गेल्या काही दिवसात चार लोक ज्याला चांगलं म्हणतात अशा एक-दोन घटना घडल्या.
एक म्हणजे Geological Survey of India चं बहुप्रतीक्षित ऑफर लेटर मला मिळालं, ही मोठी आणि MIT मधला बहुप्रतीक्षित पगार 'तत्वज्ञ संत ज्ञानेश्वरांच्या' (हे काय आहे, ते फ़क्त MIT मधे असणा-यालाच कळेल! आणि या साईटचा 'ळ' शी असा का ३६ चा आकडा आहे ते कुणाला समजलं तर सांगा मला!) कृपेने एकदाचा झाला, ही छोटी. म्हणजे आता पुण्यात माझे काही फार दिवस राहिले नाहित, आणि १ ऑक्टोबर रोजी मी GSI मधे सरकारी नोकरी चालू करणार हे नक्की झाल्यात जमा आहे. काही काही जण मला म्हणाले, चला आता आयुष्य ख-या अर्थी सुरु होणार वगैरे, पण मला असं काहीही वाटत नाही.
आयुष्य सुरु होतं, म्हणजे नक्की काय होतं? ही बातमी ऐकल्यावर माझे PhD चे गाईड मला म्हणाले, " चला, आता तुझ्या घरच्यांची काळजी मिटली असेल", ही काळजी कसली? मी माझं अन्नवस्त्र मिळवू शकेन का नाही याची, का मी सेटल होणार की नाही याची? किंवा माझ्यावर अपरिहार्यपणे येणारी आणि मी जी नाकारू शकत नाही अशी जबाबदारी मी पार पाडू शकेन का नाही याची? पण मला असं वाटतं की प्रश्न फ़क्त जबाबदारीचा असेल तर त्याबाबतीत माझ्या घरातील लोकांचा माझ्यावर तेवढा विश्वास आहे. मग काळजी कसली?
गेल्या काही दिवसात माझ्यात काही असे बदल घडले आहेत, की एक तर मी स्वत:ला फार प्रश्न विचारू लागलो आहे, आणि दुसरं म्हणजे दिवस किती वेगाने बदलतात हे मी पहिलं आहे। ही नोकरी वगैरे मिळाल्यावर मी स्वतःला प्रश्न विचारला की, नोकरी चालू झाली, मग? या प्रश्नाची दोन उत्तरं आहेत. एक म्हणजे, जे हे आयुष्यवाले किंवा काळजीवाले पटकन देतील, ते असं की आता पगार, सरकारी सुखसोयी वगैरे मिळतील, पैसे देऊन चार गोष्टी मी विकत घेऊ शकेन. आणि दुसरं जास्त महत्वाचं म्हणजे पूर्ण भारताची geology मला पाहता येईल आणि इतक्या मोठ्या आणि जगात दुस-या क्रमांकावर असलेल्या survey organisation मधे खूप काही शिकता येईल. म्हणजे, नोकरीची सुरुवातीची काही वर्षं तरी मला जे काम आवडतं, ते करता येईल. मग पुढचं पुढे!
मला भीती हीच आहे की या नोकरीच्या कृपेने मी सेटल होतो की काय? आणि माझे सेटल झालेले मित्र पाहिले की अजूनच भीती वाटायला लागते। एकदा बूड स्थिरावलं की संपलं हो! आणि यात मेख अशी आहे की तुम्ही स्थिरावताय हे तुमच्या लक्षात येतच नाही. बघता बघता तुम्ही सेटल समाजात असे काही विलीन होता की तुमची स्वतःची अशी काही ओळख रहातच नाही. मग यातून एक असं आयुष्य सुरु होतं की तुम्ही तुमची नोकरी, पैसा, घर आणि तुमचं सुखी जीवन यांची जाहिरात जगता.... हे किती खोटं आहे....चार लोक गाडी घेतात, चार लोक घर घेतात, चार लोक लग्न करतात म्हणून मीपण केलं, म्हणजे मी सेटल झालो? आणि हे नाही केलं तर? मी का जगतोय, या मूलभूत प्रश्नाचं उत्तर जर का मी समाधानकारकरित्या मलाच देऊ शकत नसेन तर मी जे काही करतोय त्याला काय अर्थ आहे?
