढे गेलाय. असो. हा अजून एक विषय आहे, लिहित गेलो तर भरकटून जाईन.)
कुमार हा एक समुद्र, कबीर हा अजून एक. ही दोन माणसं एकमेकांना पाचशे वर्षांनी भेटली, आणि यांनीच एकमेकांना समजून घेतलं.
निर्गुणी भजनं गाण्याची जी एक पद्धत आहे, ती फार निराळी आहे. नाथपंथातले योगी एका वेगळ्याच विश्वात जगतात. त्यांचे मार्ग निराळे तसंच आयुष्यही. कुमार सांगतात "शून्य निर्माण करण्याची जी शक्ति निर्गुणात आहे, ती अजून कशातच नाही. ही स्थिति बन्धनं नाहीत, चिंता नाही अशा अवस्थेतून येते. मारा, पण लागलं नाही पाहिजे. कितीही धारदार वस्तू फेका, जखमच होत नाही...उलट मजा येते. ही जी 'फेक' आहे आवाजाची, हा यांच्या जगण्याचा नैसर्गिक भाग आहे. हा आवाज तुमच्या मनाशी जुळला पाहिजे. "
"मैं जागू, म्हारा सतगुरु जागे, आलम सारा सोवै"
मी जागृत आहे, माझा सत्गुरु जागा आहे, बाकी सारं विश्व निद्रिस्त.. हे यांचं जग आहे. जेव्हा हे जोगी गातात, ऐकायला कोण असतं? निर्गुण एकलेपणा सांगतं. निर्गुण हा निसर्ग आहे. पूजा करणार कशाची? आकाश, सूर्य, चन्द्र शरीरात. इंगला, पिंगला या नद्या. हा जीवन देणारा निसर्ग आहे. "काशी न जाऊ जी, न प्रयागा जाऊ जी, न गंगा नहाऊ जी..अडसठ तीरथ घट के भीतर.." हे नाथपंथी, कबीरपंथी, बाउल, आपल्या आनंदासाठी गातात. निर्गुण गाणं हेच आहे. माझी ओळख नाहीच रहात इथे. फ़क्त एक नाद असतो, स्वर असतो, आणि मी त्याच्या मागे शून्याच्या पसा-यात जातो. ही कुमारांची खरी शक्ति आहे. प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येतं ही भजनं ऐकताना. 'सखिया वा घर सबसे न्यारा' किंवा 'गुरूजी ने दिया अमर नाम' किंवा 'सुनता है गुरु ग्यानी' ऐका. हे गाताना त्यांचा आवाज शांत, साधा. गाण्याला वेग नाही, अनेक विराम दिसतात अधुनमधून. कुठेही घाई नाही, तालाशी स्पर्धा नाही. त्यांची नेहमीची आक्रमक, हुन्कारयुक्त तानप्रक्रिया डोकावत देखिल नाही इथे. एक एक सुर फ़क्त दिसत जातो, काहीही चमत्कृति न करता. स्वत:ची जाणीव विरून जाते अशा वेळी. गाणं संपलं तरी काहीच बोलावंसं वाटत नाही.......
"जब मैं था, हरी नाही, अब हरी हैं, मैं नाही
प्रेम गली अति संकरी, यामे दो समाये नाही"
"हा कहू तो हैं नहीं, ना कहा नहीं जाय
हा और ना के बीच में, मोरा सतगुरू रहा समाय"

आता मात्र थांबतो. . हा खरा अर्धविराम.

4 comments:

 1. thanks for nice journey of nirgun ..

  ReplyDelete
 2. धन्यवाद रे...असंच वाचत रहा..देवदयेने जर वेळ मिळत गेला, तर अजून लिहित जाईन. बघू.

  ReplyDelete
 3. सध्या "सुनता है गुरु ग्यानी" डोक्यात ठाण मांडलं आहे. शोधता शोधता हे सापडलं. like-minded hearts भेटल्याचा अनुभव आला.
  कुमार गंधर्व, त्यांचा आवाज कुठल्या वेगळ्याच दुनियेत एरवीही घेऊन जातात, त्यात या निर्गुणी भजनांनी तर कहर केला आहे. 'झिनी.. झिनी.. झिनी.." ही निव्वळ कर्णेंद्रियांपुरती सीमित न राहता सार्‍या देहाची अनुभूती होऊन जाते.

  ही ३० गाणी आहेत हे नव्यानेच कळलं. शोधणं आलं!

  तुम्हाला शुभेच्छा :)

  ReplyDelete
  Replies
  1. इनिगोय,
   कुमार गंधर्वांचा आवाज खरंच वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. त्यात ही भजनं तर अफाट आहेत. केवळ संगीत म्हणूनच नाही, तर काव्य म्हणूनही त्यांचा दर्जा फार वरचा आहे. वाचता वाचता हरवून जायला होतं.
   लिंडा हेस यांचं 'singing emptiness ' नावाचं पुस्तक कुठे मिळालं तर अवश्य वाचा. या पुस्तकात नाथपंथिय जोगी आणि कबीर यांची तीस भजनं आहेत, आणि त्यांचा सुरेख इंग्लिश अनुवादही आहे. या पुस्तकासोबत एक सीडी मिळते, त्यात कुमारांनी पाच भजनं बड़ा ख्याल गावा तशी गायली आहेत. अतिशय जबरदस्त अनुभव. मुकुल शिवपुत्र यांनी ही निर्गुणी भजनं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहेत. कधी ऐकायचा योग आला तर ऐका नक्की. त्यांचं "गुरा तो जीने" तर अक्षरश:
   झपाटून टाकतं.
   प्रतिक्रियेबद्दल आभार. ऐसेच अगत्य असो द्यावे. :)

   Delete