Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Sunday, November 8, 2015

परत एकदा मौज :)

यंदाचा मौज दिवाळी अंक अवश्य वाचा. एक म्हणजे मुखपृष्ठापासून अंक अतिशय सुरेख आहे (मौज standards!), आणि माझा लेख यावेळी चक्क तिसरा आहे त्यात! 'द्वारकेचा गरुडध्वज' असं लेखाचं शीर्षक आहे आणि द्वारका का आणि कशी बुडाली याची भूशास्त्रीय कारणं आणि त्याच्या इतिहासातल्या पाऊलखुणा असा लेखाचा विषय आहे.
कळावे, लोभ असावा! :)   

Saturday, March 14, 2015

भला हुआ मोरी गगरी फूटी...


बाहेर धुकं दाटलं आहे. हातात कॉफीचा कप घेऊन मी माझ्या खिडकीशी बसलो आहे. आणि तू इथे नाहीस.
तुला पत्र लिहितो आहे खरं, पण ते तुला न कळणा-या भाषेत. ज्या माध्यमाकडे तू आजवर पाहिलंही नसशील, त्या माध्यमातून. यातल्या कित्येक गोष्टी तुला सांगितल्या आहेत का मी? आपण बोलत असताना? एखाद्या किल्ल्याच्या माथ्यावर? समुद्राकाठी? तुला आठवत असतील ब-याच गोष्टी.  मग हे पत्र तुला आहे, हे तरी का म्हणायचं? स्वत:शी बोलायची सवय तुला भेटलो तेव्हापासून तर अधिकच वाढली आहे. मग जे काही सांगायचं आहे, ते तुला सांगायचा अट्टाहास तरी कशाला? तू तरी जवळ आहेस का माझ्या?
काही दिवस होऊन गेले, पण अजूनही आठवतं. त्या मध्यरात्री माझ्या दाराशी आलीस ते जाते म्हणून सांगण्यासाठी. पुढचा रस्ता मला एकट्याने चालायचा आहे आणि तू केवळ साक्षीदार म्हणून राहशील-राहणार नाहीस कदाचित हे सांगण्यासाठी. डोळ्यात पाणी आणायचं नाही हे सांगून तू निघून गेलीस आणि आता तू भेटशील, पण सारंच अवघड होऊन बसेल तेव्हा. कदाचित तू परत नाही भेटणार. रस्ते वेगळे झाले आणि आपण आपली आयुष्यं वेगवेगळी जगायला सुरुवात केली. धुक्यात गेलेल्या भूतकाळात अजून एक जमा झाली ती तुझी सावली.
कित्येक गोष्टी नकळत घडून जातात, आणि काळाच्या ओघात आपल्याच आयुष्याकडे आपल्याला तटस्थपणे बघायला नाही मिळत.     
सरकारी नोकरी सुटली, त्याला आता दोन वर्षं होतील.
कलकत्त्यात काढलेल्या एका वर्षाच्या खुणा अजूनही शरीर-मनावर आहेत. घरापासून तीन हजार किलोमीटर दूर, एकट्याने घालवलेल्या संध्याकाळच्या वेळा अजून दिसतात कधीकधी. आजही घर-दार जवळ आहे अशातला भाग नाही. किंबहुना जितकी ओढ गेली काही वर्षं होती, तितकी आता नाही वाटत.  बंगाली बोलायची सवय कधीच सुटून गेली. गेल्या दोन वर्षात अनेक मित्र जोडले. बघता बघता सारे दूर निघून गेले. निरोप घेताना लहान मुलासारखे डोळे पुसणारे माझे मित्र..आता क्वचित बोलणं होतं, होत नाही. सगळेच अर्थ बदलत चाललेत का आता? त्या शहराशी, त्या जागेशी, तिथे जगलेल्या आयुष्याशी जोडलेले  धागे एक एक करून तुटत चालले आहेत आणि सगळा भूतकाळ आता धूसर दिसू लागला आहे.
एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पत्करली. माझ्यावर प्रेम करणारी शेकडो मुलं आणि घरापेक्षाही आपलंसं वाटणारं माझं डीपार्टमेंट. बघता बघता सगळे सूर कसे छान जुळून आले. वाटलं कि इथे आता समाधान मिळेल. काहीतरी केल्याची परिपूर्ण भावना. आयुष्याचा उद्देश सापडल्याची तृप्ती...तुझी भेट झाली...जशी वाट फुटेल तसं वाहत गेल्यासारखं का वाटत गेलं मग? सतत असमाधानी असल्याचा हा कसला शाप होता आपल्याला? सततची धावपळ, तगमग, सतत काही ना काही मागत राहणारं आयुष्य. एक दोन दिवस शांतपणे अंग टाकून पडून राहावं एवढी इच्छाही पूर्ण न होऊ देणारं हे सतत धावतं शहर. आणि आज आपण एकमेकांचा निरोप घेतला तो शेवटचा.
परत एकदा तुला सांगतो, दोन वर्षं हा काही मोठा काळ नाही. तुझ्या आठवणींच्या खुणा अजूनही मनावर तशाच आहेत. मी हसतो, खेळतो, खूप शिकवतो आणि वाचतो, पण खोल कुठेतरी तुझ्या स्मरणांच्या दाट सावल्या हलून जातात कधीतरी. पुन्हा शरीरावर आणि मनावर त्याच आणि तशाच खुणा. काळ बदलतो आहे का मला? गेल्या दोन वर्षांत वाढत गेलेल्या आणि बदलत गेलेल्या अनेक जबाबदा-या, बदलत गेलेली नाती, नात्यांचे अर्थ. अपेक्षांची नसती ओझी.  सतत काहीतरी मागतच राहायचं का आयुष्याकडे? परत दोन वर्षांनी मी माझं नवीन घर बघतो, तेव्हा कितीतरी कचरा पुन्हा साचलेला दिसतो. हे का होतं? चालत्या चक्कीमध्ये आपण पुन्हा पुन्हा का भरडून निघतो? कितीतरी प्रश्न आणि त्यांची न सापडणारी उत्तरं. जर का ती न सापडणारी आहेत तर शोध घ्यायचा तरी कशाचा? हे जे काही मी आत्ता लिहितो आहे त्यात ही उत्तरं शोधायचा उद्देश अजिबात नाही. परत एकदा मनात जमा झालेलं सारं काही ओकून टाकावं झालं. परत कोणीतरी बघेल हे सगळे तुकडे. आयुष्याने भीक घातलेले. कधी मी मागितले म्हणून, कधी त्याला द्यावेसे वाटले म्हणून. तू बघशील कदाचित, पण तुला समजेल का? हे सारं काही तुला सांगितलेलं आहे मी.
नाती कशी बदलत जातात ना? कालपर्यंत एकमेकांशिवाय एक क्षणही न राहू शकणारे आपण आज मैलोनमैल दूर गेल्यासारखे. या सबंध वर्षात सारे बंध तुटल्यासारखं वाटणारं माझं घर आज परत माझ्या पाठीशी आलं, अभंगपणे नाही तरीही. कलकत्त्यात असताना हवाहवासा वाटणारा एकुटवाणेपणा, पण आज त्याचे सगळे अर्थच बदलून गेले. गेली दोन वर्षं या प्रचंड गतिमान शहरात कशी गेली ते समजलंच नाही. पण परवापरवापर्यंत घाम आणि उकाड्याने जीव नकोसं करणारं हे शहर कवचकुंडलांसारखं अंगाला बिलगून बसलं.
 नाती कित्येक वेळा अशी असतात की ती सोडून दिल्यावरच जास्त सुख होतं. कित्येक वेळा आपण केवळ आपल्या समाधानासाठी गोष्टींना चिकटून बसतो आणि मग तिथून तुटून निघताना होणा-या अपरिहार्य वेदना सोसाव्या लागतात.
नातं संपतं म्हणजे काय होतं? आपला संवाद संपतो आणि मुख्य म्हणजे तो संपला आहे याची जाणीवही होत नाही. आयुष्यातला तो काही काळ असा एकाएकी संपणार आहे याची जाणीव होत राहिली मला, पण मग हळूहळू त्या जाणीवेतल्या वेदना कमी होत गेल्या. आज आयुष्यातलं एक नातं संपल्याचा सल सोडून तू गेलीस आणि एकट्याने आयुष्य जगायचं आहे याची जाणीव झाली मला. पण या जाणीवेला वेदनेची जोड नव्हती.
आजवर अनेक जण आयुष्यात आले. मित्र, मैत्रिणी, शिक्षक, गुरु आणि अनेक जण. प्रत्येक नातं सहजपणे आलं आणि जेव्हा ते संपायची वेळ आली तेव्हा ते सहजपणे संपलं देखील. जी नाती आयुष्यभर सोबत राहतील असा विश्वास होता ती नाती अखेरपर्यंत सोबत राहतील कदाचित पण आयुष्याला कोणीच पुरलेलं नाही याची जाणीव या वेळेला होऊन गेली. आपलं नातं संपताना सर्वात मोठं देणं देऊन गेलं ते हे. या जाणिवेचं.
अनेक संतांच्या, कवींच्या काव्यात मरणाचे मोठे सुंदर उल्लेख येतात. कधी चोला बदलला जातो, कधी माहेराहून सासरी रवानगी होते आणि कधी कधी मैली चुनरी घेऊन आपण आपल्या माहेरच्या दारी येऊन उभे राहतो. मातीचं शरीर, त्यात सतत भरली जाणारी पाप-पुण्यं आणि तो सतत रिकामा होणारा घडा. ती सतत फिरणारी माळ आणि त्यावर केलेला तोच तोच जप. तशीच गत आपल्या नात्यांची असते ना? सगळे मातीचे नातेसंबंध आणि त्यात भरल्या जाणा-या अनेकानेक गोष्टी. कबीर म्हणतो,
"भला हुआ मोरी गगरी फूटी, मैं पनियां भरन से छूटी
मोरे सिर से टली बला ।।
चलती चाकी देखकर दिया कबीरा रोए
दो पाटन के बीच यार साबुत बचा ना कोए ।।
चाकी चाकी सब कहें और कीली कहे ना कोए
जो कीली से लाग रहे, बाका बाल ना बीका होए ।।"
जर का भांडं फुटून गेलं तर त्यात पाणी भरायचा उद्योग का म्हणून करायचा? जर का माळ तुटून गेली तर तोच तोच जप का करत राहायचा? आणि चाकीमध्ये भरडून निघण्यापेक्षा जात्याच्या दांडीला धरून राहिलं तर काय वाईट?
थोरोने लिहिलं आहे कि त्याने बांधलेल्या घरात त्याने काही विशिष्ट आकाराचे धोंडे आणून ठेवले, केवळ चांगले दिसावेत म्हणून. पण मग त्यांच्यावर धूळ जमा व्हायला लागली, मग ते स्वछ करण्याचं काम आलं. त्याची काळजी घेणं आलं. थोरो म्हणतो की मुळात ज्याची गरज नाही अशा किती वस्तू आपण उगीच गोळा करत राहतो? ज्या नात्यांचा आयुष्याला भार होतो अशी नाती का उगीच वागवत राहतो आपण? झेन विचारदेखील सुरु होतात ते मुक्त होण्यापासून. ज्याची आयुष्याला गरज नाही, जे भार झालेलं आहे ते जाऊ देण्यापासून. मग त्या सवयी असोत, घरात साचलेला पसारा असो किंवा नातेसंबंध असोत. बुद्ध म्हणतो तसं कमळाच्या पानावर पडलेल्या थेंबासारखं अलिप्तपणे आपलं आयुष्य जोखण्याची सुरुवात मुक्त होण्यापासून होते.
कित्येक गोष्टी हातातल्या नसतात आणि कित्येक गोष्टी आपल्यासाठी नसतात. त्याची जाणीव फक्त उशिरा होते. कबीराची महाठगिनी माया अशी काही गुंतवते कि ती माया आहे आणि तिची आपल्या आयुष्यात गरज नाही हे लक्षात यायला पण खूप वेळ लागतो. परत एकदा हे सारं चक्र फिरून त्या अकथ कहाणीकडे येतं. ती पूर्ण होतेच असं नाही. जे मागू ते मिळेलच असंही नाही. पण मागितल्याचं समाधान मात्र आपल्या गाठीशी राहतं. तेवढं झालं तरी खूप झालं.