Search This Blog

फेसबुक वर भेटायचं असेल तर..

Wednesday, June 13, 2012

माया महाठगिनी, हम जानी|

(काही तांत्रिक घोळ झाल्याने मागची पोस्ट पब्लिश होण्यात ब-याच  अडचणी आल्या. ती पोस्ट वाचायची असल्यास इथे वाचा.)

आठ महिने सरकारी प्रशिक्षण  पूर्ण झालं, आणि मायबाप सरकारने आमची पालखी कलकत्त्याला नेली. गेलं एक वर्ष मी इथे राहतो आहे.
आम्ही भूशास्त्रज्ञ असल्यामुळे टेबलावर पाय टाकून झोपा काढणे, उठसूट चहाला जाणे,  एका मिनिटाच्या कामाला महिना लावणे (हे काही प्रमाणात आमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ करून दाखवतात), आल्यागेल्यावर खेकसणे, हे अत्यंत सुखद प्रकार काही आमच्या नशिबी लिहिलेले नाहीत. आम्हाला नोकरी दिली या पापाचं परिमार्जन सरकार अनेक प्रकारे करत असतं. नियम असा आहे, की वर्षातले एकशे वीस दिवस आम्हाला फिल्डवर्क करावं लागतं. आणि हे एकशे वीस दिवस झाले की नाहीत हे सरकार आखाडसास-या सारखं बघत असतं. त्यामुळे आम्ही gazetted ऑफिसर असलो, तरी शुभ्र कपडे, चकचकीत गाड्या हे काही आमचं जग नाही. फाटकी जीप, धुळीने भरलेले केस, वाढलेली दाढी, मळके कपडे अशा अवतारात एखादा माणूस उन्हातान्हात दगड फोडताना दिसला तर तो सरकारी  भूशास्त्रज्ञ सोडून दुसरा कोणी असूच शकत नाही. असो.
तर वर्षातले एकशे वीस दिवस आम्ही कुठेही काढतो. शक्यतो जिथून काम करण्याचा एरिया जास्तीत जास्त जवळ पडेल, आणि डीझेलचा खर्च कमी होईल (हापण एक सासुरवास असतो) अशा जागी. बरेचदा अशा जागा अतिशय अडनेड्या असतात. त्यात परत आम्हाला ऑफिसमध्ये दरमहा बोलावून त्रास देण्याची प्रथा आहे. त्यासाठी रस्ते, रेल्वे सोयीस्कर आहे की नाही हेही बघावं लागतं. या सगळ्या सोपस्काराला 'कॅम्प टाकणे' असं नाव आहे. एकदा कॅम्प टाकला, की  कामाला सुरुवात होते. जीप घेऊन एरियाचा कानाकोपरा तपासून पाहायचा, आणि ठराविक इन्टर्वलने दगड-मातीचे नमुने घ्यायचे असं आमच्या कामाचं साधारण स्वरूप असतं. या पद्धतीचं काम 2001 मध्ये चीनने पूर्ण केलं, आणि ते काही अंशी यशस्वीही झालं. हे नमुने प्रयोगशाळेत धाडले जातात, आणि त्यांच्यातल्या 64 मूलद्रव्यांची तपासणी केली जाते. ही माहिती परत आम्ही तपासतो, आणि interprete करतो. याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो (अधिक माहितीसाठी वाचा). या सगळ्या कामासाठी सरकार आम्हाला काही मोजकी रक्कम देतं. जीपची मोडतोड-दुरुस्ती, डीझेल, कामगारांचे पगार, उपकरणं, कॅम्पचे किरकोळ खर्च, असे अनेक खर्च यात असतात. हा सारा खर्च अतिशय काटेकोरपणे करावा लागतो. दर दिवशी एक माणूस किती दगड-माती गोळा करू शकतो याचं सरकारने (डोकं बाजूला ठेवून) एक गणित केलेलं आहे. तेही लक्षात ठेवून काम करावं लागतं. याचा फायदा एकच आहे, की ज्या भागात आम्ही काम करतो, तो परिसर आम्हाला खूप जवळून अनुभवता येतो. जिथे कोणी फिरकतही नाही अशा जागी आम्ही जातो. रस्ता नसेल, जीप जाऊ शकत नसेल, तर चार नमुने घेण्यासाठी आठ-दहा किलोमीटर चालत जाणं अगदी नेहमीचं. या सा-या कामासाठी आम्ही साधारण चार ते पाच लोक कामाला घेतो. ही माणसं सहज मिळतातही, कारण इतर कामात यांना दर दिवसाचे जितके पैसे मिळतात त्याच्या जवळपास दुप्पट पैसे सरकारी कामात मिळतात. अर्थात ही दुप्पट रक्कमही विशेष नसतेच, पण यासाठी माती खोदणे, वाळवणे, कुटणे, चाळणे, आणि डब्यात भरणे, दगड असेल तर त्याचे छोटे तुकडे करून डब्यात भरणे ही कामं हे लोक करतात. हे काम सोपं नाही. अत्यंत लहान चूक सगळ्या कामाचं रूप बदलू शकते. एकशे वीस दिवसात आम्ही 923 नमुने गोळा करतो, आणि हा कामाचा पहाड पूर्ण करताना सगळ्यांच्या कमरेचे टाके ढिले होतात.
 मातीचा नमुना घेताना. 
कुठल्याही धातुमुळे contamination होऊ नये म्हणून लाकडी दांड्याने खोदकाम करतात.

