Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Monday, September 6, 2010

आता तुम्ही म्हणाल, की याला प्रत्येक गोष्टीत कसा कायतरी problem दिसतो? पण दिसतो मला, त्याला मी तरी काय करू? कधी कधी वाटतं की आपण किती गधडे आहोत.... आजुबाजूला माणसं कशी छान सुखी आहेत! त्यांना कशाचा त्रास होत नाही, त्यांच्या कधी कोणी डोक्यात जात नाही, त्यांना कसल्याही चिंता नसतात... आणि आम्ही आमच्या डोक्याला नसते काव लावून घेतो...
तर आज मला काही अत्यंत जटिल प्रश्न पडले आहेत, आणि याचं कारण आहे THE पुरुषोत्तम करंडक...या स्पर्धेला खरं तर खूप गोजिरवाणी नावं देतात पेपरवाले, अभिव्यक्तिचा उत्सव वगैरे... पण शेवटी ती एक इतर स्पर्धा असतात तशी एक स्पर्धाच आहे!
आता मला पहिलं प्रश्नचिन्ह या स्पर्धापणापुढे द्यायचं आहे कारण माझ्या इतर सर्व प्रश्नांची हीच जननी आहे...आणि अजून एक गोष्ट म्हणजे आत्ता बोलताना आपण या स्पर्धेची परंपरा वगैरे जरा बाजूलाच ठेवूया, कारण तसं पाहिलं तर यांचं महत्व फार मर्यादित आहे. महत्त्व आहे ते स्पर्धेच्या उद्देशाला. ही स्पर्धा नवीन लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांना एक व्यासपीठ मिळावं, आणि त्यांना जे काही आपल्याला सांगायचय ते सांगता यावं म्हणून घेतली जाते असा माझा समज आहे. आता माझा प्रश्न असा आहे, की जी नाटकं या स्पर्धेत होतात, त्यातली किती खरंच या मुलांची 'स्वत:ची' असतात? किंवा किती नाटकांमागे यांचा स्वत:चा विचार असतो? "बास!! करंडक पाहिजेच!!" किंवा "याला निर्मल!" यापलिकडे? टीम स्पिरिट वगैरे एक झालं, पण तेवढंच पुरेसं आहे? एका ठराविक रेसिपीने केलेली नाटकं ही कितीही गाजावाजा करा, अल्पजीवीच असणार ना? आता तर लेखक, दिग्दर्शक चढ्या भावात विकत मिळतात. स्क्रिप्ट ते ठरवतात, त्यावर विचार ते करतात , सर्व काही ते करतात, मग 'तुमची स्पर्धा', 'तुमचं नाटक' याला काय अर्थ आहे? म्हणजे उद्या वेगळा फॉर्म हाताळायचा म्हटला, तर आधी विचार करायचा की नाटक करंडक काढणार का? जयराम तरी? असेल तर करा, नाहीतर रिस्क का घ्यायची? अशी वृत्ति बळावली तर ते फार वाईट आहे.
माझं तर म्हणण आहे की बक्षिसंच बंद करा. ज्याला जे सांगायचं असेल, जे मांडायचं असेल, त्याला ते नि:शंकपणे सांगू दे. करंडकापेक्षा नाविन्य महत्वाचं आहे, आणि बक्षिसं द्यायची हौस असेल, तर 'तीन परीक्षक' ही व्यवस्था बदला, ज्यूरी नेमा, प्रेक्षकांचे प्रतिनिधि निवडा. काहीतरी नवीन घडू दे, तर त्या स्पर्धेला काहीतरी अर्थ आहे.
आता अजून एक प्रश्न म्यां अडाण्याला पडला आहे, की नाटकात problem असलाच पाहिजे, तो तुमच्याशी related असलाच पाहिजे, असं काही खरंच आहे का? किंवा नाटकातून काहीतरी सांगितलं पाहिजे असंही काही आहे का? मला तरी ह़ा प्रकार नकोसा वाटतो. चित्राचं माध्यम जसा रंग आहे, गाण्याचं जसं सूर आहे, तसं नाटक हे आधी दृश्य आहे, मग श्राव्य आहे. गाण्यात जसा सूर आधी, मग राग, मग बंदिश आणि मग इतर गोष्टी, तसंच नाट्य सुद्धा. जो अर्थ काढायचा आहे, तो प्रेक्षकांना काढू दे, मी का सांगू? मला सांगायचं नसताना?मला जे दाखवायचं होतं, ते मी दाखवलं, पण यातून काहीतरी सन्देश दे, काहीतरी सांग ही जबरदस्ती का माझ्यावर?

पुरे झालं आता...टाइप करता करता जीव गेला माझा...उरलेलं नंतर.

1 comment:

  1. Pundya............

    Laayyy bhari.............

    Kharach majja ali blog vachun.....

    ReplyDelete