Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Thursday, November 10, 2011

एका (सरकारी) पावसाळ्याचा जमाखर्च

पाहता पाहता एक वर्ष झालं. वर काही महिनेही उलटून गेले असतील.
तसं पाहिलं तर एक वर्ष हा फार मोठा कालावधी नाही. त्यातही माझ्यासारख्याच्या आयुष्यात तर एक वर्ष गेलं काय, किंवा शंभर वर्षं गेली काय, विशेष फरक काय पडणार? शरीर आणि मनावर ठसे उमटवण्यापलीकडे काळ विशेष काय करणार माझ्या आयुष्यात? मग हे लिहायचा अट्टाहास तरी कशाला? रिकाम्या मनाला रिझवण्यापलीकडे काय उपयोग आहे याचा? एका वर्षापूर्वी मी घर सोडून माझ्या पोटामागे जाताना एक पोस्ट लिहून गेलो होतो. त्यावेळी लिहायचा उद्देश केवळ मनात जमा झालेलं सारं ओकून टाकायचं असा होता. आत्ताचाही उद्देश काही फार निराळा नाही. हे एका अर्थी स्वगत आहे, एका अर्थी प्रकट आहे.
बाकी स्वत:बद्दल लिहायचं (आणि स्वत:बद्दल लिहीतच राहायचं) ही काही फार चांगली गोष्ट नाही, पण दुसरं भांडवल आहे काय माझ्यापाशी? जी.एं नी कुठेतरी लिहिलंय की लिहिणा-याचं आयुष्य त्याच्या लेखनात शोषलं जातं. मी काही लेखक नाही, पण एकंदरीत आपल्याच आयुष्याकडे पाहत राहायचं, आपल्याच मनाचे टवके आपणच उडवत राहायचे असा हा सारा खेळ आहे. कागदावर, किंवा स्क्रीनवर मांडलेले हे तुकडे कोणीतरी पाहतं इतकंच, पण त्याने तरी फरक असा काय पडतो? एकदा लिहून ते दुस-याने पाहावं अशी अपेक्षा ठेवली की ते लिहिलेलं परकं होऊन जातं. मग कोणी भलं-बुरं म्हणावं अशी अपेक्षाही अपराधी वाटायला लागते. मग हे ठेवावं का आपल्यासाठी? का अजून काही अनुभव दूर करून टाकावेत आपल्यापासून? जाऊ दे. जसा हात आणि डोकं चालत राहील त्यामागे जात राहावं झालं. बाकीचे विचार आत्ताच कशाला? (बाकी लिहिणं हा स्वान्त:सुखाय असा उद्योग आहे, आणि म्हटलं तर काहीसा आधारदेखील यात शंका नाही. निदान वेळ तरी बरा जातो. तर सांगायचा मुद्दा असा, की जे काही आत्ता लिहिलं जाणार आहे, ते अत्यंत विस्कळीत, असंस्कारित, कंटाळवाणं, अघळपघळ, आणि पाल्हाळीक असणार आहे. त्यात प्रथमपुरुषी एकवचनी अव्यय अनेकदा येणार आहे. आपापल्या जबाबदारीवर वाचावे.)
या एका वर्षाने काय काय दिलं? घर सोडून जाताना ओले झालेले डोळे त्यानंतरही दोन-तीन वेळा परत भिजले. पण आठवणी म्हटल्यावर पहिल्यांदा हेच का आठवावं? चांगल्या आठवणींचेही कितीतरी तुकडे झोळीत आहेत की. हिमालयापासून समुद्रापर्यंत केलेला वीस हजार मैलांचा प्रवासही गाठीशी आहे. थंड रात्री जमलेल्या मैफली, रात्र रात्र जागून केलेले रिपोर्ट आणि प्रेझेंटेशनं, पकडलेले साप-विंचू-ससे-बेडूक-खेकडे, विंचू चावून सुजलेले हात,  डीहायड्रेशनमुळे गलितगात्र होणं, त्यावर केलेले अर्वाच्य विनोद, वेळी अवेळी रंगात आलेल्या क्रिकेट म्याचेस, त्यात शेकून निघालेले गुडघे किंवा जबडे, हेपण आहे की गाठोड्यात. लिहावं का याविषयी? का जपून ठेवायच्या या आठवणी? सहा महिन्यांच्या सतत प्रवासानंतर निरोप घेताना लहान मुलासारखे झालेले माझे मित्र..सांगावं का हे? मागे काही बांधून ठेवायचं झालं तर या आठवणीच आहेत माझ्याकडे. बाकीच्या जगाच्या दृष्टीने जरी मी 'सेटल' झालेलो असलो, तरी माझं स्वत:चं ज्याला म्हणता येईल अशा या आठवणीच आहेत जमलेल्या. बाकी साचलेला पैसा माझा नाही (असा आहेच किती?), की बाकी निरर्थक वस्तूंचा गाळपण माझा नाही. आणि वर्षापूर्वी पडलेला प्रश्न आत्ताही अनेकदा मजपुढे येऊन उभा राहतो, की ज्या गोष्टी माझ्या नाहीत, त्या जमा करणं आणि सतत करत राहणं हेच आयुष्य आहे का? जोवर मी का जगतो आहे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, तोवर मी स्थिरावलो आहे हे म्हणण्याला तरी काय अर्थ? वर्षभरापूर्वी काढलेली प्रश्नचिन्हं एका वर्षानंतर अजूनच मोठी झालीयेत. अजूनही थोरोचं पुस्तक वाचलं की अनेक प्रश्न भोवती गोळा होतात आणि मन खाली जाते आपोआप. आपलं घर, आपला पैसा, आपल्या वस्तू आणि आपण जगतो ते आयुष्य हे सारं किती वरवरचं आहे याची जाणीव त्रास देऊ लागते. आपण 'चलती चाकी' मध्ये आहोत आणि हळूहळू भरडून निघत आहोत हे पाहून निर्विकारपणे खांदे उडवायची लाज वाटायला लागते. महिना काही हजार रुपये मिळतात म्हणून आपण काय काय करतो! चार लोकांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून आपण आपल्यावर किती झाकणं घालून घेतो..