सुरुवातीलाच एक मस्त गोष्ट सांगतो. भालचंद्र नेमाडे लिखित 'हिन्दू- जगण्याची समृद्ध अडगळ' या कादंबरीच्या निमित्ताने कुठेसा परिसंवाद होता. या कुठेशा ठिकाणच्या हिन्दुत्ववादी संघटनांची वक्रदृष्टि 'अडगळ' या शब्दावर पडल्याने नेमाडे यांना पोलिस संरक्षणात बाहेर काढावं लागलं (सन्दर्भ- 'अनुभव' मे २०११). तात्पर्य काय, तर गेल्या भागात दिलेली यादी लांबवणं हे काही जड़ काम नाही. वर दिलेल्या आणि तत्सम अनेक स्वनामधन्य संघटना ही यादी कुठे तोकडी राहू नये याची पूरेपूर काळजी घेतायत आणि त्यामुळे माझी ही उदात्त मंगल मातृभूमि आणि उदात्त मंगल सनातन परम्परा शाबूत आहे, कलियुग असूनदेखील!
माझ्या पापी मेंदूत परत एकदा प्रश्नांचा तोफखाना चालू झालेला आहे. पहिला प्रश्न म्हणजे संस्कृतिची व्याख्या काय? ज्या गोष्टी आपले पूर्वज काहीशे किंवा काही हजार वर्षांपूर्वी करत होते त्याच आपण आजही करणं म्हणजे संस्कृती किंवा परम्परा असं म्हणता येईल का? माझे पणजोबा नित्यनेमे संध्या करत म्हणून मी आजही स्वत:ला कुठलेही प्रश्न न विचारता संध्या केलीच पाहिजे का? नाही केली तर माझ्या ब्राह्मण्यावर असे काय डाग पडतात? किंवा लोकमान्यांनी काहीशे वर्षांपूर्वी चालू केलेला गणेशोत्सव आज ज्या पद्धतीने साजरा होतो त्याला संस्कृती म्हणायचं का? कुठेतरी काहीतरी गल्लत आहे..व्याख्या चुकीची, म्हणून त्यावर उभारलेला डोलारा चुकीचा. आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत चाललेला, किम्बहुना काही राजकीय पक्षांनी स्वत:च्या फायद्यासाठी जोपासलेला सांस्कृतिक दहशतवाद हे कशाचं द्योतक आहे? आपण सुसंस्कृत असल्याचं? काहीच स्वीकारण्याची आपली तयारी नाही? उद्या जर का एखाद्या वंदनीय विभूतिला कमीपणा आणणारा विश्वसनीय पुरावा सापडला तर आपली काय भूमिका असणार आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर नाहीये आपल्याकडे. कारण असा पुरावा लोकांपुढे ठेवण्यापूर्वी पहिला विचार हाच असेल की कोणी आपलं पुस्तक जाळणार तर नाही? कोणी आपल्या तोंडाला काळं तर फासणार नाही? कुठेतरी फिर्याद झाली तर? कोणी खुनाची धमकी दिली तर? घरावर दगडफेक झाली तर? आणि जोवर असे विचार आपल्या विचारवंत, कलाकार, लेखक यांच्या मनात येत आहेत, तोवर आम्ही सुसंस्कृत आहोत असं म्हणायची आपल्याला लाज वाटली पाहिजे.
सध्या एकंदरीत धर्म, संस्कृती, परम्परा, इतिहास, यांना बरा बाजारभाव आलेला आहे. देश भ्रष्ट राजकारणी लोकांच्या पूर्ण घशात गेलेला असताना आमच्याइथे गाईला राष्ट्रीय प्राणी जाहिर करा ही मागणी जोर धरते, आणि भ्रष्टाचाराशी लढा देणा-यांपेक्षा "मला हम्मा! मला हम्मा!" असं ओरडणारे हे बालिश लोक जास्त गर्दी खेचतात. गंगेच्या पर्यावरणासाठी उपोषण करून मेलेल्या स्वामीपेक्षा वाट्टेल ते बोलणारा रामदेवबाबा आम्हाला जास्त जवळचा वाटतो. एम्.एफ. हुसेन, तसलीमा नसरीन, हे आमच्या देशात गुन्हेगाराचं आयुष्य जगावं लागू नये म्हणून देश सोडतात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आणि पूर्वाश्रमीचे गुंड आमच्या देशात नेते म्हणून दिमाखात मिरवतात. असा विरोधाभास हीच जर आपली सुसंस्कृतपणाची व्याख्या असेल तर आम्ही सहिष्णू आहोत आणि आमच्या घटनेने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्हाला बहाल केलेलं आहे असा टेंभा आपण का म्हणून मिरवावा? कोणी आता मला त्वेषाने विचारेल की आमच्या संस्कृतीचा, इतिहासाचा, परंपरेचा अपमान आम्ही का म्हणून सहन करायचा? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही काहीही लिहो, बोलो, ते आम्ही का ऐकून घ्यायचं? पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यात निषेध करायचं स्वातंत्र्य पण अंतर्भूत आहे, हे विसरून चालणार नाही. माझा मुद्दा हाच आहे की एक पुस्तक लिहिलं, एक चित्र काढलं, एक सिनेमा काढला, एक नाटक लिहिलं म्हणून कलाकारांच्या गर्दना मारायची किंवा त्यांची घरं जाळायची भाषा करणे हे इराण-इराक-अफगाणिस्तान इथे सर्रास चालणारे प्रकार आहेत. पण हेच प्रकार आज भारतातपण चालू आहेत. मग या देशांना मागासलेले, रानटी असं जर आपण म्हणत असू तर आपण कोण आहोत?
आठशे वर्षांपूर्वी आपल्या देशात होऊन गेलेल्या संत ज्ञानेश्वरांनी 'जो जे वांछील तो ते लाहो' असा वर मागितला. ज्याला जे वाटतं ते निर्भयपणे सांगता येणं हा अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्याइतकाच मूलभूत अधिकार आहे. असो. हे सारं लिहावसं वाटलं ते एम.एफ.हुसेनच्या निधनानंतर जो काही तमाशा चालू होता तो पाहून. आधी लिहिताना भाग पहिला असं आगाऊपणे म्हटल्यामुळे हा पुढचा भाग पण लिहावा लागला च्यामारी. सगळे नसते ताप.