Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Thursday, July 5, 2012

कुमार गंधर्व- एक दर्शनमैफल अर्ध्यातूनच सुरु होते.
आधीचा भाग माहिती नाही कुठे आहे ते.
साधी, घरगुती मैफल. इनेगिने लोक. काही परिचित चेहरे दिसतायत.
मधूनच दाद ऐकू येत आहे.
मैफलीच्या मध्यभागी तुम्ही आहात, कुमार.
साधा पांढरा कुडता आणि पायजमा. समोर एक वही.
लहान मुलासारखा निरागस चेहरा. विलक्षण बोलका.
तितकेच बोलके डोळे.
जणू तुम्हाला दिठीसमोर सुरांचा प्रवाहो दिसतो आहे.
वरच्या पट्टीतला तुमचा धारदार आवाज.
तानपुरे तुम्हीच लावले असावेत, कारण तेही आत्यंतिक सुरेल लागलेत.
मागे स्वरसाथीला कोणी नाही.
तुम्ही एकटेच गात आहात, कुमार.
अतिशय सहजपणे.
आनंदाने.
तुमचा आवाजही कमालीच्या वेगाने फिरतो आहे.
एक एक सूर जीवघेणा. आर्त.
तुम्ही मालकंस गाताय.
तीन-चारशे वर्षं जुना राग. समुद्रासारखा विराट. गंभीर.
जितकं खोल जावं तितका खोल होणारा.
अनेकांनी गायलेला.
तुम्ही लीलया गात आहात. सारं काही मालकंस झालं आहे.
षड्ज-मध्यम, गंधार-धैवत आणि मध्यम-निषाद. अनाहत नाद आणि संवाद.
बंदिशही सुरेख आहे. झपताल, मध्यलयीतला ठेका.
"हम भये जंगम, रूप जगत सार
मेहरबानी करो, दरसन दो प्रभु
तुम भये रूप अरूप जगत सार"
गंधार-षड्जाच्या मींडमध्ये तुम्ही रिषभ दाखवताय बहुतेक.
तोही हलकाच. आभास निर्माण होईल एवढाच.
कदाचित आधीचा, अजून जुना मालकंस असाच रिषभ घेऊन येत असावा.
आदिकालापासून सुरु असलेला हा मालकंस.
पण मला मजा वाटतीये ती तुमच्या सहजतेची.
सहज नदी वाहत जावी तसं सहज गाणं चालू आहे.
ऊस्फूर्त हातवारे. डोलणं. चेह-यावर क्षणात बदलणारे भाव.
जणू तुम्ही कोणाशीतरी गप्पा मारत आहात.
कितीदा तुमच्या चेह-यावर हसू दिसतंय. तेही लहान मूल हसावं तसं.
हा निखळ आनंद. ऋषिंनी 'ब्रह्मानंद ' म्हटलाय तसा.
गाता गाता तुम्ही थांबता. बंदिशीचा अर्थ सांगता,
" 'ये सब भये सोहर'  म्हणजे जे काही घडतंय ते सुन्दर आहे.
सब अच्छा है.
छान आहे सगळं. आता आपण काय करायचं त्याला?"
आणि तुम्ही पुन्हा गाऊ लागता.
श्रोते आणि तुमचा संवाद तर चालूच आहे,
पण दुसरा शब्देविण संवादू कोणाशी?
स्वत:शी? सुरांशी? की त्याहीपलिकडे असलेल्या कोणाशीतरी?
तुम्हीच सांगता, गाणं हे काही केवळ सात सुरांत बांधलेलं नाही.
ध्वनिचे नुसते संकेत असतात, नाद निनाद असतात अशा प्रांतातून ते येतं.
तुमचा त्याच शून्य ध्वनिशी संवाद चालू असेल.
ज्या निर्गुण आवाजाचा तुम्ही ध्यास घेतला होता, त्या निर्गुणाशी.
तुम्हाला ज्यांनी गाताना पहिलं, ते खरंच भाग्याचे, कुमार.
तुम्ही गेलात तेव्हा मी पाच-सहा वर्षांचा असेन.
त्यामुळे तुम्हाला गाताना कधीच पहिलं नाही मी.
अशी सलग मैफल नाहीच.
आजवर तुमचं गाणं भरभरून ऐकलं आहे तरीही.
पण कोणीतरी रेकॉर्ड करून ठेवलेली ही मैफल बघताना नजर हलत नाहीये.
मालकंस झाल्यावर तुम्ही अजून एक दोन बंदिशी ऐकवता.
बहुतेक कुठला तरी कल्याण.
मग एक ठुमरी. तब्येतीत.
दोन अंत-यांसकट.
सूरदासाची भैरवी सुरु झाली आहे.
"निकसी कुंवर, खेलन चले रंग होरी.."
मैफल संपत आल्याची जाणीव आहे,
पण ही भैरवीदेखील नेहमीसारखी उदास हुरहुर लावत नाहीये.
सारं काही तृप्त, शांत, प्रसन्न आहे.
भरून पावल्याचं समाधान आहे.
तुम्ही गात आहात, कुमार.

कायमचे. मैफल संपली तरी.

13 comments:

 1. chhanch.. photo apratim aahe, audio clips cha ka hi reference milel ka? Baki tu asach lihit raha, asa watat..

