कधीतरी असं होतं का तुम्हाला? लिहायचं म्हणून बाह्या सरसावून बसलं की काहीच सुचत नाही...आणि बाकीच्या वेळी मात्र डोक्यात इतका गोंधळ चालू असतो की दुसरीकडे लक्ष लागता लागत नाही. पण laptop समोर घेऊन बसलो किंवा कागद पेन समोर ओढले की सारे गोंधळ कसे गप्पगार..वाटतं की आपण किती छान गधडे झालोय, आपल्याला कशाचा त्रासच नाही..आपण विचारच नाही करत कसलाही. या सुखात उठलो की पुन्हा डोक्यात छिन्नी चालू होते. आपणच आपल्या मनाचे टवके उड़वायचे आणि कागदावर मांडून त्यांच्याकडे पाहत बसायचं असा खेळ परत बोलवायला लागतो. असं झालं की मी हल्ली निरर्थक विचार करायला शिकलो आहे..पोतंभर निरर्थक विचार जमले की ते लिहून काढायचे..
आपण सतत एकाच वास्तवात का गुरफटून बसतो? आपण त्याच नात्यांच्या गुंत्यात का अडकतो? आपल्याला सतत एकाच प्रकारच्या नोक-या का मिळत राहतात? आपल्या अवतीभवती असलेल्या अगणित शक्यता आणि पर्याय यांतून आपण एकाच प्रकारचे पर्याय का निवडतो?का आपल्याला या शक्यता माहितीच नसतात? आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असे काही गुंतून जातो, की आपल्याला वाटायला लागतं की आपण कोणीच नाही या जगात. आपण नियति नाही बदलू शकत. आपल्या आत जे जग आहे, त्यापेक्षा बाहेरचं जग फार वेगळ आहे, आणि जास्त खरं आहे.
गेल्या काही वर्षात बदललेलं material science याच्या अगदी विरुद्ध सांगतं. त्यानुसार जे आपल्या आत घडतं, त्यावर बाहेरचं जग आणि वास्तव बदलतं. पूर्वीचे तत्वज्ञ सांगत की जर का मला ठेच लागली तर ती जाणीव खरी आहे, वास्तव आहे, कारण ती मी अनुभवू शकतो. पण हा देखील अनुभव आहे, त्याला खरं का म्हणायचं? मग जे पाहतो ते वास्तव का?
आपण जेव्हा पाहतो, तेव्हा मेंदूमधले काही भाग काम करतात. जेव्हा डोळे बंद करून आपण काहीतरी पाहतो, किंवा स्वप्न पाहतो, तेव्हाही तेच भाग काम करतात. मग पाहतं ते कोण? डोळे की मेंदू? आणि वास्तव काय आहे? डोळे पाहतात ते का मेंदू पाहतो ते? खरी गोष्ट अशी आहे, की माणसाचा मेंदू दृश्य आणि स्मरण याच्यात फरक करू शकत नाही. मानवी मेंदू रोज जवळजवळ 40GB माहिती प्रोसेस करतो, पण त्यातली फ़क्त 20KB आपल्याला जाणवते. हे 20KB असतात आपला परिसर, आपलं शरीर आणि वेळ यासाठी. याचा अर्थ असा आहे की आपण फ़क्त हिमनगाचं टोक पाहतो आणि त्यालाच खरं मानतो.
मेंदूचा visual cortex हा भाग खरं तर पाहतो. आणि तो फ़क्त अशाच गोष्टी पाहतो की ज्या त्याच्यालेखी ख-या आहेत. एक गोष्ट सांगतात, की जेव्हा कोलंबस वेस्ट इंडीज मधे पोचला, तेव्हा तिथल्या आदिवासींना त्याची जहाजं दिसलीच नाहीत, कारण त्यांनी पूर्वी जहाज पहिलंच नव्हतं. मग काही हुशार लोकांनी जहाजामुळे उठणा-या लाटांचा अभ्यास केला, आणि त्यांना जहाजं दिसली! म्हणजे आपण तेच पाहतो जे खरं आहे, शक्य आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण पाहतच नाही....आणि जे आपण पाहतो त्याचं प्रतिबिम्ब आपल्या आठवणीत असतंच..मग आपण पाहतो का आठवतो? आपल्या मेंदूला सत्य आणि आभास यात फरक करता येत नाही. मग आपण पाहतो ते काय आहे?
आता थोड़ा अजून विचार करुया. प्रत्येक गोष्ट ही अणू-रेणू ची बनलेली आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे . आपल्याला शाळेत जे चित्र दाखवतात, त्यात अणु भरीव चेंडू सारखे दाखवतात. पण प्रत्यक्षात विचार केला तर proton आणि neutron हे अत्यंत छोटे आणि नगण्य आहेत, आणि त्यांच्याभोवती electron चा एक ढग आहे. यामधली जागा ही vacuum . म्हणजेच, प्रत्येक वस्तू ही अशा vacuums ची बनलेली आहे. जितका अणु मोठा तितकी vacuum मोठी. मग कुठल्याही वस्तूच्या आस्तित्वाला काय अर्थ आहे? कारण ज्याला mass आहे, ते अतिशय कमी, नगण्य जागा व्यापतात, आणि उरलेली जागा ही पोकळी असते..आता electron ज्या ढगात फिरतात, तो probability चा ढग आहे, आणि त्यात 'n ' इतक्या शक्यता आहेत!!
क्वांटम फिजिक्स नुसार क्वांटम एकमेकांना superpose करतात. म्हणजे एक mass एका वेळी 'n ' जागी असण्याची शक्यता असते . जेव्हा आपण पाहतो तेव्हा एक शक्यता आपल्याला दिसते. जेव्हा आपण पाहत नाही तेव्हा तेच mass किंवा matter म्हणूया, परत या अगणित शक्यतांमध्ये फिरायला लागतं!! मग ही शक्यता कोण निवडतं?
फिजिक्स मधे 'observer ' ही एक धमाल कल्पना आहे. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करुच शकत नाही!
पण हा 'observer ' तरी कोण आहे? डोळे का मेंदू?
फार झाला आचरटपणा. उरलेलं नंतर कधीतरी.
No comments:
Post a Comment