Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Tuesday, October 16, 2012

हंस अकेला (भाग दुसरा)


आधीचा भाग इथे पहा.
पहिला भाग लिहून झाला आणि त्यानंतर बरेच दिवस आळसात गेले. मध्यंतरी मीही सरकारी नोकरी सोडून मुंबईमधे स्थलांतर केलं. या भानगडीत लिहायला मस्त उशीर होत गेला. त्यामुळे झालेल्या उशिराबद्दल निर्लज्जपणे काहीही न लिहिता थेट मुद्द्याला हात घालतो.
मी कलकत्त्याहून मुंबईमध्ये आलो, तेव्हा माझ्या नशिबाने मुकुल शिवपुत्र यांनी पुण्यात दोन अविस्मरणीय मैफली केल्या. पहिल्या मैफिलीतल्या सावनी, सावनी नट, बिहाग आणि दुस-या मैफलीमधला शिवकेदार आणि चंद्रकंस यांची धुंदी अजूनही उतरत नाहीये. या दोन्ही मैफलीत बुवा जे काही तब्येतीत गायले आहेत, की क्या कहे!  पार झपाटून टाकणा-या दोन बैठकी. आधी जे काही लिहायचं ठरवलं होतं, ते पार विसरून गेलो.
आकुर्डीला झालेल्या मैफलीत मुकुलजी सावनी बिहाग, सावनी, सावनी नट गायले. त्यानंतर त्यांनी मारुबिहाग मधलं भजन सादर केलं. मैफलीचा समारोप करताना त्यांनी महाकवी जयशंकर प्रसाद यांची (स्वत: संगीतबद्ध केलेली) कविता सादर केली.
"बीती विभावरी जाग री!
          अम्बर पनघट में डुबो रही-
         तारा-घट ऊषा नागरी।
खग-कुल कुल-कुल-सा बोल रहा,
किसलय का अंचल डोल रहा,
          लो यह लतिका भी भर ला‌ई-
          मधु मुकुल नवल रस गागरी"
कालिदासाच्या प्रतिमासृष्टिची आठवण करून देणारी ही कविता. जयशंकर प्रसाद यांच्या रचना भाषासौष्ठव, उपमा यांच्यादृष्टीने वेगळ्या समजल्या जातात. या कवीच्या कविता आजकाल अभावानेच वाचायला-ऐकायला मिळतात (माझ्या हिंदीच्या दिव्य वाचनात तर नाहीच!). सुरेख शब्द, आणि भैरवीचा हुरहुर लावणारा स्वरसाज. इतकं साजरं गारुड यापूर्वी खूप कमी वेळा ऐकायला मिळालं आहे. तशीच पुण्याला सहा वर्षांपूर्वी गायलेली भैरवी. हीरचे करूण शब्द. "मैंदा बिछड़ा यार मिलांदा.." आणि भैरवीचे सूर. अजूनही ही भैरवी ऐकली की पाणी येतं डोळ्यात.
मुकुलजींचे साथीदार म्हणतात की आजवर कुठल्याही दोन मैफलीत मुकुलजी एकच भैरवी गायलेले नाहीत.आणि विचार केला तर लक्षात येतं की हे खरं असावं. मी आजवर ऐकलेल्या मैफिलींमध्ये खरंच एक भैरवी परत ऐकलेली नाहीये. आणि बंदिशींचा पट केवढा मोठा. कबीरापासून कुमार गंधर्वांपर्यंत. कुमारजींच्या बंदिशी साहजिकच जास्त वेळा ऐकायला मिळतात, पण त्यांच्या जोडीला हीर, सूरदास, तुलसीदास, माळवी लोकधून आणि अनेक पारंपारिक बंदिशीपण ऐकल्यात.
आत्ता लिहिताना मी प्रामुख्याने दोन-तीन बंदिशी समोर ठेवून लिहिणार आहे. या मुकुल शिवपुत्र यांच्या संस्कृत रचना आहेत. त्यानंतर आपण बाकीच्या पैलूंचा विचार करू.
पहिली बंदिश मी एकदा पुण्यात ऐकली, तेव्हा ती भैरवमधे स्वरबद्ध होती. नंतर अहमदाबादेत हीच बंदिश मी श्री मध्ये ऐकली. आणि नंतर ही श्री मधेच स्वरबद्ध झालेली दिसते, आणि भैरवपेक्षा श्री या रचनेच्या रसपरिपोषासाठी जास्त योग्य वाटतो. मध्यलय रूपक मधली ही रचना आहे. 
'जगतमंगलभंगकृत सन्मंगलप्रद पालय शिवतनय हेरम्ब
पार्वतीप्रियबालक गजमुख गिरिजनुत दितिजान्तक, गणनायक 
वरदपाशसुमोदकांकुशविधृत सिंदुरांग शुभकर पालय, शिवतनय हेरम्ब(...)
मामनन्यगतिम्, प्रसीदमतिम् प्रबोधकरी सुवाक्पटुताम् महि देहि 
निर्विघ्नकरी परमोदारनामस्वकम्पकम कुरु पालय शिवतनय हेरम्ब'
जगातील अमंगल भंग करणा-या, मंगलप्रद अशा हे शिवतनय हेरम्बा, आमचे पालन कर, तूच माझी एकमेव गती आहेस, मजवर कृपा कर आणि मला वाक्पटुत्व दे, निर्विघ्नता दे  अशा अर्थाची ही रचना आहे. एखाद्या जुन्या संस्कृत काव्याचा भास व्हावा असे समास आणि संबोधने यांनी अजूनच समृद्ध झालेली ही रचना.