शेवटी हा सारा खेळ कोणासाठी आहे? माझ्या हळूहळू बोथट होणा-या जाणीवा ही मी काही हजार रुपयांसाठी दिलेली किंमत आहे?
ही नोकरी करतो म्हणजे मी देशाची सेवा करतो असा भ्रम सुदैवाने मला झालेला नाही. नकाशावर काढलेल्या अर्थहीन रेषाही आता खुज्या वाटू लागल्या आहेत. समजा एखाद्या धरणाची जागा मी सांगितली तर नंतर होणा-या नाशाला मी जबाबदार ठरत नाही का? केवळ कामासाठी काम करताना करदात्यांचा पैसा वाया जातो, हे पाप कोणाच्या माथ्यावर? निरर्थक उपक्रम बनवणा-यांच्या, का हे काम निरर्थक आहे, हे माहित असूनही त्यात पगारासाठी काम करणा-या माझ्या? एखाद्या खनिजाचा साठा शोधून काढला तर नंतर होणारी उजाड जमीन कोणाकडे बोट दाखवणार? 'विकास' या गोंडस नावाखाली जेव्हा काही आदिवासी त्यांच्या जमिनीतून मुळासकट उपटले जातात, लाखो प्राणी बेघर होतात,  तेव्हा कोणालाच अपराधी कसं वाटत नाही? मग केवळ दोन वेळचं अन्न-वस्त्र, या एका गरजेपोटी मी या पापाचा भार वाहतो आहे का? काय उत्तर देणार? वर्षभरापूर्वी जर का मी गोंधळलो असेन तर आत्ता हा गोंधळ अजूनच वाढलेला आहे. आणि सरकारी नोकरीचं व्यवच्छेदक लक्षण असणा-या कटकटी, वैफल्ये याला तोंड देताना हेच मुलभूत प्रश्न मला त्रास द्यायला लागलेले आहेत.
आपण किती खोटं आयुष्य जगत असतो? आपण आपल्या गरजा किती वाढवत असतो? तेही मला अमुक इतका पगार आहे, आणि मी तो असा खर्च करतो हे दाखवण्यासाठी? "अरे, अशा गाड्या मायलेजसाठी घ्यायच्या नसतात!" अशी वाक्यं मला तरी आता विकृत वाटतात. laptop झाला, आता आयपॅड. blackberry टाका, आयफोन घ्या, कारण तो घेण्याची तुमची परिस्थिती आहे हे जगाला दिसलं पाहिजे. पैसा हा होडी चालेल इतपतच असावा ही कबीराने पैशाची जी किंमत सांगितली आहे, ती या एका वर्षात पैसे मिळवल्यानंतर पूर्णपणे पटली, ही या वर्षाची जमेची बाजू.
या एका वर्षात अजून एक मोठा फायदा हा झाला की एकट्याने दिवस काढायची सवय झाली. घरापासून अडीच-तीन हजार किलोमीटर दूर  राहायचं या जाणीवेने पहिले काही दिवस परीक्षा पाहिली, पण नंतर सवय होत गेली. आता वाटतं की एकटेपणासारखा दुसरा सोबती नाही. ब-याच आधीपासून जडलेला हा एकटेपणा असा अचानक सोबतीला आला. गोनीदांची एक कविता आहे-
'आलो येथवर पावला पाऊली
वरती वडाची शीतल साउली..
सावळी  सावली देखीली रेखिली
गाईन म्हणतो एखादे गाणे
कधी काळीचे एकटवाणे...  
नका होऊ गोळा, एकला असू..क्षणिक स्मृतींनी मुसमुसू..
माझ्यावरती मजला रुसू द्या
छ्पराखालती मजला बसू द्या..'
अशा जातीचं एकटेपण, 'आपुलाची वाद आपणाशी', यात किती सुख आहे! गाणं, पुस्तकं यातल्या ज्या गोष्टी भोवती सदा गलबला असताना लक्षात येत नाहीत, त्या एकटेपणी लक्षात येतात. जर भोवतालचा गलबला फारच वाढला, तर कासवासारखं स्वत:ला बंद करता येतं, ही या नोकरीची देणगी. 'हम सब माही, सब हम माही, हम है बहुरी अकेला' हे म्हणणारा कबीर एवढा आपलासा यापूर्वी वाटला नव्हता. आयुष्याच्या अखेरीस जेव्हा सारी आतड्याची माणसं पुढे जातील, तेव्हाचा निष्प्रेम, निर्भेळ एकटेपणा समोर आल्यावर काय होईल ते माहित नाही, पण आत्ताचा एकलकोंडेपणा तरी सोबत्यासारखा वाटतो आहे हे खरं.  
असो. अजून बरंच काय काय मनात आहे, पण फार भरकट भरकट होण्यातही अर्थ नाही. हात राखून लिहितानाही एवढा फाफटपसारा झाला. आवरतं घ्यावं हे बरं. परत एकदा अर्धविराम. 

6 comments:

 1. काय लिहलस आहे..अशक्य!!
  खूप आवडलं

  ReplyDelete
 2. Yachwishay,
  खूप धन्यवाद!
  फार लिहावंसं वाटलं म्हणून लिहिलं खरं तर. तुम्हाला आवडलं, मला बरं वाटलं.
  अगत्य असो द्यावे!!

  ReplyDelete
 3. स्वतःची सोबत अधिक सुखावह असते.

  ReplyDelete
 4. अगदी खरं आहे. आपली भाषा, आपल्या आठवणी आपल्यासाठीच असतात शेवटी.
  ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. अगत्य असो द्यावे.

  ReplyDelete
 5. ही पोस्ट पूर्वीही वाचली होती. आज हा ब्लॉग पुन्हा बघितला तेव्हा परत वाचली. पुन्हा आवडली. कुणीतरी स्वतःशी प्रामाणिक राहून केलेलं लिखाण इतरांनाही विचार करायला लावतं. तसं झालंय या पोस्टच्या बाबतीत. अंतर्मुख करणारं लेखन.

  ReplyDelete
  Replies
  1. शीतल,
   तुमची प्रतिक्रिया वाचून खूप बरं वाटलं, आणि मुख्य म्हणजे काहीतरी लिहावं अशी इच्छा परत निर्माण जाहली :) आभारी आहे!!

   Delete