इतकी माणसं, इतके दिवस, इतकं काम, इतकी भटकंती यामुळे सारी दृष्टी बदलून जाते. स्थानिक लोक आणि अनेकदा वन्यप्राणी यांच्याशी संबंध येतो. या सा-या कामाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. (अजून एक फायदा म्हणजे ऑफिसात आम्हाला कोणीही भाव देत नसलं, तरी फिल्डवर बराच मान मिळतो!) खरं तर 'मासे, दुर्गापूजा,रसगुल्ले आणि टागोर' या चौकटीतून बाहेर पडून बंगाल पाहिला, तर एक फार वेगळा चेहरा दिसतो जो  कलकत्ता-शांतीनिकेतन ट्रीप काढून नाही दिसत. कलकत्त्याला बदली झाल्यावर वर्षभर  मी पुरुलिया-बांकुडा या भागात काम केलं. या कामात मी जो बंगाल पाहिला, तो असा चौकटीपल्याडचा होता.
पुरुलिया-बांकुडा-मिदनापूर या तीन जिल्ह्यांना जंगलमहाल म्हणतात. दक्षिण-पश्चिम बंगाल, आणि बंगाल-झारखंड सीमा असा प्रदेश या जंगलमहालने व्यापला आहे. हवा-पाणी-सुरक्षा यादृष्टीने अतिशय प्रतिकूल असा हा भाग. मे महिन्यात इथे 48-49 अंश इतकं तापमान असतं. पाण्यात आर्सेनिक, लोह आणि फ्लुराईड. माओवादी, हत्ती तर नेहमीचे. इथल्या जंगलात फिरताना अतिशय काळजी घ्यावी लागते. माणूस आणि हत्ती यांचा संघर्षही आता तीव्र होऊ लागला आहे.
 गंगाजलघाटी, बांकुडा इथे शेतात घुसलेला हत्ती 