दुसरी बंदिश श्याम कल्याण मधली, मध्यलय त्रितालात बांधलेली आहे.
'कल्याणी कल्याणकरी, जय काली कल्याणकरी
जय श्यामा कल्याणकरी, जय गौरी कल्याणकरी
श्रीदशमुख दशकर दशसुपदा, श्रीमरकतमणि कान्तिप्रभा
मा सदया, भवभयहरणा भक्तमनोवांछितफलदा (...)
श्रीसुरदेहसंभूत शिवा, श्रीपतिनेत्रप्रभातवरा
मा सदया परब्रह्मघना, सच्चिदानंदबोधप्रदा'
पाचूच्या तेजाने कान्तिमान झालेली, दहा मुखे असलेली अशा कालीची ही स्तुति आहे.या रचनेचा मागोवा घेताना मी थेट रामकृष्ण परमहंस यांच्या लेखनापर्यंत पोचलो. कालीबद्दल लिहिताना त्यांनी 'अखंड-सच्चिदानंद' हा शब्द वापरला आहे. काली कृष्णवर्णा आहे कारण ती परब्रह्म आहे. जसं अनंत अवकाश काळ्या रंगाचे, तसे अनंत परब्रह्मही काळ्या रंगाचे असं ते लिहितात. कालीसाठी परब्रह्म, सच्चिदानंद हे शब्द माझ्या पाहण्यात इतरत्र नाहीत. त्याचप्रमाणे कालीसाठी सदया, कल्याणकरी, कल्याणी ही संबोधनेही अस्सल बंगाली परम्परेतली (कल्याणेश्वरी, करुणामयी इत्यादी) वाटतात. या रचनेचा अजून एक विशेष म्हणजे श्यामा आणि कल्याणी या शब्दांचा  सुन्दर वापर, आणि श्याम कल्याण मधली स्वररचना. कालीचे श्यामा हे संबोधनही बंगाली परम्परेतलेच.
तिसरी रचना नक्की मुकुल शिवपुत्र यांची आहे का नाही याबद्दल मला खात्री नाही, परन्तु भाषेचा डौल आणि रचना बघता ती त्यांनीच लिहिली असावी, असं वाटतं.
'तं वन्दयामि गोविन्दं, कुंदरदनशुभमंदहास्ययुत चन्द्रवदनमजयुधृतधरणं
अम्बरसदृशमदम्भफणितमालम्बरहितसुखमम्बुजनाभम'
बाणभट्टाची आठवण व्हावी अशी ही दीर्घ समासांनी सजलेली, हमीर मधली रचना आहे. मुकुल शिवपुत्र यांनी ही पुण्यात सादर केली. 
याशिवाय भैरवमधे एक शिवस्तुति आहे, पण शब्द फारच अंधुक आठवत असल्याने ती इथे देत नाही. या सर्व रचनांमधून मुकुल शिवपुत्र यांचे संस्कृतवरील प्रभुत्व, भाषेची प्रगल्भता दिसतेच, पण मला आश्चर्य वाटतं ते त्यांच्या अफाट वाचनाचं. अनेक भाषांतील तत्वज्ञान, काव्य यांचा प्रभाव त्यांच्या रचनांमध्ये दिसतोच, आणि जोडीला त्यांचं इतिहास, भारतीय संस्कृति यातलं प्रभुत्वही दिसतं. प्रत्येक रचनेला तत्वज्ञानाची आणि अभ्यासाची एक पार्श्वभूमी आहे, आणि हे कुठेही ओढून ताणून आलेलं नाही. सा-या रचना अर्थदृष्टया सुबोध आहेत, आणि सहज आहेत. 