  ReplyDelete
  Replies
  1. गुरूजी, आज खूप दिवसांनी (का वर्षांनी?) आपले पाय आमच्या ब्लॉगला लागले....आम्ही धन्य जाहलो. :P काय म्हणताय? काय चालू आहे आजकाल?
   फोटो रघू राय नावाच्या फोटोग्राफरने काढलेला आहे. त्याचं आख्खं पुस्तकच आहे गायक-वादकांच्या फोटोचं. फार अप्रतिम पुस्तक आहे. आणि ऑडियो क्लिप बनवणं जरा अवघड आहे रे, हवं असेल तर तुला मेल वर एक छोटी क्लिप पाठवतो.
   मधून मधून असेच भेटत जा आम्हाला. मी काय, लिहित राहीनच तुम्ही वाचणार असाल तर. :) :)

   Delete
  2. guruji??? please. mi wachto re tuza blog.. Raghu Rai baddal aikal aahe, pustak sangrahi thevave lagel aata. ani ho, jamal tar mail pathav, please..
   mi blog parat parat wachat rahin re , tu fakt lihit raha..

   Delete
  3. रघू रायचं पुस्तक मलापण विकत घ्यायचं आहे. संग्रही असावं असं खरंच आहे ते.
   लिहिण्यासारखं बरंच काही आहे. परत लिहीनच काहीतरी. तसाही आजकाल मला काही दुसरा उद्योग नाहीये . :P
   तुला आजच मेल पाठवतो . मालकंसमधल्या एक-दोन लहान बंदिशी आहेत. गंधार-षड्ज संगतीसाठी ऐकाव्या अशा. कुमारांनी 'मालकंस दर्शन' नावाचा कार्यक्रम केला होता त्यातल्या. एक अजब षाडव मालकंस पण आहे पण फार मोठी फाईल आहे ती. मेल वर नाही येणार.
   आणि तू आहेसच गुरूजी. तू नसतास तर मी ब्लॉग लिहायला सुरुवात कशी केली असती? :P खूप दिवसांनी तुला ब्लॉग वर भेटून बरं वाटलं. :)

   Delete
 2. Kumar Gandharvanchya ganyavar prem karanaarya koni blog var lihilay....sahi.

  ReplyDelete
 3. अश्विन .....कुमार आणि कबीर ह्यांचा मिळून एक शेला आहे....मी तुझा हा ब्लॉग मधे एकदा बघितला होता. तेंव्हा भूगोलाचा अभ्यास केलेला कोणी हुशार सरकारी बाबू आहे असे वाटले होते. पण आज तुझी कुमार गन्धर्वांवरची पोस्ट पहिली, मग बाकी त्या संदर्भातले तू लिहिलेले वाचले आणि दिल खुश ..... मी तास न तास ही निर्गुणी ऐकते....मन भरले असे कधी झाले नाही. असाच लिहित रहा. शुभेच्छा !!!
  अनघा

  ReplyDelete
  Replies
  1. अनघा,
   कुमार, कबीर आणि मुकुल शिवपुत्र या तिघांच्या मी प्रेमात पडलो, त्यालाही आता सातेक वर्षं झाली. मी आधी कुमार आणि कबिरावर लिहिलंच होतं. कबीर जेव्हा भेटतो, तेव्हा त्याच्यापलिकडे काही दिसतच नाही. कुमारांचंही तसंच. खरं तर कुमार आणि मुकुल, बाप-लेकाची ही जोडी केवळ अजोड आहे. मुकुल शिवपुत्रसारखा गायक तर गेल्या हजार वर्षांत झाला नसेल. या दोघांचं गाणं ऐकलं, बोलणं ऐकलं की दुसरं काही ऐकावंसंच वाटत नाही. माझं नशीब थोर म्हणून यांचं गाणं भरभरून ऐकायला मिळालं मला.
   हुशार सरकारी बाबू :D तो तर आहेच मी! गेल्या वर्षीच ही नोकरी माझ्या नशिबी आली, त्यामुळे मी त्यात अजून मुरलो नाहीये नशिबाने. :) भूगर्भशास्त्र हा माझा पोटापाण्याचा उद्योग आहे, त्यापेक्षा विशेष महत्त्व नाहीये त्याला. ही सरकारी नोकरी पण केवळ तेवढ्यासाठीच आहे.
   निर्गुणी भजनं कितीही ऐकली तरी मन भरत नाही, हे अगदी खरं. त्यामागची कुमारांची विचारप्रक्रियाही फार सुन्दर आहे. 'मला उमजलेले बालगंधर्व' असो, 'तुकाराम दर्शन' असो, 'मालकंस/मल्हार/कल्याण/तोडी दर्शन' असो, कुमारांची प्रतिभा सर्वत्र अनिर्बंध संचार करते. असो. याविषयी जितकं लिहावं तितकं कमी.
   प्रतिक्रियेबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खरंच खूप आभार! :)

   Delete
 4. भाग्यवान आहेस.
  कबीराचे शब्द कुमारांच्या आवाजात ऐकणं हे 'त्या' निर्गुणाची चाहूल घेण्याइतकंच निरामय वाटतं..
  अंतर्बाह्य मुक्त, ब्रह्ममय झालेला स्वर तो!

  ReplyDelete
  Replies
  1. इनिगोय,
   खरंच नशीब थोर म्हणून हे रेकॉर्डिंग बघायला मिळालं. मालकंस फारच अप्रतिम आहे यात. केवळ अविस्मरणीय.

   Delete
 5. wah..aple avadate vishay. Chaan lihitay apan.

  thanks.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद अमित!

   Delete