अशा वेळी मला थोरो भेटला आणि मग तर मी फार विचारात पडलो..हा बाबा आपल्या सगळ्या concepts ना सरळ सरळ थपडा मारत राहतो. आयुष्य, घर, पैसे, काम याच्या आपल्या संकल्पना किती चुकीच्या आणि वरवरच्या आहेत हे थोरो सहज सांगतो आणि मग प्रचंड त्रास होतो. कबीर पण असाच भेटला. हा तर अजूनच खोल, थेट मुळालाच हात घालतो. जगणं म्हणजे काय हे कबीर इतक्या सहजपणे सांगतो, की आपल्यालाच आपल्याकडे बघवत नाही...कबीर म्हणतो, पैसा पाण्यासारखा असावा. इतकाही कमी नको, की नाव चालणारच नाही, आणि इतकाही जास्त नको की नाव वाहून जाईल. प्रत्येकाची नाव निराळी. काही महापुरातही अचल राहतात, आणि काही झ-यातही वाहून जातात. मेळ कसा घालायचा? "हद हद जाए हर कोई, अनहद जाए न कोय, हद अनहद के बीच में रहा कबीरा सोय" हद्ची बेडी आहेच की प्रत्येकाच्या पायात; ती कशी तोडाल?आणि हा माणूस प्रवृत्ति-निवृत्तीच्या मधे कसा शांत झोपतो? "सभी ठौर जमात हमारी, सभी ठौर पर मेला, हब सब माहीं सब हम माहीं, हम हैं बहुरि अकेला"...सगळ्यात राहूनही मी एकटा...हे अजून पहा..
कहना सो कह दिया, अब कुछ कहा न जाय । एक रहा दूजा गया, दरिया लहर समाय||
झूठे सुख को सुख कहै, मानता है मन मोद । जगत चबेना काल का, कुछ मुख में कुछ गोद||
माटी कहे कुम्हारसे, तू क्या रोंदे मोय । एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूंगी तोय||
हा माणूस आपल्या खोट्या आयुष्यावर इतक्या सरळ भाषेत घाव घालतो, की आपण सुन्नच व्हायला पाहिजे. नोकरी मिळाली, पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली...कबीर म्हणतो "चलती चाकी देखके दिया कबीरा रोय, दो पल भीतर आयके साबुत बचा न कोय" मग मी मला का 'साबुत' समजतोय? मी पण चक्कीमधेच आहे की ......असा सगळा त्रास आहे..
फार भरकटत चाललो. जे सुचत गेलं, जे मनात होतं, सगळ लिहून टाकलं..आता काही काळ तरी विश्रांति. या एक वर्षाच्या प्रवासात काही लिहावंसं वाटलं, तर लिहित जाईन..गृत्समद ऋषि म्हणतात त्याप्रमाणे आपला धागा, कशाशीही का जुळला असेना, सलग रहावा म्हणजे झालं.
bon voyage.
ReplyDeletethanks . पण थोडा वेळ आहे रे अजून मला जायला......
ReplyDeletevery apt
ReplyDeleteDhanywad Aashlesha!
ReplyDeletedevdayene vel milane nahi... devane vel dene...
ReplyDeletesaral mhanaych tar jivant thevane . .aani jivant asatana mag vel etc milavane chya goshti karu shakato. . nahi ka?? vegal bolale pan tumhi samaju shakata kadachit. .
lihinarya jagat yevadh harvun gelat . . settle zala et. (तुम्ही स्थिरावताय हे तुमच्या लक्षात येतच नाही). . he tumach mhanan repeat kel fakt . .
aavadal aaplyala tumch lihin. . asach lihit ja
hi comment सुनता है गुरु ग्यानी- भाग २ madhalya YOG la dilelya reply varun suchali :-) :-)
ReplyDeleteSimply awesome, dude!!!!!!!
ReplyDeleteThank you Gayatri!!
ReplyDeleteरुपाली,
ReplyDeleteब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. कमेन्ट बद्दल धन्यवाद. मी लिहित जाईनच, तुम्ही वाचाल अशी अपेक्षा आहे!!