Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Tuesday, September 21, 2010

सुनता है गुरु ग्यानी- भाग १

खरं तर आता लिहायचं नाही असं ठरवलं होतं. पण आधीचा पोस्ट लिहिता लिहिता कबिरावरून अशी जोरदार किल्ली बसली, की नाही लिहायचं म्हणता म्हणता मी computer चालू करून लिहायला बसलो सुद्धा. त्यात गेले काही दिवस मुकुल शिवपुत्र नावाचा माणूस फार त्रास देतोय. त्यांचं 'युगन युगन हम योगी' ऐकलं, आणि मग 'गुरा तो जीने' ऐकलं, मग यावर कडी म्हणून श्री ऐकला...मग एकंदर परिस्थिति कबिराकडे बोट दाखवू लागल्यावर तीन-चार पुस्तकं वाचली, शबनम विरमानी नावाच्या एका थोर बाईंनी कबिरावर केलेल्या तीन film पाहिल्या आणि मग म्हटलं, होऊन जाऊ दे!!
मला कबीर पहिल्यांदा दिसला तो कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांतून. कबीर आणि कुमार..दोघेही अवलिये आणि अजिबात हाती न सापडणारे. ही जी भजनं कुमारांनी सादर केली, ती यापूर्वी कोणीच पहिलीदेखील नव्हती. ही एकंदरीत तीस भजनं आहेत. काही कबिराची आणि काही नाथपंथियांनी लिहिलेली.ही नाथपंथीय मंडळी तर इतकं गूढ़ लिहितात की झपाटल्यागत होतं..(अजून एखादी किल्ली बसली तर काय खरं नाय!)
लिंडा हेस नावाच्या एका बाईंनी कबीर आणि कुमार यांच्या या नात्यावर Singing Emptiness नावाचं अफाट पुस्तक लिहिलंय. कधी मिळालं तर अवश्य वाचा. आता मी जे लिहिणार आहे त्यातला बराच भाग या बाईंच्या कृपेने लिहिलेला आहे.
कुमार एका मैफिलीत म्हणाले आहेत, "पोपटपंची म्हणजे काही गाणं नाही. तुम्ही जर शिकला नसाल काहीच, तर परत परत तेच गात बसता. मी जेव्हा बंदिश गातो तेव्हा प्रत्येक वेळी ती नव्याने जन्म घेते माझ्यात. ही बंदिश मी आठव्या वर्षी शिकलो, पण परत ती नव्याने जन्मली आहे.." ही सतत मरण आणि जनन याची प्रक्रिया कबीर आणि कुमार यांना जोडते. कुमार म्हणतात, "गाते गाते रोज़ मरता हूँ. कालचा तिलक कामोद गाणारा मी आणि तिलक कामोद हे दोघे गेले. उद्या तिलक कामोद आणि कुमार, दोघेही परत जन्मतिल." कबीर तर सतत मृत्युच्या आसपास वावरतो. जीवन आणि मरण, दोन्हीची उस्फूर्तता आणि दोन्हीचं परस्परावलम्बित्व हे दोघेही फार सुन्दर सांगतात. या सगळ्यात काही काही फार सुरेख शब्द वापरतो कबीर. निर्गुण...निर्गुणी भजन, निर्गुणी गाणं...अशी एक दिक्, एक नाद, जिथे मनाची झेप देखील अपुरी पडते..याच निर्गुणासोबत, किंबहुना त्यातच आहे शून्य. कबीर म्हणतो की हे शून्य इथेच आहे. सान्जरंगात शून्य आहे, शेतांच्या हिरवाईत शून्य आहे. तो सांगतो की मला तिथे भेट, साधो, त्या शून्य शिखरावर.
" निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा
मूल कमल दृढ आसान बांधू जी, उलटी पवन चढ़ाऊंगा
मन ममता को थिर कर लाऊ जी, पांचो तत्व मिलाउंगा
इंगला पिंगला सुखमन नाडी जी, तिरवेणी पर नहाऊंगा
शून्य शिखर पर अनहद बाजे जी, राग छत्तीस सुनाऊंगा
कहे कबीर सुनो भाई साधो, जीत निशान घुराऊंगा"
कुमार हे भजन गाताना सांगतात, "निर्भय निर्गुण गुण रे गाऊँगा, गाऊँगा!" मी गाणार, गाणार! आता जिथे हा अनाहत नाद आहे, तिथे सूर आहे, आणि तिथेच राग आहे. आणि पहिलं तर काहीच नाही! हे शून्य आहे, निर्गुण आहे. याला रूप,रस, स्पर्श, गंध नाही. हा केवळ शब्द आहे. हा केवळ सूर आहे. शुद्ध आणि अनाहत. कुमार विचारतात, "गाणं कुठून येतं? हे फ़क्त सूर, ताल, लय आहे? हे फ़क्त सातच सुरांत बांधलेलं आहे? का हे अशा जागेतून येतं की जिथे फ़क्त ध्वनिचा संकेत असतो, नाद निनाद असतात? मला माहित नाही. हे मात्र नक्की की हे फ़क्त दृश्य सूर, ताल लय, यात बांधलेलं नाही. मी याच्या मागे जातो, आणि ते दूर दूर जात रहातं"
हे प्रश्न असे जीवघेणे आहेत, की मी पुस्तक ख़ाली ठेवतो. पुढे वाचायचा धीरच नाही होत.
" जहाँ पुरुष तहवाँ कछु नाही, कहे कबीर हम जाना
हमरी सैन लखे जो कोई, पावे पद निरवाना"
Where that one lives , there 's nothing .
Kabir says , I 've got it !
if you catch my hint , you find
the same place -
no place .
शून्य हा शब्दच आगळा आहे...ज्याला तो स्पर्श करतो, ते सारं बदलून जातं.
थकलो आता. पुढचा भाग पुढे कधी तरी.

No comments:

Post a Comment