हे सारे दशावतार सोसणारी माणसंही इथेच आहेत. त्यांना हे भोग भोगायला लावणारे माओवादीही इथलेच. कुठेही फिरा, डोळ्यावर चटकन आघात करून जाते ती इथली गरिबी. याला कोण जबाबदार आहे, यावर उपाय काय आहे या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण आत्ता दोन-एकशे रुपये जास्त दिले म्हणून एक चाळीशी-पन्नाशीचा माणूस एका पंचविशीतल्या मुलाचे पाय धरू पाहतो, तेव्हा शरमेने सारं आयुष्य आकसून जातं. पैसे माझे नाहीत, ते सरकारचे आहेत. देणारा फक्त मी. "कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकारी?" असा हा प्रकार. तरीही त्या घटकेला त्या कामगारासाठी मीच सरकार असतो ना? मग माझी जबाबदारी नक्की काय आहे? चार पैसे जास्त मिळावेत म्हणून काम हळूहळू करण्याची यांची केविलवाणी खटपट जेव्हा लक्षात येते, तेव्हा त्यांच्यावर डाफरणंही जीवावर येतं. कित्येक माणसांची आयुष्यं अक्षरशः याच एका कामावर अवलंबून आहेत. मे  महिन्यात काम संपवून जेव्हा पावसाळी ब्रेक सुरु होतो, तेव्हा काम परत सुरु होईल ना, या विचाराने या माणसांचा जीव कसा वरखाली होतो ते मी पाहिलेलं आहे. एखाद्या आडगावात गेल्यावर तिथली माणसं मोठ्या अपेक्षेने आपले पाण्याचे प्रश्न सांगतात, आणि माझं शिक्षण, ज्ञान असूनही मी काहीच करू शकत नाही, यात नक्की दोष कुणाचा? दीड-दोनशे रुपयांसाठी माझ्यामागे "साब साब" करत फिरणारा कामगार आणि त्याहून कितीतरी जास्त रुपये मिळत रहावेत म्हणून माझ्या बॉसशी नम्रपणे वागणारा मी. फरक फक्त रकमेचाच आहे का?
गांधीजी एके ठिकाणी म्हणतात, माणसाची खरी पारख तो आपल्या कनिष्ठांशी कसा वागतो यावरून होते. आपण ऑफिसर आहोत, gazetted आहोत, या खोट्या अभिमानातून तुसडे होणारे, तुरा मिरवणारे लोक इथे पदोपदी भेटतात. एक परीक्षा पास होऊन ऑफिसर होणे, यात अभिमान वाटण्यासारखं काही आहे असं मला खरंच वाटत नाही. समजा, नापास झालो असतो तर?
ही नोकरी सुरु होण्याआधी मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत होतो. टेम्पररी. पुढच्या सेमिस्टरमध्ये घेतलं जाईलच याची शाश्वती नाही. महिन्यात किती लेक्चर्स घेतली, किती practicals घेतली त्या हिशोबाने पैसे मिळत, तेही सेमिस्टर संपल्यावर. किती मिळायचे, हे सांगण्यात काही अर्थ नाही आणि औचित्यही नाही, पण गरजा भागत आणि जोडीला भटकंती, डोंगर चढणे, या आणि  उद्योगांसाठी घरी पैसे मागायची गरज नसे. जोडीला माझी डॉक्टरेट चालू होती, त्याचं फिल्डवर्क वगैरे करायला कधीतरी मदत व्हायची. मी दोन वर्षं हे काम केलं, आणि मनापासून एन्जॉय केलं. माझ्या विद्यार्थ्यांनीही  मला फार मोठ्या मनाने सहन केलं. अजूनही मी पुण्याला गेलो तर हे सारे अतिशय प्रेमाने भेटतात, बोलतात. या दोन वर्षांची सर्वात मोठी पुंजी हीच आहे खरं तर. असो. तर एक सेमिस्टर संपली, मे महिना किंवा दिवाळीची सुट्टी आली की मला टेन्शन असे, की पुढच्या सेमिस्टरला मी शिकवणार की नाही? यात पैसे मिळवण्याचा भाग खरंच नव्हता. शिकवण्याचीच मजा इतकी होती, की त्यासाठी मी फुकटही काम केलं असतं.
आज जेव्हा मी काम चालू राहील का नाही, म्हणून अस्वस्थ होणारी ही माणसं बघतो तेव्हा मला माझी आठवण होते. यांना पैशाची गरज आहे, मला कामाची, शिकवण्याची आणि पर्यायाने सतत डोकं चालू ठेवण्याची गरज होती. माझं शिकवणं बंद झालं असतं तर मला माझी डॉक्टरेट होती, . या माणसांचं काम बंद झालं, तर यांना अजून काय आहे? आपलं आयुष्य चांगल्या त-हेने चालू राहावं एवढीच एक ओढ, पण ती जेव्हा अशा पद्धतीने समोर उभी राहते, तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं.
कबीर म्हणतो, "माया ही मोठी फसवी आहे. (महाठगिनी हम जानी!) पुजा-यासाठी मूर्ती माया, तर तीर्थात पाणी माया. कोणासाठी ती हिरा बनते, तर कोणासाठी कवडी बनून जाते." दोन वेळची चूल पेटती राहावी, ही कोणाचीतरी माया असते, तर कोणी चांगल्या कामासाठी जीव टाकतो. अखेर आपल्या गरजा असतात तरी किती? दीड-दोनशे रुपयांना महाग असलेला कामगार आणि महिना हजारो रुपये मिळवणारा ऑफिसर हे एकाच प्रकारच्या पैशाला बांधलेले. त्यासाठी पडेल ते काम करणारे. फरक फक्त quantityचा. कुठल्या कुठून पुन्हा हे सगळं चक्र फिरून त्याच एका प्रश्नाकडे येतं, की ही सारी धडपड, सारा खटाटोप आहे कशासाठी आणि कुणासाठी? कबीरच पुढे सांगतो, की ही सारी 'अकथ कहानी' आहे. कुणी कुणाला न सांगितलेली, तरी सतत घडणारी. ही साठा उत्तरांची कहाणी आहे, पण ती सुफळ संपूर्ण होईलच असं नाही. शेवटी हा वर ज्याचा त्यानेच मागायचा असतो. मागूनही तो मिळेलच असं नाही. पण निदान आपण काहीतरी मागितलं, ही जाणीव आपल्या  गाठीशी राहिली तरी खूप झालं.