इतर बंदिशी गातानादेखील मुकुल शिवपुत्र यांची बंदिशींची निवड पाहण्याजोगी असते. सदारंग, अदारंग, यांसारखे पारंपरिक रचनाकार, कुमार, गुणिदास, वझेबुवा यांसारखे आधुनिक रचनाकार यांच्या जोडीला मध्वमुनीश्वर, सूरदास, तुलसीदास, इत्यादी कवीही त्यांच्या मैफलीत हजेरी लावतात. अत्यंत विचारपूर्वक केलेली बंदिशींची निवड आणि रागांचा क्रम, रागाचा भाव आणि बंदिशीचे शब्द यातलं नातं याने प्रत्येक मैफल एक अविस्मरणीय अनुभव होऊन जाते.
लोकसंगीत आणि मुकुलजी हा एक स्वतंत्र लेखविषय आहे, पण माझा लिहिण्याचा एकंदर उत्साह बघता लिहायला बसलोच आहे, तर फार फाफटपसारा न करता आत्ताच लिहावं हे बरं.
अहमदाबादेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या मैफलीनंतर मुकुल शिवपुत्र यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचं नातं उलगडून सांगितलं होतं. होनाजी बाळा, अनंतफंदी, रामजोशी यांच्या लावण्या हा मुकुलजींचा अभ्यासविषय आहे. अनेक जुन्या लावण्या त्यांना मुखोद्गत आहेत, कित्येक त्यांनी स्वरबद्ध केलेल्या आहेत. या लावण्या जे तत्वज्ञान सांगतात, अध्यात्म सांगतात त्याचा त्यांनी अभ्यास केला आहे असं दिसतं.
एखादा राग मांडत असताना त्या रागाचं मूळ कुठे आहे, हे माहिती असेल तर रागविस्तार अजून बारकाईने करता येतो. मालवती, बिहारी, यांसारख्या रागांनी लोकधुना शास्त्रीय संगीतात आणल्या. तसंच मालकंस, कल्याण, जोग, छायानट या आणि इतर अनेक रागांची मुळं लोकसंगीतात आहेत, पण अर्थात तिथे या रागांचं रूप बदलतं. मालकंस लोकसंगीतात रिषभ लावून गायला जातो. पंजाब मधले झूले, टप्पा, बंगाल मधील बाऊल, राजस्थानात मांड इत्यादी लोकासंगीतात अनेक राग कसे येतात याचा मुकुल शिवपुत्र यांनी निश्चित विचार केलेला आहे.
कलाकार किती मोठा असू शकतो, किती बहुश्रुत असू शकतो याची प्रचिती मुकुल शिवपुत्र यांच्या गायकीचा विचार करताना सतत येत राहते. असा गायक यापूर्वीही कधी झाला नसेल, कदाचित पुढेही होणार नाही. मुकुलजींच्या गायकीचा घेतलेला हा मागोवा अत्यंत अपुरा, तोकडा आहे, आणि मी हे लिहिताना कमी पडलेलो आहे याचीही मला जाणीव आहे. जे काही मला सुचलं, ते लिहून टाकलं.
काय म्या पामरे बोलावी उत्तरे ।
परी त्या विश्वंभरे बोलविले ॥२॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा ।
चालवी पांगळा पायाविण ॥४॥
असा हा लिहिण्याचा प्रकार आहे. जे काही लिहिलं, त्यामागे मुकुल शिवपुत्र यांची अजोड गायकी आहे. ही गायकी समजून घेण्याचा प्रयत्न करावा, आणि तिचा आनंद घ्यावा एवढं तरी  आपल्या हाती नक्कीचआहे.
(समाप्त)


  

1 comment: