Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Sunday, November 29, 2009

भय इथले संपत नाही.....
अखेरीस २६\११ चे वर्षश्राद्ध थाटामाटात पार पडले, अगदी यथासांग!! मुंबईच्या धैर्याला सलाम! मुंबईच्या नागरिकांना सलाम
, शासनकर्त्यांना सलाम, आणि एकंदरीतच सगळ्या महाराष्ट्र आणि भारताला सलाम! जय हिंद!!
संकटातून पटकन सावरणे आणि परत आपल्या कामाला लागणे ही तर आपली जुनी सवय...
सामान्य नागरिकांनी जे काही केले, जे धैर्य दाखवले, जे काही केले ते खरेच स्तुत्य होते, पण आता नवल वर्तले आहे ते असे की आपली शासनयंत्रणादेखील हे सराईतपणे करू लागलेली आहे! एक वर्ष पूर्ण झाल्या-झाल्या आपली यंत्रणा जणू काही झालेच नाही अशा थाटात कामाला लागलेली आहे! लोक गाम्भीर्याने जल्लोष करून 'दहशतवादा विरोधात लढण्याची' शपथ घेत आहेत, शहिदांचे कुटुंबिय ठीकठिकाणी सत्कार स्वीकारत आहेत, सरकारवर सनसनाटी ताशेरे ओढत आहेत, सरकार पोलिसांना नव्या बंदुका आणि बुलेटप्रूफ जॅकेट्स देत आहे, शहिदांच्या नातलगांना मदत करत आहे, पोलिस पण आपल्या शक्तीचे प्रदर्शन करत आहेत, मेणबत्त्या मोर्चे, रॅली, श्रद्धांजलि, फ्लेक्स, पोस्टर्स!! एकंदरीत सगळे कसे जोरदार!!! कसे श्रद्धायुक्त!!! कसे सर्व वातावरण देशाप्रेमाने भारलेले!!!
पण हा देशद्रोही बघा काय बोलतोय!! म्हणे एका वर्षात सुरक्षेच्या दृष्टीने असे काय काम केलेत तुम्ही? एक टास्क फ़ोर्स तयार केलात, आणि पोलिसांना नव्या बंदुका दिल्यात...पण मुळात असे हल्ले होऊ नयेत म्हणून काय केलेत तुम्ही? किती नवीन बोटी घेतल्या? किती मेटल डिटेक्टर बसवलेत? बिघडलेले किती दुरुस्त केलेत? आज सी एस टी वर सुरक्षा व्यवस्थेची काय स्थिती आहे? पोलिसांची काय स्थिती आहे? मुर्ख कुठला!! अरे ही सर्व कामे चालू आहेत!! काही काही तर विचाराधीन आहेत
विचाराधीन!!!! आपले मंत्री काय रिकामटेकडे आहेत तुझ्यासारखे? त्यांना किती महत्वाची कामे असतात!! त्यातून वेळ मिळाला की करतील ते हीपण कामे!! जरा धीर धराल की नाही? एका वर्षात ते तरी किती म्हणून काम करणार?
बघा बघा अजून बोलतोय कसा हलकट!! म्हणे राजकीय पक्षांनी जे फ्लेक्स लावले त्यात हुतात्म्यांच्या जोडीने यांच्या नेत्यांचे फोटो, किंवा पक्षाचे नाव, किंवा कार्यकर्त्यांची नावे झळकत होती!! अरे त्याशिवाय लोकांना कळणार कसे की खरा देशभक्त कोण आहे ते!!! अजून बोलतोस चांडाळा!! म्हणे काही पोस्टरवर जे पोलिस अधिकारी मारले गेले, त्यांच्या पार्थिवाचे क्लोज-अप आणि त्यांच्या शोकाकुल नातलगांचे फोटो होते....हे असले फोटो लावून काय साध्य केले?? हरामखोरा, हौतात्म्याचे पावित्र्य कळते का तुला??? हेच टी व्ही वर दाखवत होते वर्षापूर्वी तेव्हा काय तुझे तोंड चिकटले होते? म्हणे खाजगी गोष्टी! देशासाठी करायला हवा त्याग! शिव शिव शिव!! नालायक, मारा याला जोड्याने!!! म्हणे राजकीय पक्ष या घटनेचे राजकारण करतायत! अरे त्याला जनजागृती म्हणतात!! पहा जरा आपल्या देशाची निस्वार्थी राजकारणाची परम्परा!!!! या दिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यात नऊ खासदारांनी रक्त दिले नऊ!!! याला म्हणतात निष्ठा!! हा खरा त्याग! नाहीतर तू!! राम राम राम !!! आता अजून बोललास ना बेशरमा, तर मार खाशील!!! आम्ही आहोत सहिष्णु, पण आमचा अंत पाहू नको!! या दिवसाचे गाम्भीर्य उभ्या देशाने पाळले, काय समजलास!! म्हणे थोड्या तारतम्याची गरज आहे, नाहीतर आजची स्थिती बघता हा दिवस पुढेमागे 'साजरा' केला जाईल!! चुप !! बोलू नकोस एक अक्षरही!! हलकट नालायक बेशरम देशद्रोही!! चालता हो इथून! पाकिस्तानात का नाही जात?? आम्ही महान, आमचा पक्ष महान, आमचा नेता महान, आमचे गुंड महान.......देश?? तो तर महान आहेच हो, पण आम्ही महान आहोत हे महत्वाचे....

1 comment: