संध्याकाळची वेळ आहे. गर्दीने लोकल भरलेल्या.
जनांचा प्रवाहो एकाच दिशेने वाहतो आहे.
जिकडे पाहावं तिकडे गर्दी.
शेवटचं लेक्चर संपवून मी बाहेर येतो.
कॉलेज संपवून आलेले अनेक विद्यार्थी बघता बघता समोरच्या प्रवाहात उड्या घेतात.
मागोमाग मीपण.
घराच्या ओढीने वाहणारा लोंढा माझ्या अंगावरून जातो.
अनेकजण धक्के देणारे.
मला ढकलणारे सहस्त्र हात..
बघता बघता एका लोकलमध्ये मी ढकलला जातो.
दिवसभराचा ताण, थकवा.
पूर्ण न झालेल्या अनेक अपेक्षांची गाठोडी....
बोलून बोलून कोरडा पडलेला घसा.
भोवताली झोपड्या, घाण, कचरा, दर्प.
धक्के देणा-या अनेकांवर राग..
मुंबईचा उकाडा.
मी माझा फोन बाहेर काढतो, इयरफोन कानात घालतो आणि डोळे मिटून घेतो.
तानपुरे झंकारु लागतात.
पाठोपाठ तुमचा बुलंद, भरीव षड्ज...
कोमल निषादावर तुम्ही विसावता आणि धैवताला स्पर्श करता हलकेच.
दोन निषादांचा नाजूक तोल.
तुम्ही मिया कि मल्हार गाताय, भीमण्णा.
"करीम नाम तेरो, तू साहेब सतार....."
निषादावरची तुमची वजनदार सम. पावसाचा पहिला थेंब पडावा तशी.
ढग दाटून यावेत अशी अस्वस्थ करणारी आलापी.
रिषभ-पंचमांचा सुरेख संवाद, अंगावर काटा येईल असा खर्ज.
"दुख दरिद्र दूर कीजे, सुख देहो सबनको...
सदारंग बिनती करत हो, सुन लिजो करतार"
मनातले अनेक हळवे कोपरे जागे होतात. मिटले डोळे भरून येतात.
अनेक प्रार्थना, अनेक अपेक्षा...
अनेकवेळा पसरलेला पदर..
कुठे घेऊन चाललेत हे सूर मला?
का माझिया मीपणाची जाणीव विरते आहे?
इथे कोणी नाही आता.
राग नाही, थकवा नाही
कबीर म्हणतो तसा कुठलाच पसारा नाही.
मी आहे, तुमचे सूर आहेत आणि माझा 'साहेब सतार' आहे....
मला नाही जायचं आता कुठे.
मी उतरतो. घरापासून दूर? असेन कदाचित.
काळे ढग भरून आलेले आहेत. पावसाचा अनाहत नाद चालू आहे.
मी भिजत चालू लागतो.
सबाह्य अभ्यंतरी भिजवून टाकणारा पाऊस.
रस्ते मोकळे आहेत, मी भिजतो आहे आणि तुम्ही गात आहात अण्णा.
फक्त माझ्यासाठी.
तुम्ही गेलात तेव्हा मी हजारो मैल दूर होतो.
रात्री एक मित्र म्हणाला, "पुण्याचं वैभव गेलं हो…"
आणि मी लहान मुलासारखा रडलो.
सवाई गंधर्वमध्ये जेव्हा तुम्ही शेवटचं गायला होतात,
तेव्हा स्तब्ध झालेल्या हजारो लोकांत मी तुमच्याकडे डोळे लावून बसल्याचं आठवतंय.
आज इथे, पाऊस पडताना, फार जाणवतं की आता फक्त तुमचा आवाज राहिला आहे.
सारं काही विसरून टाकायला लावणारा.
पाऊस कोसळतोच आहे....
तुम्ही गात आहात, अण्णा.
कायमचे.
दिवसाच्या, ऋतूंच्या प्रत्येक चक्रात.
मैफल संपली तरीही.